"चहाचे प्रकार"
हवा हवासा वाटणारा गरमागरम चहा. पण चहा पिणे हे जरी शरीरासाठी हितकारक नसले तरी बहुतेकांची सकाळची सुरुवात मात्र चहा घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही. चहा घेतल्यावर आपल्याला अगदी ताजेतवाने वाटते. कारण चहाचा गुणधर्म तसा आहे. हल्ली आपली जीवनशैली बदललत चालली आहे. बदललेल्या जीवनशैलीनुसार अनेक वेगवेगळ्या प्रकारे चहा करता येतो.
आयुर्वेदिक मसाला चहा पावडर कशी बनवावी?
चहाचा मसाला हा चहा बनवत असताना दोन कप चहा साठी पाव टीस्पून टाकायचा म्हणजे चहा कडक व चविष्ट लागतो. बहुतेक हा चहा थंडीत किंवा पावसाळ्यात बनवतात. तसेच सर्दी पडसे किंवा खोकला झाला असल्यास घ्यावा त्यमुळे घशाला शेक बसतो व बरं वाटते.
साहित्य : ३० ग्रॅम सुंठ पावडर, १ टीस्पून काळी मिरे पावडर, दालचिनी, १ टीस्पून पांढरी मिरे पावडर, दहा ग्रॅम हिरवे वेलदोडे, चिमुठभर जायफळ पावडर.
कृती : प्रथम तवा गरम करून वरील सर्व साहित्य अगदी कमी आंचेवर गरम करून घेऊन मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. मंग तयार झाला 'आयुर्वेदिक चहा मसाला'.
चहा करण्याचे काही नावीन्यपूर्ण वेगळे प्रकार देत आहोत; जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. पुदिना, लिंबू, आले, वेलची, दालचिनी, मध, हळद, पेरूची पाने, मसाले वापरून ते केले आहेत. खास बोलायच झालं तर येवले अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, साईबा चहा, हरमन चहा, इ. प्रकारचे चहा हे अमृतुल्य झालेत.
अमृततुल्य चहा
अमृततुल्य चहा हा खूप लोकप्रिय झालाय. खास करून येवले चहा. हा चहा थोडा दाट असून थोडा गोड असतो. यामध्ये दूध, दर्जेदार चहा पावडर, चहाचा मसाला, साखरसुद्धा नेहमीपेक्षा जास्त असते. अशा प्रकारचा एक कप चहा घेतला तरी छान फ्रेश वाटते.
साहित्य : एक कप पाणी, एक कप दूध, ४ टीस्पून साखर, १ टीस्पून चहा मसाला, २ टीस्पून दर्जेदार चहा पावडर.
कृती : प्रथम एका भांड्यात दूध व पाणी मिक्स करून गॅस स्टोव्हवर गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा मसाला, साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्यावे. गरमागरम अमृततुल्य चहा बिस्कीटे किवा खारी, तोष बरोबर घेतलास मजा काही औरच.
आयुर्वेदिक चहा
अशा प्रकारचा चहा बनवताना जिरे, धने, व बडीशेप वापरले आहे. 'आयुर्वेदिक चहा' हा आपण रोज सकाळी घेण्याची सवय केली, तर आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.त्यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जातील व आपले शरीर निरोगी बनेल व आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल. धने-जिरे व बडीशेप यामध्ये असे गुणधर्म आहेत, की आपल्या शरीरातील नको असलेले घटक निघून आपले पोट साफ होईल. तसेच आपल्याला वजन कमी करण्यास मदत मिळेल. अजून याचा एक फायदा म्हणजे धने-जिरे वापरून बनवलेले पाणी आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते.
साहित्य : दोन कप पाणी, पाव टीस्पून - जिरे, धने, बडीशेप
कृती : एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये धने-जिरे व बडीशेप घालून ५ मिनिटे गरम करायला ठेवावे. मग विस्तव बंद करून चहा गाळून मग सर्व्ह करावे.
गवती चहा
सर्दी–पडसे, अंगदुखी व आमवात अशा अनेक प्रकारच्या व्याधींवर गवती चहा उपयुक्त आहे.
साहित्य: २ चहाचे कप पाणी, अडीच कप दुध, ३ ते ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, १/२ टिस्पून किसलेले आले किंवा ४ पाती गवती चहा.
कृती: दुध आणि पाणी पातेल्यात एकत्र करा. साखर आणि आले, गवती चहची पाती कापून घालून मोठ्या आचेवर पातेले ठेवावे. दुध-पाणी वाफाळायला लागले, की त्यात चहा पावडर घालून आच मध्यम करावी. मिश्रण उकळल्यावर उतू जाते. म्हणून चहाकडे सतत लक्ष ठेवावे. चहा १-२ मिनिटे उकळू द्यावा. गॅस स्टोव्ह बंद करून चहा मिनिटभर झाकून ठेवावा. नंतर गाळून गरम गरमच देण्यात यावा.
लिंबू चहा
आपल्याला हा चहा घेतल्याने ताजेतवाने वाटते. ह्या चहाची चव आंबट लागते. त्यामुळे आपल्या नेहमीच्या चहापेक्षा चवीस्ट लागतो. पण हा चहा थंड असतो. त्यामुळे आपण जेव्हा गरम वाटते, तेव्हा तो बनवतात. काही जण हा चहा कधीही घेतात. यास 'डाएट चहा' पण म्हणतात.
साहित्य : चार कप पाणी, चार टीस्पून चहा पावडर, चार टीस्पून लिंबूरस, आठ टीस्पून साखर, १० बर्फाचे तुकडे, १० पुदिन्याची पाने, कापलेल्या लिंबाची पातळ चकती.
कृती : एका भांड्यात ४ कप पाणी गरम करून घ्यावे. त्यामध्ये चहा पावडर, पुदिना पाने, साखर घालून ५ मिनिटे चहा उकळून घेऊन; दुसऱ्या भांड्यात गाळून थंड करायला ठेवावे. चहा थंड झाल्यावर त्यामध्ये लिंबूचा रस टाकावा. चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये बर्फ, पुदिना पाने व लिंबाची एक चकती घालून सजवून ठेवावा.
इराणी चहा
हा चहा बनवायला पाऊन तासाचा कालावधी लागतो. इराणी चहा घट्ट केलेल्या दुधापासून तयार होतो. एका पातेल्यात दूध उकळवले जाते. हा चहा बनविण्यासाठी दोन पातेली वापरली जातात.
साहित्य: ३ चहाचे कप पाणी, आर्धा लिटर म्हशीचे दुध, ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, ४ टिस्पून चहा पावडर, ३ वेलची, २ टेबल स्पुन मलई क्रिम किंवा मावा.
कृती: एका टोपात पाणी, वेलची, साखर आणि चहा पावडर टाकून उकळवले जाते. दुसऱ्या टोपात घट्ट केलेले दूध उकळवले जाते. या दुधात मलई क्रिम किंवा मावा टाकला जातो. दोन स्वतंत्र भांड्यात दूध आणि चहाचे मिश्रण उकळवले जाते आणि चहा देण्यापूर्वी ते एकत्र करून दिले जाते. हा चहा लगेच थंड होत असल्याने तो लगेच प्यावा लागतो. इराणी चहा करताना गॅस कधीच बंद होत नाही. सतत तो उकळवला जातो त्यावर झाकण ठेवून वजन ठेवले जाते. गॅस बंद झाला तर प्रमाण चुकते आणि चहाची चव निघून जाते.
काळा चहा
हा चहा इतर चहांपेक्षा चवीला कडवट असतो. काळा (ब्लॅक) टी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो. नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते.
साहित्य: २ चहाचे कप पाणी, साखर चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, लिंबाची एक फोड.
कृती: एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा, त्यानंतर चहा टाका. साखर चवीनूसार घालून चहा चांगला उकळवा. नंतर गाळून कपात ओता. त्यात लिंबाची फोड पिळा. यात कोणत्याही प्रकारचे दूध टाकत नाहीत.
बासुंदी चहा
बासुंदी चहा अजून येवढा प्रचलित नाही. पण त्याची एक विशिष्ट टेस्ट असते. हा चहा थोडा घटट असून गोड असतो. हा एक कप चहा घेतला तरी छान ताजेतवाने वाटते.
साहित्य : एक कप पाणी, दीड कप दूध, दोन टीस्पून साखर, १ टीस्पून चहा, ४ सालीसकट वेलदोडे.
कृती : प्रथम एका पातेल्यात दूध ओतून उकळी येईपर्यंत तापवावे व पाणी मिक्स करून गॅस स्टोव्हवर गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्यावे.नंतर वेलदोडे टाकून चहास उकळी येवून द्यावी. पुन्हा थोड्यावेळाने उकळी येवू द्यावी. चहा घट्ट दिसू लागला की समजायचा बासुंदी चहा तयार झालाय.
ज्यांना साय आवडते त्यांना हा चहा खुप आवडतो.
काश्मीरी कावा चहा
काश्मीर म्हटले, की तेथील सृष्टिसौंदर्य व काश्मीरमधील थंडीसुद्धा आठवते. काश्मीरमध्ये खूप थंडी असते त्यामुळे तेथील रहिवासी थंडी कमी करायला कावा म्हणजेच आपल्या भाषेत मसाला चहा बनवतात. या मसाला चहाची चव अगदीच निराळी लागते. तसेच त्यामध्ये दालचिनी, केसर, हिरवे वेलदोडे, मीठ, खायचा सोडा व साखर वापरण्यात येतो. आम्ही काश्मीरमध्ये कावा टी पिला आम्हाला तो खूप आवडला.
साहित्य : दोन कप पाणी, दोन टीस्पून साखर, एक टीस्पून काश्मिरी चहा पावडर, ४ हिरवे वेलदोडे, अर्धा तुकडा दालचिनी तुकडा, एक चिमूट खायचा सोडा, एक चिमूट मीठ, ५-६ काड्या केशर, बदामाची पावडर.
कृती : पाणी, साखर, वेलदोडे, दालचिनी, काश्मिरी चहा, मिक्स करून पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर उकळून घ्यावे. मग त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्स करून दोन मिनीटे गरम करून गाळून घ्यावा. गरम गरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना चहाच्या वर बदाम व केशर पावडरने सजववावा.
आल्याचा चहा
आल्याचा चहा घेतल्याने, सर्दी पडसे कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपली रोग प्रतिकारशक्तीपण वाढते.
साहित्य : दोन कप पाणी, ४ टीस्पून साखर, २ टिस्पून चहा पावडर, आल्याचा तुकडा कुटून घेणे, एक कप दुध. कृती : एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये साखर व चहा पावडर टाकावी. नंतर कुटलेले आले घालून चांगली उकळी येऊ द्यावी. दुध घालून पुन्हा उकळी येवून द्यावी. नंतर सर्व्ह करावे. आपल्या घशाला शेक मिळून सर्दी पडसे कमी होण्यास मदत होते.
आले, लिंबू व मधाचा चहा
अशा प्रकारचा चहा बनवताना आले किसून, लिंबूरस, व साखरेऐवजी मध वापरला जातो. यामुळे आपले शरीर निरोगी राहते व रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपल्या त्वचेला चकाकी येते. आल्यामुळे आपल्या पोटातील गॅंस निघून आपले पोट साफ होते. सकाळी उठल्यावर अशा प्रकारचा चहा घेतला तर फायदेशीर असते.
साहित्य : दोन कप पाणी, १ टीस्पून ग्रीन टी चहा पावडर, अर्धे लिंबू (रस काढून) एक मध्यम आल्याचा तुकडा (किसून), अर्धा टेबल स्पून मध.
कृती : दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा पावडर, आले घालून १० मिनिटे गॅस स्टोव्हवर उकळून घ्यावे. नंतर गाळून थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस व मध घालून मिक्स करून देण्यात यावे.
पुदिन्याचा चहा
पुदिन्याचा चहा पिल्याने पोटदुखी थाबते. पोटातील रोग दूर होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. चेहऱ्यावरील पिंपल ठीक होतात, आपली त्वचा थंड राहते व उजळून येते. पचनशक्ती सुधारून वजन कमी होते. हा चहा खूप गुणकारी आहे,
साहित्य : दोन कप पाणी, अर्धा टी स्पून मिरे (जाडसर कुटून), अर्धा टीस्पून काळे मीठ, १०-१२ पुदिना पाने
कृती : प्रथम पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्यावी. एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये पुदिना पाने, मिरे, काळे मीठ घालून १० मिनिटे गॅसस्टोव्हवर चहाला उकळी येऊ द्यावी.
पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन पोटदुखी थांबते.
तंदुर चहा
तंदुर चहा बनवायला तसा फार अवघड नाही. आपण नेहमीचा चहा जसा बनवतो अगदी तसाच तंदुर चहा ही बनवायचा आहे. मात्र तंदुर चा फ्लेवर देण्यासाठी आपल्याला मातीचे कप आणि कोळसाचे तुकडे लागणार आहेत.
साहित्य: २ चहाचे कप पाणी, अडीच कप दुध, ३ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, ३ कोळसाचे तुकडे, २ मातीचे कप.
कृती: सर्वप्रथम पाणी, प्रमाणानुसार दुध, आवश्यकतेनुसार साखर आणि चहा पत्ती टाकून नेहमीप्रमाणे गॅसवर चहा बनवायला ठेवावा. त्यानंतर ३ कोळश्याचे टुकडे शेगडीवर गरम करुन घ्यावेत. नंतर गरम झालेल्या कोळसांवर मातीचे कप गरम करायला ठेवावेत. त्यानंतर पॅन किंवा भांडे घ्यावून ते थोडेसे गरम करावे. गरम भाड्यात मातीचे कप ठेवून त्यात तयार झालेला चहा ओतावा. मातीच्या गरम कपातील चहा पुन्हा दुस-या कपात ओतावा. बस्स. झाला गरमागरम तंदुरी चहा तयार.
जेव्हा उकळणार चहा त्या गरम कपांमध्ये ओतला जाईल त्यावेळी त्या मातीचा स्वादही त्या चहामध्ये उतरेल. चवीला अत्यंत वेगळा असणारा हा चहा सर्वांना फार आवडतो.
बदाम पिस्ता चहा
हा श्रीमंताचा चहा म्हणून प्रसिद्ध असून बदाम, पिस्ता व वेलची युक्त असतो. हा चहा लज्जतदार असून तलफ भागवतो.
साहित्य: १ कप पाणी, १ कप मलई दूध, ३ टी स्पून साखर, ४ टी स्पून चहा पावडर, केशर, बदाम आणि पिस्ता याची पुड, २ वेलची.
कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा टाका. उकळी आल्यावर केशर टाका. पुन्हा उकळी काढा. एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्या. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.
पेरू चहा
या चहाला पेरू सुगंध येतो.
साहित्य : दोन कप पाणी, ४ टीस्पून साखर, २ टिस्पून चहा पावडर, ४ पेरूच्या झाडाची बारिक पाने कापून कुटावित, एक कप दुध. कृती : एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये साखर व चहा पावडर टाकावी. नंतर कुटलेले पण पेरूची पाने टाकून चांगली उकळी येऊ द्यावी. नंतर सर्व्ह करावे. ह्या चहास पेरूचा सुगंध येतो.
-अॅड्. प्रवीण बाबर
उपयुक्त माहिती🙏🙏
उत्तर द्याहटवा