सोमवार, २५ मे, २०२०

"शरीर समजून घेवू या"

मानव शरीर अदभुत आहे.

मजबुत फुफ्फुस
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाहि येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केल तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.

अशी कोणतीही फॅक्टरी नाही
आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जा पेक्षा जास्त रक्त कोषीकांचे उत्पादन होते. सतत शरिरात २५०० अब्ज रक्त कोषीका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषीका असतात.

लाखो किलोमीटर चा प्रवास
मानवाचे रक्त शरीरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरिरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरिराचे भ्रमण करतो.

धडधड
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. हृदयाच्या पंम्पिगचा दाब एवढा जास्त असतो की रक्ताचा दाब ३० फुट वर उडु शकतो.

सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ
मानवाचे डोळे एक करोड रंगाना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुन पर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 

नाकात एअर कंडीशनर
आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.

ताशी ४०० कि.मी. ची गती
चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की. मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.

जबरदस्त मिश्रण
शरिरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकॉन आहे.

अजब शिंक
शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि. मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्तच आहे.

बॅक्टेरियाचे गोदाम
मानवाच्या शरिराच्या १० %  वजन हे त्याच्या शरिरात असलेल्या बॅक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरीया असतात.

विचित्र विश्व
डोळ्याचा विकास लहान पणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतो. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजाना ओळखु शकतो.

दातांची काळजी घ्या
मानवी दात दगडासारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.

तोंडांतली लाळ
मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.

पापण्या झपकणे
वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्या कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच  फरक जाणवतो.

नखांची कमाल
अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.

दाढीचे केस
पुरुषाच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते.

जेवणाचे गणित
व्यक्ती सामान्य रीत्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट अधिक जेवण खालेलं असते.

केस गळण्याचा त्रास
एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले केस दररोज ८० गळतात.

स्वप्नाची दुनिया
बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करतो. वसंत रुतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.

झोपेचे महत्व
झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरिराला आराम मिळतो आणि डागडुजीचे (रिपेरिंग) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे गरजु होर्मोन्स मुक्त होतात.

तेव्हा किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.

मंगळवार, ५ मे, २०२०

"ग्रामीण बोलीतील काही शब्दाचा परिचय"

महाराष्ट्रातील ग्रामीण भाषेत काही परिचीत शब्द अजूनही प्रचलीत आहेत.. 

कावळे -
गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे 'कावळे'

कालवण / कोरड्यास-
 'पातळ भाजी' 

आदण-
घट्ट भाजीचा रस्सा त्याला 'आदण' म्हणत.

कढाण -
मटणाचा पातळ रस्सा त्याला 'कढाण' म्हणतात. 

घाटा -
हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला 'घाटा' म्हणतात.

हावळा -
हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला 'हावळा' म्हणतात.

कंदुरी -
पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला 'कंदुरी' म्हणत. 

हुरडा -
ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात. त्यास 'हुरडा' म्हणतात. 

आगटी -
हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसं भाजली जातात त्याला 'आगटी' म्हणतात.

कासूटा, काष्टा -
पूर्वी सर्रास धोतर नेसलं जायचं. धोतराची गाठ कमरेभोवती बांधल्यानंतर राहिलेल्या धोतराच्या निर्‍या घालून पाठीमागे खोचल्या जायच्या त्याला 'कासूटा' म्हणत आणि हाच प्रकार स्त्रियांनी केला तर त्याला 'काष्टा' म्हणत. 

घोषा -
पूर्वी ग्रामीण भागात पाटील किंवा उच्चभ्रू लोकांमध्ये ज्या स्त्रिया लग्न होऊन यायच्या त्यांना 'घोषा' पद्धत असायची. म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर साडीच्या वरून शेळकट गुंडाळायचे व ते पूर्ण तोंडावर घ्यायचे... शेळकट पातळ असल्यामुळे शेळकटातून बाहेरचे दिसायचे. परंतु चेहरा दिसायचा नाही. शेळकट नसेल तर पदर तोंडावर असा ओढायचा की जेणेकरून चेहरा दिसणार नाही. 

दंड -
एखाद्या चुकीच्या कामामुळे शासन आर्थिक दंड करते तो वेगळा. येथे दंड म्हणजे पूर्वी कपड्यांची कमतरता असायची. अशा वेळी स्त्रिया एखादी साडी जुनी झाली तरा त्याचा जीर्ण झालेला भाग कापून काढायचा आणि दुसर्‍या जुन्या साडीचा चांगला भाग काढायचा आणि हे दोन चांगले भाग शिवून एक आडी तयार करायची.याला 'दंड' घातला म्हणायचे. 

धडपा -
साडीचा भाग जीर्ण झाला असेल आणि त्याला दंड लावायला दुसरी साडी नसेल तर साडीचा जीर्ण झालेला भाग काढून टाकला जातो व नऊवारीसाडीची सहावारी साडी करून नेसली जाते. त्याला 'धडपा' म्हणतात.

कंबाळ / कयाळ -
पूर्वी स्त्रियांच्या नऊवारी साड्या असायच्या त्या नेसताना पोटासमोर साडीच्या निर्‍या पोटावर खोचायच्या त्याचा आकार केळीच्या कंबळासारखा व्हायचा किंवा केळासारखा दिसायचा म्हणून काही भागात त्याला 'कंबाळ' तर काही भागात त्याला 'क्याळ' म्हणायचे. 

दंडकी -
म्हणजे आताचा हाफ ओपन शर्ट. दंडकीला जाड मांजरपाठाच कापड वापरलं जायचं. त्याला पुढे खालच्या बाजूला दोन मोठे खिसे, आतल्या बाजूला एक मोठा खिसा. तसेच त्याला गळ्याजवळ एक चोरखिसा असायचा, त्यास 'दंडकी' म्हणतात

बाराबंदी -
पूर्वी ग्रामीण भागात शर्ट नसायचा, जाड मांजरपटच्या कापडाचा छोट्या नेहरू शर्टसारखा आकार असायचा, त्याला बटण नसायची, बटणाऐवजी बांधण्यासाठी बंधांचा वापर केला जायचा. तो शर्ट घातल्यानंतर बारा ठिकाणी बांधावा लागायचा म्हणून त्याला 'बाराबंदी' म्हणत.

तिवडा -*
पूर्वी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल, म्हैस फिरवली जायची. त्यांना गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला 'तिवडा' म्हणत. 

तिफण, चौफण -*
पूर्वी शेतात धान्य पेरण्यासाठी कुरीचा (पाबर) वापर करत. पिकामध्ये जास्त अंतर ठेवायचे असेल तर तिपणी चा वापर करत, अंतर कमी ठेवायचे असेल तर चौफणी चा वापर करत.

कुळव, फरांदी -
शेतात पेरण्यापूर्वी शेती स्वच्छ करण्यासाठी गवत, कचरा काढण्यासाठी कुळवा चा वापर केला जात असे. जास्त अंतर ठेवून शेती स्वच्छ करायची असेल तर फरांदी चा वापर करत. 

यटाक -
कोणतेही औत ओढण्यासाठी शिवाळ/ जू याचा वापर करताना ते जोडण्यासाठी ज्या सोलाचा वापर करत त्याला 'यटाक' म्हणत.

 शिवाळ -
पूर्वी शेती नांगरण्यासाठी लाकडी, लोखंडी नांगराचा वापर केला जायचा. नांगर ओढण्यासाठी सहा-आठ बैल लागायचे, ते ओढण्यासाठी बैल 'शिवाळी' ला जोडली जायची. 

रहाटगाडगं -
पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा किंवा रहाटगाडग्याचा वापर केला जायचा. रहाटगाडग्याला छोटे छोटे लोखंडी डबे जोडून गोलाकार फिरवून विहिरीतून पाणी काढलं जायचं त्याला 'रहाटगाडगं' म्हणतात. 

रहाट -
पाणी पिण्यासाठी आडातून पाणी काढण्यासाठी रहाटाचा वापर केला जायचा. बादलीला कासरा बांधला जायचा. ती राहाटावरून खाली सोडली जायची. पाण्याने भरली की वर ओढून घ्यायची व जवळ आली की हाताने बाहेर काढून घ्यायचं, त्यास 'रहाट' म्हणतात. 

चाड -
शेतात धान्य पेरण्यासाठी चारी नळ्यातून सारखं बी पडावं म्हणून चाड चाा वापर केला जायचा. 

ठेपा -
पूर्वी जनावरांना बांधण्यासाठी लाकडी मेडक्याचा ( Y आकाराचे लाकूड) वापर करून छप्पर तयार केलं जायचं.
पावसाळ्यात छप्पर एका बाजूला कलंडले तर ते पडू नये म्हणून लाकूड उभे करून त्याला आधार दिला जायचा त्याला 'ठेपा' म्हणत.

शेकरण -
पूर्वी घरं कौलारू होत  तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी घर गळू नये म्हणून दरवर्षी कौलं व्यवस्थित लावली जायची त्याला 'शेकरण' म्हणत. 

तुराटी -
तुरी बडवून जी काटकं राहायची त्याला 'तुराटी' म्हणतात. याचा उपयोग घर शेकारण्यासाठी केला जायचा. 

काड -
गहू बडवून जी काटकं राहायची त्याला 'काड' म्हणतात. काडाचाही उपयोग शेकरण्यासाठी केला जात. 

भुसकाट -
धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा राहतो, त्याला 'भुसकाट' म्हणतात. याला जनावरं खातात.

वैरण -
ज्वारी, बाजरी काढल्यानंतर जो भाग एका जागी बांधून पेंडी बांधली जायची त्याला 'वैरण' म्हणतात. 

जू -
औत, बैलगाडी, कुळव ओढण्यासाठी बैलाच्या खांद्यावर जे आडवं लाकूड ठेवलं जायचं त्याला 'जू' म्हणतात. 

साठी -
वयाची एक साठी असते आणि दुसरी बैलगाडीची साठी असते या साठीचा उपयोग शेतातील माल, डबा, धान्याची पोती, शेणखत, बाजारचा भाजीपाला वाहण्यासाठी केला जातो. त्याची रचना अशी असते - खाली-वर बावकाडे असतात. खालच्या वरच्या बावकाडाला भोक पाडून लाकडं ताशीव नक्षीदार उभी केली जातात. त्याला करूळ म्हणतात. करूळाच्या वर एक बावकाड असतं त्यामध्ये करूळी फिट केली जातात. ज्यामुळे साठीची उंची वाढते व शेतीचा जास्त माल बसतो. साठीला खाली आडवी लाकडं टाकली जातात. त्याला तरसे म्हणतात.त्यावर फळ्या टाकल्या जातात. ज्यामुळे साठीतला माल वाहतूक करताना खाली पडत नाही. 

धाव -
बैलगाडी ओढण्यासाठी दोन चाकांची गरज असते. चाक दणकट होण्यासाठी साठीच्या खाली एक बूट असतं, त्यावर लोखंडी कणा ठेवला जातो. तो कणा साठीच्या बाहेर गोलाकार लाकडू असते, त्याला मणी म्हणतात. त्या मण्यामध्ये कणा बसवला जातो. मण्याला लहान-लहान भोकं असतात. त्यामध्ये आर लाकडाच्या उभ्या दणकट पट्ट्या बसवल्या जातात. त्या आर्‍यामध्ये बसवतात. आर झिजू नयेत म्हणून त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते त्याला 'धाव' म्हणतात. 

ढकली -
बैलगाडीच्या साठीच्या पुढच्या तोंडाला एक आडवं लांब लाकूड लावलं जाते त्याला 'ढकली' म्हणतात. या ढकलीचा उपयोग बैल पाठीमागे सरकायला लागला तर तो ढकलीमुळे मागे सरकणे थांबतो. 

दांडी -
बैलगाडीसाठी चाकं तयार झाली की ती ओढण्यासाठी बुट्याला साठीच्याखाली जो चौकोनी लाकडाचा ठोकळा असतो त्याला तीन भोकं पाडली जातात त्यामध्ये तीन साठीपेक्षा ५/६ फूट लांबीची लाकडं बसवली जातात. त्यावर जू ठेवलं जात. जू आणि बूट याला यटक घातलं जातं. त्यात बैल जोडून गाडी ओढली जाते. त्यास 'दांडी' म्हणतात. 

आळदांडी -
गाडीला ज्या तीन दांड्या बसवल्या जातात. त्यापैकी दोन ज्वापेक्षा थोड्या लांब असतात. तिसरी दांडी ज्वापेक्षा कमी लांबीची, पण ज्वापर्यंतच्या लांबीची असते. या आळदांडीमुळे जू मागे सरकत नाही आणि यटकामुळे पुढे सरकत नाही, त्यास 'आळदांडी' म्हणतात. 

पिळकावणं -
गाडीला किंवा कोणत्याही औताला जे यटाक घातलं जातं ते ढिले राहू नये म्हणून दोन-फूट लांबीचा लाकडाचा दांडा चरकात घालून पिळलं जातो, जेणेकरून यटाक ढिल होत नाही. त्याला 'पिळकावणं' म्हणतात.

जूपणी, खिळ -
जूला दोन्ही बाजूला शेवटच्या टोकाला दोन भोकं पाडलेली असतात. त्यात दोन-तीन फूट लांबीचा लाकडी दांडा घालून वरच्या बाजूला जराजाड ठेवला जातो. जुपणीला बारीक रस्सीनं विणलेला ३/४ फुटाचा पट्टा बांधलेला असतो. जेव्हा बैल गाडीला जुंपतात, तेव्हा जू उचललं जातं. बैल जू खाली घेतात ज्वाच्या भोकात दोन्हीबाजूला जुपण्या बसवतात व जुपणीला घेऊन जुपणीत अडकवला जातो.जेणेकरून बैलगाडी चालू झाल्यानंतर बैल इकडं-तिकडं हलत नाहीत. बैल सरळ चालतात. त्यामुळे इकडे-तिकडे झाल्यास खिळ बसते म्हणून 'जुपणी किंवा खिळ' म्हणतात.

बूट -
बैलगाडीच्या साटीला आधार व दोन चाक जोडण्यासाठी त्यावर कणा ठेवला जायचा. असे चौकनी लाकूड असायचे त्यालाच बैलगाडी ओढण्यासाठी दोन दांड्या जोडल्या जायच्या त्याला 'बूट' म्हणायचे. 

हिसकी -
खाली वाय आकार असलेली परंतु लांब काठी असते. त्या काठीचा उपयोग कोणतीही वस्तू दाबून धरण्यासाठी केला जातो त्याला 'हिसकी' म्हणतात. 

कोळप -
पिकाची आंतर मशागत करण्यासाठी व पिकातील तण काढण्यासाठी ज्या औताचा उपयोग केला जातो त्याला 'कोळप' म्हणतात.

फड -
फड तीन प्रकारचे असतात जेथे तमाशा असतो तो तमाशाचा फड, जेथे कुस्त्या चालतात त्याला कुस्त्यांचा फड, जेथे ऊस तोडतात त्या शेताला ऊसाचा फड म्हणतात. 

पास -
पूर्वी शेतातील तण गवत काढण्यासाठी कुळव किंवा फरांदीचा वापर केला जायचा. त्याला दोन जानावळी असायची त्याला 'पास' जोडलेली असायची. त्यामुळे जमिनीतून खालून गेल्याने गवत तण मरून जाते. 

वसाण -
शेतात कुळव चालवताना कुळवाच्या किंवा फरांदीच्या पासत गवत अडकून पास भरकटायची जे अडकलेले गवत असायचे त्याला 'वसाण' म्हणत. 

उंडकी -
पूर्वी पेरताना तीन किंवाचार नळ असायचे. पेरताना एखाद्या नळातून बी पडत नसेल तर त्याला 'उंडकी' म्हणायचे.

आडणा -
वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये, त्यास 'आडाण' म्हणतात. 

फण -
कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात 'फण' बसवला जातो. फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.

भूयट्या -
जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं. त्याला 'भूयट्या' म्हणतात.

रूमण -
औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला 'रूमण' म्हणतात.

उभाट्या -
जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला 'उभाट्या' म्हणतात.

खांदमळणी -
बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला 'खांदमळणी' म्हणतात.

कंडा -
बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला 'कंडा' म्हणतात. 

चाळ -
बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला 'चाळ' म्हणतात. 

शेंट्या -
बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी' शेंट्या' बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात. 

झूल -
बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते. त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला 'झूल' म्हणतात.

आंबवणी, चिंबवणी
शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस, लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला 'आंबवणी' व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला 'चिंबवणी' म्हणतात. 

वाफा, सारा -
कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला 'वाफा' म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला 'सारा' म्हणतात.

मोट -
पूर्वी शेतीला पाणी पाजण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लागण्यापूर्वी मोटेचा वापर करत असत. मोट म्हणजे जाड पत्र्याचे एक चौकोनी साधारण ५० लीटर पाणी बसेल असे भांडं तयार करायचे, त्याला खाली तळात एक चौकोनी बोगदा ठेवला जायचा. त्यावर आत मोटेमध्ये उघडझाप होईल असे झाकण असायचे. विहिरीच्या एका भिंतीला दोन उभी व एक आडवं लाकूड कायम केलेले असायचे. त्याच बाजूला जमिनीवर उताराचा भाग तयार केलेला असायचा त्याला धाव म्हणत. जे आडवं लाकूड असायचं त्याला एक चाक बसवलेले असायचं. मोटेच्या वरच्या बाजूला एक साखळी असायची त्याला नाडा बांधायचा. (नाडा म्हणजे जाड ५०/ ६० फूट लांबीचा कासरा) मोटेच्या खालच्या बाजूला एक साखळी असायची त्याला सोल बांधले जायचे नंतर मोट विहिरीत सोडायची. त्याला दोन बैल जोडलेले असायचे. बैल धावेवरून मागे सरत आले की मोट पाण्यात बुडायची. मोट पाण्यात बुडली की मोटेत आत उघडझाप होणारे जे झाकण असते ते उघडायचे. मोट पाण्याने भरली की नाडा, सोल यांना ताण यायचा. मोट भरली कीबैल धावेवरून पुढे हाणायचे. मोट विहिरीच्या वर आली की पाणी थारोळ्यात पडायचे. (थारोळं - दगडी बांधकाम केलेला चौकोनी हौद) ते पाणी पाटात, शेतात जायचं. पुन्हा मोट मागे बैल सरकवत न्यायची. पुन्हा वर आणायची ही क्रिया दिवसभर चालवून शेताला पाणी दिलं जायचं.

पांद -
शेतात जाण्यासाठी दोन्ही बाजूला झाडी आणि मधून चिखलमातीचा जो रस्ता असतो त्यास 'पांद' म्हणतात 

व्हाण -
पूर्वी चटणी तयार करण्यासाठी किंवा कालवणाचा मसाला तयार केला जायचा ते जमिनीत रोवलेला मध्ये खोलगट भाग असलेला मोठा दगड असतो, त्यास 'व्हाण' म्हणतात. ते खोलगट असून मसाला बारीक करण्यासाठी लाकडी मुसळाचा किंवा लोखंडी ठोंब्याचा वापर केला जायचा.

मांदान -
स्वयंपाक करताना खरकटं पाणी टाकण्यासाठी चुलीजवळ एक चौकनी खड्डा केला जायचा. त्याला पांढर्‍या मातीचे प्लॅस्टर केलं जायचं त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नव्हतं. त्या मांदानात खरकटं पाणी टाकलं जायचं त्याला 'मांदान' म्हणतात. 

दुपाकी घर -
मध्ये उंच भाग त्याला आड म्हणतात. त्या आडाच्या दोन्ही बाजूला उतरता पत्रा किंवा कौलं टाकून पाणी पडण्यासाठी जे घर असते ते 'दुपाकी'

पडचीटी -
दुपाकी घराला लागूनच एकाच बाजूला पाणी पडेल असा जो निवारा केला जातो, त्यास 'पडचीटी' म्हणतात. 

वळचण -
घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते, त्यास 'वळचण' म्हणतात. वळचणीला जनावरे, लोक निवार्‍याला उभी राहतात.

गुंडगी -
गाडग्याचा सर्वात छोटा अवतार 

उतरंड -
'उतरंड' म्हणजे उतार. घरात ज्या छोट्या-छोट्या वस्तू असायच्या त्या या गाडग्यात भरून उतरंडीला ठेवायच्या. उतरंडीची रचना सर्वात मोठं गाडगं तळात नंतर लहान, लहान असे ठेवत १०/११ गाडगी एकावर एक ठेवायची व शेवटच्या गाडग्यावर झाकण म्हणून गुंडगीचा उपयोग व्हायचा. 

पाभरी -
पितांबराच्या वर नेसण्याचे वस्त्र असते.

कणगी-
कळकाच्या कांब्यापासून पिंपासारख्या आकाराचे धान्य ठेवण्यासाठी केलेले असते, त्यास 'कणगी' म्हणतात. आतून बाहेरून शेणाने सारवले जायचे. 

कणगूले -
कणगीचा छोटा आकार परंतु जाडीने जास्त. 

टोपलं
पूर्वी भाकरी ठेवण्यासाठी कळकाच्या कांब्यापासून घमेल्याच्या आकाराचे तयार केलेले असे, त्यास 'टोपलं' म्हणतात. 

चुलवाण -
उसापासून गूळ तयार करण्यासाठी गोलाकार आतून पोकळ उंच असा भाग बांधलेला असतो त्याच्या एका बाजूला जळण टाकण्यासाठी दरवाजा ठेवलेला असतो, त्यास 'चुलवाण' म्हणतात. 

काहिल -
'काहिल' लोखंडी मोठी कढई सारखी असते. ती चुलवाणावर ठेवली जाते. ऊसाचा रस तयार झाला की, तो काहिलीमध्ये टाकला जातो. नंतर चुलवाणाला खालून जाळ घातला जातो. पातळ रसाचे घट्ट गुळात रूपांतर होते. वाफा - गूळ तयार होत आला की, काहिलीला दोन लांब लाकडं अडकवली जातात आणि ७/८ लोकांनी ती काहिल ओढत आणून तयार झालेला गूळ वाफ्यात ओतला जातो. 

ढेपाळ -
गोलाकार पत्र्यापासून तयार केलेले असते. १ किलो, ५ किलो, १० किलो अशा वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यामध्ये गूळ भरण्यापूर्वी आतून तेल लावले जाते. ढेपाळ्यात गूळ भरतात. ढेपाळ्यात गूळ थंड झाल्यानंतर ते ढेपाळे पालथे केले की ढेप बाहेर येते.

बलुतं -
पूर्वी वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार, लोहार, तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना 'बलुतं' म्हणत. या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे. 

तरवा -
कोणत्याही रोपाची लागण करण्यापूर्वी वाफ्यामध्ये रेघा ओढून कांदा, वांगी, फ्लॉवर, कोबी जे पाहिजे त्याचं बी पेरलं जातं. पाणी दिल्यानंतर १०/१२ दिवसांनी ते दिसायला लागतं. त्याला 'तरवा' म्हणतात. 

लोंबी -
गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला 'लोंबी' म्हणतात.

सुगी -
ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही पीक काढायला आली की तो काढणींचा काळ होता त्याला 'सूगी' म्हणत. 

खळं -
कणसापासून ज्वारी तयार करण्यासाठी शेतात गोलाकार भागावरची माती काढून त्याच्या मधोमध एक लाकूड रोवलं जायचं. त्याला तिवडा म्हणत. माती काढल्यावर तिवड्याभोवती बैल गोलाकार फिरवला की जमीन कठीण व्हायची, त्यास 'खळं' म्हणता.  त्यावर त्यावर कणसं टाकून बैल गोलाकार फिरवून त्यातील सर्व ज्वारी निघाली की वावडीवर उभं राहून वाढवायची. 

माचवा -
पूर्वी ज्वारीच्या शेताची कणसं आल्यानंतर पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला माळा, त्यास 'माचवा' म्हणतात. 

वगळ -
ओढ्याचा छोटा आकार. 

शिंकाळं -
'शिकाळं' म्हणजे मांजर, उंदीर यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी दही, दूध, तूप हे तुळईला अडकवून ठेवण्यासाठी वाकापासून तयार केलेलं असत. 

गोफण -
शेतात ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी दगड-माती मारण्यासाठी रस्सी पासून तयार करतात त्यास' 'गोफण' म्हणतात. 

सपार / छप्पर
जनावरांच्या संरक्षणासाठी शेतात लाकडं व पालापाचोळ्यापासून तयार केलेलं घर म्हणजेच' सपार' 

बाटूक -
ज्वारीच्या शेतात ज्याला कणसं येत नाहीत त्याला 'बाटूक' म्हणतात. 

पिशी -
ज्वारीच्या कणसाचा हुरडा काढल्यानंतर जो भाग राहातो त्याला 'पिशी' म्हणतात. 

झापा -
शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी जे सपार तयार केलेलं असतं त्याला लावायचे दार म्हणजे 'झापा'.

माळवं -
शेतात केलेला भाजीपाला 

पावशा -
पूर्वी एखाद्या वर्षी पाऊस कमी असेल तर खेडेगावात सर्व मुलं एकत्र जमत. गावाबाहेर जाऊन एखाद्या मुलाला नग्न करायचे. त्याच्या कमरेभोवती लिंबाचा पाला बांधायचा. यास 'पावशा' म्हणतात. डोक्यावर पाट ठेवायचा. पाटावर पिंड काढायची आणि गावात येऊन प्रत्येक घरापुढे ‘पावशा ये रं तू नारायणा’ हे गाणं म्हणायचं, मग त्या घरातील स्त्री पाण्याचा तांब्या व भाकरी घेऊन बाहेर येणार पाणी पायावर ओतणार आणि भाकरी चटणी देणार. सर्व जमवलेल्या भाकरी शेतात जाऊन खायच्या. 

कोठी घर -
वाड्यातले धान्याचे कोठार. 

परस
वाड्याच्या पाठीमागे मोकळी जागा असायची, 
त्यामध्ये छोटी-मोठी झाड असायची. 

पडवी -
वाड्यात मधल्या चौकासभोवार जो वाड्याचा भाग असायचा त्याला 'पडवी' म्हणत. 

भंडारी -
घराच्या भिंतीत, खूप रुंद असलेल्या भिंतीतच एक चौकनी पोकळ भाग ठेवला जायचा त्याला छोटी दार- कडीकोयंडा असायचा. यामध्ये घरातील महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायच्या. त्यास 'भंडारी' म्हणतात. 

आगवळ -
लहान मुलींचे केस लोकरीच्या धाग्याने वेणीसारखे बांधावयाचा धागा. 

वज्री -
आंघोळ करताना अंग घासायची घासणी.

कथळी -
चहाची किटली. 

चौपाळे -
सार्वजनिक जेवणात वेगवेगळ्या वस्तू एकाच भांड्यात ठेवून वाढल्या जायच्या ते भांडे.

बारनी -
खिडकीचा छोटा प्रकार असायचा त्याला 'बारनी' म्हणत.

शेजर -
पूर्वी ज्वारी, बाजरी, आरगड, गिडगाप अशी धान्याची पिकं काढली म्हणजे एकत्र ठेवली जायची. ती एकत्र ठेवण्यासाठी कडब्याच्या पेंढ्या बांधून पेंढ्या एकावर एक ठेवून खोलगट चौकोन तयार केला जायचा त्याला 'शेजर' म्हणायचे. 

बुचाड -
पूर्वी पीक काढल्यानंतर वाटायला वेळ नसेल तर कणसासह कडबा एकत्र लावला जायचा तो लावताना कडब्याच्या पेंढ्या खाली कणसं आणि वर बुडके असे लावले जायचे त्याचा आकार खाली रुंद आणि वर निमुळते असे त्रिकोणी आकाराचे लावले जायचे. जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावे याला 'बुचाड' म्हणतात. 

गंज -
पीक काढल्यानंतर त्यांची कणसं काढून झाली की पेंढ्या बांधल्या जातात. त्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या चार्‍यासाठी होतो म्हणून त्या पेंढ्या एकत्र केल्या जातात व त्या आयताकार रचल्या जातात. निम्म्यात गेल्यानंतर वरचा भाग त्रिकोणी केला जातो. जेणेकरून ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून त्याचे संरक्षण होते. त्याला 'गंज' म्हणतात. 

तलंग -
कोंबडीच्या लहान पिल्लाला 'तलंग' म्हणतात. 

कालवड, खोंड-
गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर 'कालवड' म्हणतात व पुल्लिंगी असेल तर 'खोंड' म्हणतात. 

रेडकू -
म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी 'रेडकू' आणि पुल्लिंगी असेल तर 'टोणगा/रेडा' म्हणतात.

दुरडी -
'दुरडी' कळकाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते. धान्यात माती, कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊनकिंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून जातो. 

टोपलं, हारा -
कळकाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात, मोठ असेल त्याला 'हारा' म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.

बाचकं -
धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात छोटं पोतं असते त्याला 'बाचकं' म्हणतात. 
 
झोळणा -
पूर्वी पंचमीला मुली नागोबाला जायच्या तेथे फेर धरून खेळ खेळायच्या जाताना लाह्या, फुटाणे, शेंगदाणे एकत्र करून झोळणा भरायचा व त्यातील भेटेल त्याला थोडं थोडं खायला द्यायचं. 'झोळणा' म्हणजे झोळीच्या छोट्या आकाराचा असायचा.

मोतीचूर -
हा एका ज्वारीचाच प्रकार आहे. परंतु हा 'मोतीचूर' तव्यात टाकून भाजला की त्याच्या पांढर्‍या लाह्या तयार होतात. लाह्या तयार होताना त्याचा ताडताड आवाज येतो. त्या तव्याच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याला फडक्याने दाबून धरले जाते.

इराक्तीला, मुतायला
पूर्वी लघवी हा शब्द प्रचलित नव्हता.
त्या वेळी स्त्रिया लघवीला जायचं म्हटलं की 'इराक्तीला' म्हणायच्या.

वटकावण, सोबणी
भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा. त्यालाच 'वटकावण' किंवा 'सोबणी' म्हणत. 

खंडी -
२० मणाची खंडी. 

मण -
४० शेराचा मण. 

पायली -
दोन आडबसीर्‍या म्हणजे पायली. 

मापटं -
एक शेर म्हणजे मापटं. 

चिपटं -
दोन चीपटं म्हणजे एक मापटं. 

कोळव -
दोन कोळवी म्हणजे एक चीपट.

सोमवार, ४ मे, २०२०

"साडे विषयी संक्षिप्त"

आपल्या मराठीत साडेतीन, साडेसाती, असे ‘साडे’ शब्द वापरले जातात. ते कसे ते पहा:-

१) साडेतीन शहाणे :- पेशवाईत सखारामबापू बोकील, विठ्ठल सुंदर आणि देवाजीराव चोरघडे तसेच नाना फडणीस हे चौघे सरदार 'साडेतीन शहाणे' म्हणून प्रसिद्ध होते. यापैकी पहिले तिघे हे युध्द कौशल्यात तसेच मुत्सद्दीपणात असे पूर्ण शहाणे होते. तर नाना फडणीस हे युद्ध कौशल्य अजिबात नसलेले परंतु प्रचंड मुत्सद्दी आणि कौटिल्य  नीतीचा उपयोग करण्यात मशहूर असे सरदार होते, म्हणून त्यांना अर्धे शहाणे म्हणत. असे हे चौघे सरदार साडेतीन शहाणे म्हणून प्रसिद्ध होते. यांनी पेशवाइला  फार चांगली साथ दिली.

२) साडेसाती :-  एखाद्या माणसाच्या जन्मराशीपासून १२, १ व २ या राशीत शनी असला म्हणजे या तीन राशीतून मार्गक्रमण करण्यास शनीला लागणारा काळ त्या माणसाला कष्टाचा जातो असे म्हणतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला शनीला २.५ वर्षे लागतात हे लक्षात घेतले तर या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या या तीन राशीत शनी साडेसात वर्षे असतो. म्हणून या काळाला 'साडेसाती' असे म्हणतात.

३) साडेतीन मुहूर्त :-  दसरा, दिवाळीची प्रतिपदा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाडवा) हे तीन पूर्ण मुहूर्त आणि अक्षय्य तृतीयेचा अर्धा मुहूर्त असे मिळून 'साडेतीन मुहूर्त' हे कोणतेही कार्य करायला उत्कृष्ट असे समजतात. या साडेतीन मुहूर्ताना मग ताराबल, चंद्रबळ, शुभ अशुभ वेळ, असे काही पाहावे लागत नाही.

४) साडेपंधरे :-  उत्तम प्रतीचे सोने असेल तर त्याला 'साडेपंधरे' असे संबोधतात.

५) साडेभावार्थी :-  मानभावी माणसाला अथवा ढोंगी साधूला 'साडेभावार्थी' म्हणतात.

६) साडेतीन पोशाख :- पूर्वी दरबारात कित्येक मोठाल्या अधिकाऱ्यांना १ पागोटे, एक शेला, पायजमा किंवा झगा याच्यासाठी महामुदी नावाच्या उंची वस्त्राचा तुकडा व पटक्यासाठी किनखापाचे अर्धे ठाण मिळून साडेतीन वस्त्रे देण्याचा रिवाज असे.  त्याला' साडेतीन पोशाख' असे म्हणतात.

-अॅड्. प्रवीण बाबर 

"प्रत्येक मनुष्याच्या मनातील कर्ण"

महाभारतात कर्ण ही व्यक्तीरेखा "असून अडचण व नसून खोळंबा"  या तत्वात बसणारी आहे.  मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे? मी अद्भुत आहे? आणि मी असामान्य व्यक्ती आहे? हे लहानपणापासून जाणले असतानाही त्या व्यक्तीरेखेनी स्वतःला संकुचित ठेवले.

तो अजेय होता, तसेच जो पर्यंत त्याच्याकडे कवच-कुंडले आहेत तो पर्यंत त्याला कोणीही युद्धात हरवू शकणार नाही याची जाणीव आसताना, त्याने दुर्योधनाने दिलेल्या राजपद  स्वीकारण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर मिळवण्याचा का प्रयत्न केला नाही? त्याने ठरवले असते तर कितीतरी राज्ये युद्धात जिंकून तो स्वामी होऊ शकला असता, त्याची तशी कधी महत्वाकांक्षा दिसून आलीच नाही. 

अचाट शक्ती व  शूरवीर असूनही स्वतःच्या कौशल्याने, वेळप्रसंगी  युद्ध करून जिंकून घेण्याचा त्याच्यात कधी मानस दिसला नाही. याला कारण ही कदाचित एकच होते, केवळ अर्जुनाशी वैर, कारण तोच एक धनुर्धर हा कर्णाशी लढाई करण्याच्या ताकदीचा मानला जात होता. जो पर्यंत कवच-कुंडले आहेत तो पर्यंत अर्जुनाने मारलेल्या कोणत्याच अस्त्राचा त्यावर प्रभाव होणार न्हवता हे माहित असूनही उगीचच अर्जुनाशी वैर दाखवून पांडव कुळाशी वैर केले. उलट अर्जुन माझ्याशी लढण्याच्या कुवतीचा नाही त्यामुळे मी त्याला माझा प्रतिस्पर्धी मानतच नाही, हे ठरवून पुढे गेला असता तर नक्कीच अजून मोठा झाला असता, किंबहुना महाभारतात कृष्णानंतर श्रेष्ठत्वात त्याचाच नंबर लागला असता. 

कर्ण मनात केवळ अर्जुनावर वैर धरून जगला इथेच चुकला, त्यामुळे त्याला इतर चांगल्या गोष्टींची जाणीव झालीच नाही, किंबहुना स्वतःच्या कोशात अडकून राहिला, अगदी शेवटी सुद्धा जेव्हा कुंती त्याला सर्व काही सांगते, त्या नंतरही तो तिला एकच उत्तर देतो, तुझे पाच पांडव जिवंत राहतील. त्याच्या याच गुणांचा गैरफायदा दुर्योधनाने घेतला, व त्याला स्वतःच्या बचावासाठी  वापरून घेतले. 

प्रत्येकाच्या मनात असाच एक कर्ण लपलेला असतोच. कर्ण आहे म्हणजे कवच कुंडले आलीच ना! ही कवच कुंडले म्हणजे, आपले चांगले गुण, आपल्यात दडलेली उत्कृष्ठ कला, जसे चित्रकला, गायन, मैदानी खेळाडू, संगीत, लेखन, अभिनय, भाषण, किर्तन, या शिवाय चिकाटीने कोणत्याही विषयावर अभ्यास करण्याची वृत्ती, हे गुण असतानाही त्याकडे लक्ष न देता, आपण आसपास एक अर्जुन शोधत असतो ज्याच्याशी  हेवेदावे, असूया, राग, रुसवा, द्वेष, मत्सर, करत असतो यात आपले वाईट गुण  चांगल्या गुणांना दाबून वर उफाळून येतात, त्यामुळे चांगल्या गुणांचा स्वतःच्या उद्धारासाठी कसा फायदा करून घेता येईल हे न ओळखता, उगीच क्लेषदायी जीवन जगतो, यातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा अनेक संधी आपण केवळ वेगळाच विचार करत असल्यामुळे सुटून जातात किव्वा सोडून देतो. बहुतेक वेळेस द्वेषामुळे बदला घेण्याची वृत्ती जागी होते, आणि प्रतिशोध घेण्याकडे कल जातो, त्यातून अघटित घडते, म्हणजे ज्यावर लक्ष केंद्रित करायला हवे ते न करता दुसरीकडे उत्तर शोधत फिरतो, त्यामुळे ही आपण अपयशाचे धनी होतो.

असा कर्ण मनात ठाण मांडून असल्यामुळे, समाजातील दुर्योधन, शकुनी मामा त्यांना जवळ करतात, आणि मग सुरु होते अभद्र युती, जी नेहेमीच विनाशाकडे घेऊन जाते.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

"चहाचे नाना प्रकार"

"चहाचे प्रकार"

हवा हवासा वाटणारा गरमागरम चहा. पण चहा पिणे हे जरी शरीरासाठी हितकारक नसले तरी बहुतेकांची सकाळची सुरुवात मात्र चहा घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही. चहा घेतल्यावर आपल्याला अगदी ताजेतवाने वाटते. कारण चहाचा गुणधर्म तसा आहे. हल्ली आपली जीवनशैली बदललत चालली आहे. बदललेल्या जीवनशैलीनुसार अनेक वेगवेगळ्या प्रकारे चहा करता येतो. 

आयुर्वेदिक मसाला चहा पावडर कशी बनवावी? 

चहाचा मसाला हा चहा बनवत असताना दोन कप चहा साठी पाव टीस्पून टाकायचा म्हणजे चहा कडक व चविष्ट लागतो. बहुतेक हा चहा थंडीत किंवा पावसाळ्यात बनवतात. तसेच सर्दी पडसे किंवा खोकला झाला असल्यास घ्यावा त्यमुळे घशाला शेक बसतो व बरं वाटते. 

साहित्य : ३० ग्रॅम सुंठ पावडर, १ टीस्पून काळी मिरे पावडर, दालचिनी, १ टीस्पून पांढरी मिरे पावडर, दहा ग्रॅम हिरवे वेलदोडे, चिमुठभर जायफळ पावडर. 

कृती : प्रथम तवा गरम करून वरील सर्व साहित्य अगदी कमी आंचेवर गरम करून घेऊन मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. मंग तयार झाला 'आयुर्वेदिक चहा मसाला'. 

चहा करण्याचे काही नावीन्यपूर्ण वेगळे प्रकार देत आहोत; जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. पुदिना, लिंबू, आले, वेलची, दालचिनी, मध, हळद, पेरूची पाने, मसाले वापरून ते केले आहेत. खास बोलायच झालं तर येवले अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, साईबा चहा, हरमन चहा, इ. प्रकारचे चहा हे अमृतुल्य झालेत. 

अमृततुल्य चहा 

अमृततुल्य चहा हा खूप लोकप्रिय झालाय. खास करून येवले चहा. हा चहा थोडा दाट असून थोडा गोड असतो. यामध्ये दूध, दर्जेदार चहा पावडर, चहाचा मसाला, साखरसुद्धा नेहमीपेक्षा जास्त असते. अशा प्रकारचा एक कप चहा घेतला तरी छान फ्रेश वाटते.

साहित्य :  एक कप पाणी, एक कप दूध, ४ टीस्पून साखर, १ टीस्पून चहा मसाला, २ टीस्पून दर्जेदार चहा पावडर. 

कृती : प्रथम एका भांड्यात दूध व पाणी मिक्स करून गॅस स्टोव्हवर गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा मसाला, साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्यावे. गरमागरम अमृततुल्य चहा बिस्कीटे किवा खारी, तोष बरोबर घेतलास मजा काही औरच. 

आयुर्वेदिक चहा

अशा प्रकारचा चहा बनवताना जिरे, धने, व बडीशेप वापरले आहे. 'आयुर्वेदिक चहा' हा आपण रोज सकाळी घेण्याची सवय केली, तर आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.त्यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जातील व आपले शरीर निरोगी बनेल व आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल. धने-जिरे व बडीशेप यामध्ये असे गुणधर्म आहेत, की आपल्या शरीरातील नको असलेले घटक निघून आपले पोट साफ होईल. तसेच आपल्याला वजन कमी करण्यास मदत मिळेल. अजून याचा एक फायदा म्हणजे धने-जिरे वापरून बनवलेले पाणी आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते.

 साहित्य : दोन कप पाणी, पाव टीस्पून - जिरे, धने, बडीशेप

कृती : एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये धने-जिरे व बडीशेप घालून ५ मिनिटे गरम करायला ठेवावे. मग विस्तव बंद करून चहा गाळून मग सर्व्ह करावे.

गवती चहा

सर्दी–पडसे, अंगदुखी व आमवात अशा अनेक प्रकारच्या व्याधींवर गवती चहा उपयुक्त आहे.

साहित्य: २ चहाचे कप पाणी, अडीच कप दुध, ३ ते ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, १/२ टिस्पून किसलेले आले किंवा ४ पाती गवती चहा.

कृती:  दुध आणि पाणी पातेल्यात एकत्र करा. साखर आणि आले, गवती चहची पाती कापून घालून मोठ्या आचेवर पातेले ठेवावे. दुध-पाणी वाफाळायला लागले, की त्यात चहा पावडर घालून आच मध्यम करावी. मिश्रण उकळल्यावर उतू जाते. म्हणून चहाकडे सतत लक्ष ठेवावे. चहा १-२ मिनिटे उकळू द्यावा. गॅस स्टोव्ह बंद करून चहा मिनिटभर झाकून ठेवावा. नंतर गाळून गरम गरमच देण्यात यावा.

लिंबू चहा 

आपल्याला हा चहा घेतल्याने ताजेतवाने वाटते. ह्या चहाची चव आंबट लागते. त्यामुळे आपल्या नेहमीच्या चहापेक्षा चवीस्ट लागतो. पण हा चहा थंड असतो. त्यामुळे आपण जेव्हा गरम वाटते, तेव्हा तो बनवतात. काही जण हा चहा कधीही घेतात. यास 'डाएट चहा' पण म्हणतात. 

साहित्य : चार कप पाणी, चार टीस्पून चहा पावडर, चार टीस्पून लिंबूरस, आठ टीस्पून साखर, १० बर्फाचे तुकडे, १०  पुदिन्याची पाने, कापलेल्या लिंबाची पातळ चकती. 

कृती : एका भांड्यात ४ कप पाणी गरम करून घ्यावे. त्यामध्ये चहा पावडर, पुदिना पाने, साखर घालून ५ मिनिटे चहा उकळून घेऊन; दुसऱ्या भांड्यात गाळून थंड करायला ठेवावे. चहा थंड झाल्यावर त्यामध्ये लिंबूचा रस टाकावा. चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये बर्फ, पुदिना पाने व लिंबाची एक चकती घालून सजवून ठेवावा.

इराणी चहा 

हा चहा बनवायला पाऊन तासाचा कालावधी लागतो. इराणी चहा घट्ट केलेल्या दुधापासून तयार होतो. एका  पातेल्यात दूध उकळवले जाते. हा चहा बनविण्यासाठी दोन पातेली वापरली जातात.

साहित्य: ३ चहाचे कप पाणी,  आर्धा लिटर म्हशीचे दुध, ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, ४ टिस्पून चहा पावडर, ३ वेलची, २ टेबल स्पुन मलई क्रिम किंवा मावा.

कृती: एका टोपात पाणी, वेलची, साखर आणि चहा पावडर टाकून उकळवले जाते. दुसऱ्या टोपात घट्ट केलेले दूध उकळवले जाते. या दुधात मलई क्रिम किंवा मावा टाकला जातो. दोन स्वतंत्र भांड्यात दूध आणि चहाचे मिश्रण उकळवले जाते आणि चहा देण्यापूर्वी ते एकत्र करून दिले जाते. हा चहा लगेच थंड होत असल्याने तो लगेच प्यावा लागतो. इराणी चहा करताना गॅस कधीच बंद होत नाही. सतत तो उकळवला जातो त्यावर झाकण ठेवून वजन ठेवले जाते. गॅस बंद झाला तर प्रमाण चुकते आणि चहाची चव निघून जाते. 

काळा चहा

हा चहा इतर चहांपेक्षा चवीला कडवट असतो. काळा (ब्लॅक) टी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो. नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते.

साहित्य: २ चहाचे कप पाणी,    साखर चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, लिंबाची एक फोड. 

कृती: एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा, त्यानंतर चहा टाका. साखर चवीनूसार घालून चहा चांगला उकळवा. नंतर गाळून कपात ओता. त्यात लिंबाची फोड पिळा.  यात कोणत्याही प्रकारचे दूध टाकत नाहीत.

बासुंदी चहा 

बासुंदी चहा अजून येवढा प्रचलित नाही. पण त्याची एक विशिष्ट टेस्ट असते. हा चहा थोडा घटट असून गोड असतो. हा एक कप चहा घेतला तरी छान ताजेतवाने वाटते.

साहित्य :  एक कप पाणी, दीड कप दूध, दोन टीस्पून साखर, १ टीस्पून चहा, ४ सालीसकट वेलदोडे. 

कृती : प्रथम एका पातेल्यात दूध ओतून उकळी येईपर्यंत तापवावे व पाणी मिक्स करून गॅस स्टोव्हवर गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये  साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्यावे.नंतर वेलदोडे टाकून चहास उकळी येवून द्यावी. पुन्हा थोड्यावेळाने उकळी येवू द्यावी. चहा घट्ट दिसू लागला की समजायचा बासुंदी चहा तयार झालाय.

ज्यांना साय आवडते त्यांना हा चहा खुप आवडतो.

काश्मीरी कावा चहा 

काश्मीर म्हटले, की तेथील सृष्टिसौंदर्य व काश्मीरमधील थंडीसुद्धा आठवते. काश्मीरमध्ये खूप थंडी असते त्यामुळे तेथील रहिवासी थंडी कमी करायला कावा म्हणजेच आपल्या भाषेत मसाला चहा बनवतात. या मसाला चहाची चव अगदीच निराळी लागते. तसेच त्यामध्ये दालचिनी, केसर, हिरवे वेलदोडे, मीठ, खायचा सोडा व साखर वापरण्यात येतो.  आम्ही काश्मीरमध्ये कावा टी पिला आम्हाला तो खूप आवडला. 

साहित्य : दोन कप पाणी, दोन टीस्पून साखर, एक टीस्पून काश्मिरी चहा पावडर, ४ हिरवे वेलदोडे, अर्धा तुकडा दालचिनी तुकडा, एक चिमूट खायचा सोडा, एक चिमूट मीठ, ५-६ काड्या केशर, बदामाची पावडर. 

कृती : पाणी, साखर, वेलदोडे, दालचिनी, काश्मिरी चहा, मिक्स करून पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर उकळून घ्यावे. मग त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्स करून दोन मिनीटे गरम करून गाळून घ्यावा. गरम गरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना चहाच्या वर  बदाम व केशर पावडरने सजववावा.

आल्याचा चहा 

आल्याचा चहा घेतल्याने, सर्दी पडसे कमी होण्यास मदत होते.  तसेच यामुळे आपली रोग प्रतिकारशक्तीपण वाढते.

साहित्य : दोन कप पाणी, ४ टीस्पून साखर, २ टिस्पून चहा पावडर, आल्याचा तुकडा कुटून घेणे, एक कप दुध. कृती : एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये साखर व चहा पावडर टाकावी. नंतर कुटलेले आले घालून चांगली उकळी येऊ द्यावी. दुध घालून पुन्हा उकळी येवून द्यावी. नंतर सर्व्ह करावे. आपल्या घशाला शेक मिळून सर्दी पडसे कमी होण्यास मदत होते. 

आले, लिंबू व मधाचा चहा

अशा प्रकारचा चहा बनवताना आले किसून, लिंबूरस, व साखरेऐवजी मध वापरला जातो. यामुळे आपले शरीर निरोगी राहते व रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपल्या त्वचेला चकाकी येते. आल्यामुळे आपल्या पोटातील गॅंस निघून आपले पोट साफ होते. सकाळी उठल्यावर अशा प्रकारचा चहा घेतला तर फायदेशीर असते. 

साहित्य : दोन कप पाणी, १ टीस्पून ग्रीन टी चहा पावडर, अर्धे लिंबू (रस काढून) एक मध्यम आल्याचा तुकडा (किसून), अर्धा टेबल स्पून मध.

कृती : दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा पावडर, आले घालून १० मिनिटे गॅस स्टोव्हवर उकळून घ्यावे. नंतर गाळून थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस व मध घालून मिक्स करून देण्यात यावे. 

पुदिन्याचा चहा

पुदिन्याचा चहा पिल्याने पोटदुखी थाबते. पोटातील रोग दूर होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. चेहऱ्यावरील पिंपल ठीक होतात, आपली त्वचा थंड राहते व उजळून येते.  पचनशक्ती सुधारून वजन कमी होते. हा चहा खूप गुणकारी आहे, 

साहित्य : दोन कप पाणी, अर्धा टी स्पून मिरे (जाडसर कुटून), अर्धा टीस्पून काळे मीठ, १०-१२ पुदिना पाने

कृती : प्रथम पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्यावी. एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये पुदिना पाने, मिरे, काळे मीठ घालून १० मिनिटे गॅसस्टोव्हवर चहाला उकळी येऊ द्यावी. 

पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन पोटदुखी थांबते. 

तंदुर चहा

तंदुर चहा बनवायला तसा फार अवघड नाही. आपण नेहमीचा चहा जसा बनवतो अगदी तसाच तंदुर चहा ही बनवायचा आहे. मात्र तंदुर चा फ्लेवर देण्यासाठी आपल्याला मातीचे कप आणि कोळसाचे तुकडे लागणार आहेत.

साहित्य: २ चहाचे कप पाणी, अडीच कप दुध, ३ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, ३ कोळसाचे तुकडे, २ मातीचे कप. 

कृती: सर्वप्रथम पाणी, प्रमाणानुसार दुध, आवश्यकतेनुसार साखर आणि चहा पत्ती टाकून नेहमीप्रमाणे गॅसवर चहा बनवायला ठेवावा. त्यानंतर ३ कोळश्याचे टुकडे शेगडीवर गरम करुन घ्यावेत. नंतर गरम झालेल्या कोळसांवर मातीचे कप गरम करायला ठेवावेत. त्यानंतर पॅन किंवा भांडे घ्यावून ते थोडेसे गरम करावे. गरम भाड्यात मातीचे कप ठेवून त्यात तयार झालेला चहा ओतावा. मातीच्या गरम कपातील चहा पुन्हा दुस-या कपात ओतावा. बस्स. झाला गरमागरम तंदुरी चहा तयार.

जेव्हा उकळणार चहा त्या गरम कपांमध्ये ओतला जाईल त्यावेळी त्या मातीचा स्वादही त्या चहामध्ये उतरेल. चवीला अत्यंत वेगळा असणारा हा चहा सर्वांना फार आवडतो.

बदाम पिस्ता चहा

हा श्रीमंताचा चहा म्हणून प्रसिद्ध असून बदाम, पिस्ता व वेलची युक्त असतो. हा चहा लज्जतदार असून तलफ भागवतो. 

साहित्य: १ कप पाणी, १ कप मलई दूध, ३ टी स्पून साखर, ४ टी स्पून चहा पावडर, केशर, बदाम आणि पिस्ता याची पुड, २ वेलची.

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा टाका. उकळी आल्यावर केशर टाका. पुन्हा उकळी काढा. एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्या. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.

पेरू चहा 

या चहाला पेरू सुगंध येतो. 

साहित्य : दोन कप पाणी, ४ टीस्पून साखर, २ टिस्पून चहा पावडर, ४ पेरूच्या झाडाची बारिक पाने कापून कुटावित, एक कप दुध. कृती : एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये साखर व चहा पावडर टाकावी. नंतर कुटलेले पण पेरूची पाने टाकून चांगली उकळी येऊ द्यावी. नंतर सर्व्ह करावे. ह्या चहास पेरूचा सुगंध येतो.

-अॅड्. प्रवीण बाबर 


बुधवार, १५ एप्रिल, २०२०

"लॉकडाऊनचा सदुपयोग कसा करून घ्यायचा"

कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना घरात वेळ कसा घालवायचा ही समस्या अनेकजणां समोर दिसते. आपण काही गोष्टी केल्या तर आपला वेळ चांगला तर जाईलच पण ज्ञानातही भर पडेल.

वेळे अभावी आपल्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील, तर तुम्ही त्या गोष्टींना या काळात वेळ देऊ शकता.

लॉकडाऊनच्या कालावधीत आपण वेळेचा सदुपयोग करू शकतो. घरबसल्या ऐतिहासिक, पौराणिक, शास्त्रीय, विनोदी, धाडसी शौर्यकथा, चालूघडामोडी अशा साहित्याचे वाचन करा.  जमल्यास लेखन करण्यास हरकत नाही. आळसात वेळ घालवण्यापेक्षा घरामध्ये असलेली बरीच पुस्तके वाचावीत.

विविध प्रकारचे पाकक्रिया बनवण्यास शिका, लहान मुलांना चहा, नाष्टा इ. बनवण्यास शिकवावे. अंगी असलेले छंद जोपासावेत. नवीन भाषा शिकता आली तर शिकावी. घरातील साफसफाई करावी, कपडे इस्त्री करून ठेवावीत.  जुनी विजीर्ण कपडे बाजूला काढून टाकावीत. आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

टीव्हीवर चांगले कार्यक्रम असतात त्यात एक मनोरंजन खेळ, गाणे ऐकावीत.  बुद्धीबळ, ल्यूडो, चल्लस, पत्ते, कॅरम, इ. सारखे विविध प्रकारचे खेळ खेळावेत. गाणी ऐकावीत, त्यातील बोल जाणुन घ्यावेत, गाणी गावीत, गाण्याच्या भेंड्या खेळाव्यात. डिस्कवरी, अॅनिमल प्लानेट, हिस्टरी चॅनेल पहावेत. तसेच युट्यूबवर सुद्धा हवा तो प्रोग्रॅम आपण लावून आपल्या ज्ञानात भर पाडू शकता.

तसेच, ज्या व्यक्तिंना रुची आहे ते कार्यक्रमही आपण युट्युबवर हवे तेव्हा लावू शकता. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मोटिवेशन व्हिडिओ पाहावेत जेणेकरून आपणास सकारात्मक प्रेरणा मिळेल. 

लॉकडाऊनमुळे आपण घरात बंदिस्त झालात. जेवणे, झोपणे याव्यतिरिक्त आपण शारीरिक फिटनेस याकडे दुर्लक्ष करता कामा नये. घराल्या घरात जेवढे जमेल तसे सुर्यनमस्कार, योगा, दोरी उड्या, झुम्बा फिटनेस, चालणे, इ. करू शकता. यामुळे आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ रहाते.

लॉकडाऊनच्या कालावधीत रोज नियमित व्यायाम करत रहावे. देशातील करोनाशी संबंधित माहिती घेत जा. अफवा पासून दूर राहा. वास्तव जाणून घ्या. 

मिळालेल्या क्षणांचा सदुपयोग करावा..

एकदा का वेळ निघून जर गेली.. 

मग लागतं वाट बघत बसावं..

आणि येवू शकते पदरी नैराश्य…

गर्दी टाळा, प्रशासनाला योग्य ते सहकार्य करा आणि कोरोना होणार नाही याची खबरदारी घ्या.

- अॅड्. प्रवीण बाबर


मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

"आवाज"


समुद्राची गाज, ढगांचा गडगडाट,वीजेचा कडकडाट, रेल्वेच्या रूळांचा खडखड आवाज, नदीचं खळंखळणं, पानांची सळसळ, खिडक्यांच्य़ा तावदानावरची वाऱ्याची आत येऊ का विचारणारी साद, पहिल्या पावसाची मृद्गंधापूर्वी येणारी टपटप अशी चाहूल, मंदीरातला घंटानाद, लताचा पवित्र स्वर, जगजीतचा धीरगंभीर आवाज, बाळाचे पहिले बोल, ओळखीच्या व्यक्तींचा आवाज, पावलांचा आवाज, सणावाराला होणारे त्या त्या सणांची ओळख सांगणारे आवाज असे अनेकोनेक श्राव्य आवाज ते अगदी वाळवंटातला ’अनाहत’ नाद… एक नं अनेक किती आवाज. एक एक करत मनात उतरतात आणि रूजून बसतात.

'मेरी आवाज ही पेहेचान है’ म्हणता यावं असा प्रत्येक माणसाचा आवाज वेगळा तशीच प्रत्येक गावांची, जागांची अशी ओळख ठरणारे आवाज असतातच, नाही का?

आवाजाची लय ठरते एखाद्या ठिकाणी रहायला लागल्यानंतर. नवी जागा ओळखीची होण्याच्या टप्प्यात आणि त्या जागेत रुळण्यात या आवाजांची एक साथ असते. काही ठळक अगदी जवळचे तर काही पुसटसे विरळ होत जाणारे आवाज. अस्तित्त्व मात्र दोघांचेही महत्त्वाचे. रेल्वेरुळांशेजारी रहाणाऱ्यांचे वेळापत्रक जसे जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेच्या वेळांशी बांधले जाते तसे मंदीराशेजाऱ्यांचे आरतीच्या वेळांशी बांधले जाते . नकळत घडणारी प्रतिक्षिप्त क्रिया खरं तर ही एक.

दिवसाच्या प्रत्येक प्रहराचे आगमन असे त्या त्या प्रहराचे विशिष्ट आवाज सांगतात. पहाट होता होता अलगद सरकवल्या जाणाऱ्या पडद्यांच्या आवाजाने उजेडालाच नव्हे तर बाहेरच्या जगातल्या निरनिराळ्या आवाजांनाही कवाडं उघडली जातात. एखाद्या ठिकाणी रहाताना हळूहळू त्यांचा क्रमही नकळत मन नोंद घेत जाते. घरातला शांततेचा ’नाद’ मागे सरत जातो आणि चढणाऱ्या दिवसासोबतच आवाजांचे चक्र फिरायला लागते. घरोघरच्या कपबशांच्या आवाजाने घरात सकाळ होते, मग क्रमाने होत जाणारा स्वैपाकाचा आवाज. मिक्सरमधल्या मसाल्यांचे दळणाचे आवाज, कामाला येणाऱ्या बायकांच्या लगबगीचे आवाज, दुधवाले, पेपरवाले, भाजीवाले इ. आवाज आणि फक्त आवाज… माणसांना झाली सवड तर ऐकतील आणि नसतील ऐकणार तर नसुदेत असे पक्ष्यांच्या सकाळच्या किलबिलाटाचे आवाज.

निरनिराळ्या गाड्यांचे हॉर्न्स सकाळी अगदी जोमात असतात, त्यांच्या मालकासारखीच त्यांनाही ऑफिसेसला पोहोचण्याची लगबग असल्यासारखे. मुलांच्या शाळांच्या बसेस, त्यांच्या गाड्यांच्या ड्रायव्हर काकांशी होणाऱ्या संवादांचे आवाज.

गावं बदलली, जागा बदलल्या तरी रहायला लागल्यानंतर सर्वसाधारण याच आवाजांनी ठरत जाते एखाद्या ठिकाणची ओळख. त्या त्या भागाचं व्यक्तिमत्त्व ठरवत जातात नकळत हे आवाज. सकाळचे आवाज हे धावपळीचे, साऱ्या दिवसाला आपल्या गर्भातून जन्माला घालणारी सकाळ अशी भारलेली, गतिमान. मिळालेल्या क्षणांवर दिवस कोरणाऱ्या घाईची सकाळ. 

शहरी जीवनाला सरावलेली सकाळ तर नक्कीच ही अशी…

धकाधकीच्या सकाळीतून शांत, प्रगल्भ काहीश्या रूक्ष दुपारीकडे दिवसाची वाटचाल होते आणि आकाशभर विखूरलेले आवाजाचे पक्षी काहीसे मंदावतात. अगदी संगीताच्या भाषेत सांगायचे तर सकाळच्या सुरांतून दुपारच्या सुरांवर दिवस उतरत जातॊ आणि या बदलत्या लयीची एक मींड साधली जाते. सकाळी उजेडासाठी सरकवलेले पडदे पुन्हा जागी नेऊन येणाऱ्या उन्हालाच नव्हे तर बाहेरच्या जगालाही, आवाजालाही थोपवणारी दुपार. वर्दळ थांबलेली नसते पण काहीशी पॉज मोडला मात्र नक्कीच जाते. सकाळइतके निश्चितच नाहीत पण संध्याकाळचे आवाज नक्कीच वाढलेले. संध्याकाळ परतीच्या पावलांची… थकल्या भागल्या तरीही घराच्या ओढीने वेगावलेल्या पावलांची. दिवसाचं देणं देता देता आवाज खोल गेलेली संध्याकाळ.

काही हवेहवेसे आवाज, काही अपरिहार्य तर काही इतके सवयीचे की जाणवूही नयेत असे आवाज….

डोळे मिटले तरी न थांबणाऱ्या आवाजांच्या प्रलयाने वेढलेलो असतो आपण. शहरीकरणाचे आवाज, यांत्रिकतेचे, कोलाहलाचे, गोंगाटांनी भरलेले आवाज.

टिव्हीवर विविध वाहिन्यांवर तारस्वरात होणाऱ्या चर्चा हे ही झगमगाटी आवाज. अर्थात हे तसं जरा जुनं चित्र म्हणावं लागेल. आजकाल या आवाजात भर पडलीये ती स्मार्टफोन्सवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सच्या आवाजांची. हा कोलाहल नवा असला तरी रुळलाय किंवा अगदी अविभाज्य झालाय अगदी झपाट्य़ाने. आपल्या प्रत्येकाचं हल्ली सोशल मिडियावर एक आभासी घर आहे, आणि मग तिथल्या आपल्या वावराने तसेच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या मंडळींच्या अस्तित्त्वानी त्या घराची ओळख ठरतं जाते. हे आवाज प्रत्यक्ष ऐकू आले नाहीत तरी जाणवतात मात्र नक्की. कधी कधी तर हे आवाज इतके वाढतात की त्यांचा गोंगाट असह्य होत जातो.

आवाजाच्या या कल्लोळात आवाज खूप आणि ऐकणारे कमी अशी परिस्थिती होत जाते. जगरहाटी चालताना आयुष्याच्या चाकांचा हा अपरिहार्य खडखडाट खरंतर… संवादाची, संपर्काची असंख्य साधनं तरीही माणसांचे माणसांशी होणाऱ्या संवादांचे आवाज हरवलेली अवस्था… या अवस्थेनी एक निराकार शुन्यत्त्व येत चाललय सगळ्यालाच. डोक्यात आवाजांचा महापुर आणि मन कोरे सुन्न असं काहीसं होत जातं.

इतने शोर में दिल से बातें करना है नामुमकीन,

जाने क्या बातें करते है आपस में हमसाये…

या सगळ्या आवाजातून बाहेर पडावेसे वाटते मग. ऐकावी वाटते शांतता. किंवा अगदी शांततेचाही आवाज नको…. साधावं असं काहीतरी की येईल स्वत:चाच आवाज स्वत:लाच. स्वरांच्या श्रॄती ऐकू याव्यात एखाद्या गाणाऱ्याला, तश्या स्वत:च्याच जगण्यातले हरवत चाललेले सूक्ष्म कण ऐकू यावेत स्वत:लाच.

आवाज नकोनकोसे होत असतानाच कुठूनतरी कोकिळेचा स्वर कानी पडतो… एखादं गाणं ऐकू येतं. शाळेतून घरी पोहोचलेल्या मुलांनी मारलेली हाक आपल्यापर्यंत पोहोचते आणि ’आवाज’ पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचू लागतात. अश्यातच मजरूहचा एक शेर आठवतो…

रोक सकता हमें ’जिंदान ए बला’ क्या मजरूह,

हम तों ’आवाज़ ’ है, दीवार सें छन जाते है !

’जिंदान ए बला’ म्हणजे तुरुंग, चारही बाजुंनी संकटांनी घेरलेला माणूस… संकटांनो तुम्ही चारही बाजुंनी आम्हाला घेरलत तरी आम्ही आवाज आहोत आणि या भिंती पार करून जोमाने पुढे जाऊ असं सांगणारा हा शेर. 'आवाज’ म्हणजे कोलाहल असे वाटू लागलेल्या आजकालच्या युगात जरा थबकावं वाटतं आणि आधीच असलेल्या जाणीवेला पुन्हा जागा मिळते की आवाज ही खरं तर किती भन्नाट देणगी आहे. आवाजाचं नातं पुन्हा गोडवा, माधुर्य, ताकद यांच्याशी जोडलं जातं. वाटतं आपलाच आवाज शोधावा पुन्हा आणि घ्यावी एक सुरेल तान स्वत:साठी. आवाजाच्या विचारांचा एक प्रवास करत ’आवाजाला’ पुन्हा एक परिमाण मिळते.

कोलाहलातून शोधावा खरा “आवाज “. गोंगाटातून शांततेच्या आवाजाकडे परतण्याची “मींड” साधावी. 

दैनिक पुण्य नगरी,  14.11.2016

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

"छंद"


'छंद' म्हणजे स्वत:ची लय. छंद म्हणजे स्वत:चा शोध. छंद म्हणजे स्वत:चा आणि इतरांचाही आनंद. खरंच,आपल्या आवडीनिवडींना,आंतरिक ऊर्मीना आयुष्यात जागा द्यायलाच हवी. या तरुण वयात एक तरी छंद जोपासावा, कारण तीच आपली खरी ओळख असते. त्यातूनच आपल्याला खरंखुरं समाधान मिळत असतं.

आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात छंद आपल्याला आनंद मिळवून देतात. छंद असणं हे वेगळंच रसायन असतं. काहींना वेगवेगळे छंद असतात. एकच छंद जोपासणे ही एका अर्थाने अवघड कला असते. छंद म्हणजे काय, असं विचारलं तर लोक म्हणतात की ही फावल्या वेळी करायची गोष्ट, रिकाम्या वेळेचा विरंगुळा. मला मात्र हे पटत नाही. मला वाटतं, छंद हीच तर आयुष्यात करायची मुख्य गोष्ट आहे. पुढे मग पोट भरण्यासाठी नोकरी, शिक्षण वगरे वगरे करावं लागतंच. पण आपल्याला खरी ओळख मिळते, जगण्याचा अर्थ मिळतो आणि समाधानही मिळतं ते अशा छंदांमधून.

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं विरळाच! 

प्रत्‍येक जण आपल्‍या आवडत्‍या छंदातुन आनंद शोधण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. कुणाला छंद असतो शिकारीचा, कोणी टपाल तिकिटं जमवतं, कोणी जुन्या नाण्यांचा संग्रह करतं, कोणाला गाणी म्हणण्याचा तर काहींना ऐकण्याचा छंद असतो. तर एखादा शक्य तितके गड-किल्ले सर करतो, कुणाला छंद असतो विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात. तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात.

रिकामा किंवा फुरसतीचा वेळ घालविण्यासाठी, मनोरंजनासाठी, त्याचप्रमाणे हौस किंवा विरंगुळा म्हणून माणूस जे जे काही करतो, ते सर्व छंदात मोडते. छंदांनी व्यक्तिमत्त्वाला नवनवीन पैलू व परिमाणे प्राप्त होतात. छंद माणसाला दु:ख विसरायला लावतातच; पण छंदामुळे स्वत:मधली क्रिएटिव्हिटीही वाढते, म्हणून देखील छंद जोपासण्याकडे हल्ली लोकांचा कल वाढलाय. छंद अनेक प्रकारचे असले तरी त्या प्रत्येकातून आनंद मात्र हमखास मिळतो.

नवीन माहिती मिळवणे, धिंगाणा करणे, ओळखी करणे, हसवणे, सकाळी फिरायला जाणे असे छंद असल्याचे काही जण सांगतात. काही व्यक्ती कुठला छंद जोपासतात हे पाहणंही नवलाईचं आहे. नाणी जमवणे, पोस्टाची तिकिटे किंवा विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्यांचे हस्ताक्षर जमवण्याचा छंद.

त्याच त्याच क्षेत्रातल्या त्याच त्याच कामातला तोचतोचपणा आणि धावपळीच्या दिनचर्येमुळे मनाला मळभ येतं. हे मळभ दूर करण्यासाठीच एक विरंगुळा म्हणून काहीसे छंद जोपासणं महत्त्वाचं आहे. ड्रॉईंग, ट्रेकिंग, पॅरासेलिंग, वॉटर राफ्टिंग, भटकंती, गायन आणि वाचन हे छंद जोपासण्यासाठी गांभीर्यानं लक्ष द्यावे लागते. हे छंद एक प्रकारचे पॅशन असते. विरंगुळ्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानेच धावपळीच्या करिअरचा ताण भासत नाही.

रोजची धावपळ, कामाचा ताण, तिथली टेन्शन्स, जगण्यातले वादविवाद. घडयाळाच्या काटयावर क्षण न् क्षण अवलंबून असणा-या आयुष्यात जोपासलेला छंद औषधासारखं काम करतो. छंद जोपासणे हा मानवी गुण आहे. मात्र काही आगळावेगळा छंद जोपासल्यास जीवनात आनंद मिळू शकतो. जसा साप पकडणे हा सर्पमित्रांचा पिढीजात छंद आहे. छंद हे मानवी जीवनाचे अभिनव अंग आहे. प्रत्येकास काहीना काही आवड असते व त्याचे छंदात रूपांतर होते. छंदामुळे तुमच्या वेळेचा उत्तम वापर होतो.

छंदांनी माणसाला ओळख मिळते. माणसालाच छंद असतात. छंद माणूसपण टिकवतात. माणूसपण वाढवतात. माणसाला स्वत:ला शोधण्याची, स्वत:ला व्यक्त करण्याची संधी देतात. जगण्यावर प्रेम करायला शिकवतात. मन रमवतात.

जीवनाचा, निर्सगाचा, माणसाच्या मनाचा शोध घ्यायला शिकवतात. स्वत:चे छंद, समाजोपयोगी काम करणं यातून स्वत:ची ओळखही गवसते आणि जगण्याची नवी दृष्टीही लाभते. जीवनात स्वत:लाच आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एकतरी छंद

जोपासलाच पाहिजे. तुम्हाला कोणत्याही कलेची खरी आवड असेल तर त्यासाठी वेळ आपोआप निघतो आणि नवनिर्मितीतून मिळणारा आनंदच तुमच्या छंदाला जागृत ठेवू शकतो. तेव्हा आपले जे काही छंद असतील त्यांना न्याय द्यायला आत्ताच सुरुवात करा. तहान-भूक हरवून छंद जोपासण्याची प्रवृत्ती कधी जिवाला पिसे लावून जाते हे कळत नाही.

-अॅड्. प्रवीण बाबर 

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

"गनिमी कावा"


गनिमी कावा‘ कशास म्हणतात? 
शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी गनिमी कावाया शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे. गनीमहा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमीहे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. कावाया शब्दाला लक्षणेने फसवणूक‘, धोनीकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि शत्रुचा कपटयुक्त हल्लाअथवा कपट-युद्धअसा गनिमी कावाया संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्न असा उद्भवतो की शत्रूचा कपटयुक्त हल्लाया शब्दाप्रयोगात शत्रू कोण?

मराठे की मराठ्यांचे शत्रू? या संज्ञेचा उपयोग मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो. म्हणजे गनिमी कावाही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख गनिमी कावाअसाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!

मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख गनिमी कावाया शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, ‘आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!” ‘गनिमी कावाहा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.

धूर्तपणा’, ‘कपट’, ‘कावेबाजपणाअशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ कावाया शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषा विज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून कावाया शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

महाराष्ट्र शब्दकोशात कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत. त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. कावाया शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे’. ‘गनिमी काव्याच्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.

"कावा" हा शब्द घोड्यांना देण्यात येणा-या प्रशिक्षणाशी संबंधित आहे. पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते. तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो. मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने काव्याचे होते. भरवेगात धावणार्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता निरनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच कावा’. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस गनिमी कावाहे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने गनिमी कावावा केवळ कावाया शब्दास लक्षणेने कपट’, फसवणूकयांसारखे अर्थ प्राप्त झाले.

(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार)

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

"बारा मोटेची विहीर"


बारा मोटेची विहीर

विहीर’ ही वास्तू एखादे पर्यटन स्थळ असू शकते का? सातारा जिल्ह्य़ातील लिंब नावाच्या गावात जाऊन तिथल्या पंधरा मोटेच्या विहिरीवर उभे राहिले, की याचे उत्तर हो असे मिळते. वृक्षांच्या गर्दीत बुडालेली ही जलवास्तू तन, मन हरपायला लावते.

शांतता, सावली आणि पाणी या तीन गोष्टींमध्ये कुठला समान धागा, नातेसंबंध असेल का? घरात बसून याचे उत्तर बहुधा सापडणार नाही. पण तेच आग ओकणाऱ्या उन्हातून, जिवाची लाही-लाही करणाऱ्या तापातून अचानकपणे एखाद्या शांत, शीतल आणि पाण्याचा सहवास असलेल्या स्थळी गेला तर या शब्दांचे धागेदोरे तुम्ही नक्कीच अनुभवाल! हे सांगायचे कारण असे, की साताऱ्याजवळच्या लिंब नावाच्या एका छोटय़ाशा गावामध्ये असाच एकदा भर दुपारी ऊन खात गेलो आणि तिथल्या एका वनराईत लपलेल्या त्या ऐतिहासिक, कलात्मक विहिरीने न भिजवताही ओलेचिंब व्हायला झाले.

विहीर! हा केवळ शब्द जरी उच्चारला तरी डोळय़ांपुढे पाणी आणि तिचा गारवा उभा राहतो. लिंब गावातील ही विहीरही अशीच. पण तिचे नाते पाण्याबरोबरच तिला लाभलेल्या कला आणि स्थापत्यात जास्त! तिच्या या सुंदर रूपाचीच गोष्ट खूप दिवस ऐकत होतो. ती पाहण्यासाठी इथे आलो आणि तिच्या सौंदर्यात हरवून गेलो.

आड, विहीर, बारव, तळी, टाकी, पुष्करणी असे जलसिंचनाचे नाना वास्तुप्रकार इतिहासकाळापासून आपल्या या सृष्टीचा हा भूगोल फुलवत आहेत. या प्रत्येकाचे स्वत:चे असे स्थापत्य, कलावैशिष्टय कर्ताकरवित्याच्या कुवतीनुसार ते जागोजागी बहरत गेले. लिंबची विहीरही अशी सातारच्या गादीच्या आश्रयाने निर्माण झाली.

पुण्याहून साताऱ्याकडे जाताना साताऱ्याच्या अलीकडे १३ किलोमीटरवर नागेवाडी नावाचे गाव आहे. या थांब्यावरूनच लिंब गावासाठी फाटा फुटतो. दोन किलोमीटरचे हे अंतर. साताऱ्याहून या गावापर्यंत एस.टी. बसही येते. खरे तर या गावाची ओळख लिंब गोवे अशी आहे. कृष्णेच्या काठावरील या गावात पेशवेकालीन मंदिरे, नदीकाठचे घाट असे बरेच काही पाहण्यासारखे आहे. या गावचा कृष्णामाईचा उत्सवही मोठा असतो. पण या गावात याहून विलक्षण असे एक स्थळ दडलेले आहे ते म्हणजे, ‘बारा मोटेची विहीर’!

या गावाचीच एक वस्ती लिंब शेरी! ‘शेरी’ म्हणजे राजे-संस्थानिकांचे खासगी बागायती-आवडते क्षेत्र. इथे या गावातही ते आहे. सातारच्या छत्रपतींनी ही जागा फुलवली, आमराई निर्माण केली आणि मग अशा या राईतच त्यांनी या साऱ्यांसाठी म्हणून एक विहीरही खोदली, अगदी त्यांच्या दिमाखाला साजेशी, एखाद्या राजवाडय़ासारखी!

कधीकाळी लावलेल्या वृक्षांची सावली पांघरत इथे आलो, की समोरच्या या जलमंदिराने भारावून जायला होते. शिवपिंडीच्या आकाराची विहीर. पाठीमागे अष्टकोनी मुख्य विहीर, त्याला जोडूनच पुढे चौकोनी भाग आणि त्याही पुढे निमुळत्या झालेल्या भागातून पायऱ्यांचा मार्ग अशी ही रचना. भव्यदिव्य अशा या रचनेत काय नाही? पायऱ्या, पूल, कमानी, सज्जा, मंडप, खोल्या, कोरीव खांब, त्यावर शिल्पांकन, शिलालेख, मोटांचे धक्के, पाणी जाण्यासाठी दगडी पन्हाळी आणि मुख्य म्हणजे या साऱ्याच्या सोबतीला स्वच्छ-नितळ पाणी! अगदी आरशासारखे! जणू हा एखादा पाणी महालच!!

उत्तरेकडच्या निमुळत्या भागातून एक पायरी मार्ग या आगळय़ावेगळय़ा विहिरीत उतरतो. किल्ल्याला असावे त्याप्रमाणे या विहिरीला तळाशी एक मोठा दरवाजा-कमान! त्याच्या भाळी एक आडवा शिलालेख. या विहिरीची जन्मकुंडली सांगणारा ”श्री भवानी शंकर प्रसन्न! श्रीमंत सौभाग्यवती वीरुबाईसाहेब यांनी…” थोडक्यात अर्थ असा, की सातारच्या गादीचे संस्थापक शाहूमहाराज यांच्या राणीसाहेब श्रीमंत सौभाग्यवती वीरुबाईसाहेब यांनी शके १६४१ ते १६४६ म्हणजेच इसवी सन १७१९ ते १७२४ या दरम्यान ही सुंदर विहीर आकारास आणली. या दरवाजावर या लेखाशिवाय कमळ, चक्र, मध्यभागी पोपटासारखा पक्षी कोरलेला आहे. मागच्या बाजूस दोन्ही हातास शरभाची शिल्पं आहेत. हा एक काल्पनिक पशू.. वाघ, कुत्रा, मगर अशा अनेक प्राण्यांचे एकत्रित रूप!

आपण या दरवाजातून आत पाय ठेवतो तेच मुळी विहिरीपुढच्या चौकोनी भागात. या चौकोनी भागातही पाणी असल्याने विहिरीच्या पुढच्या भागात जाण्यासाठी एक छोटासा पूल बांधलेला आहे. हा चौक आणि पुढील विहीर या दरम्यान एक जाडजूड विहिरीच्या उंचीची भिंत आहे. या भिंतीतच एका महालाची रचना केलेली आहे. या महालात जाण्यासाठी या चौकापुढील कमानी खालून एक जिना आहे. तसे विहिरीच्या वरच्या बाजूनेदेखील एक रस्ता आहे. बऱ्याच वेळा विहिरीचे पाणी या पुलावरही येत असल्याने वरच्या मार्गानेच या महालात उतरावे लागते. कुठली एक विहिर..पण तिच्यातील हे कुतूहल पाहताना प्रत्येक पावलावर अचंबित व्हायला होत होते. महालात आलो, की आतील स्थापत्याविष्काराने आणखी उडायला होते. विहिरीच्या मधोमध असलेला हा मंडप. एकूण सोळा खांबांवर आधारित. यातील मधले दोन तेवढे स्वतंत्र, बाकीचे भोवतीच्या भिंती, कमानींमध्ये सामावलेले आहेत. या खांबांवर पुन्हा शिल्प-नक्षीकाम. गणपती, हनुमान, गोपिकांसह मुरलीधर, कुस्ती खेळणारे मल्ल, घोडेस्वार, हत्तीस्वार, पक्ष्यांच्या जोडय़ा, मोत्यांची माळ घेतलेला हंस अशी ही शिल्पं. या जोडीने विविध भौमितिक आकृत्यांची नक्षी, कमळे, चक्रही कोरलेली. खांबांच्या शिरोभागी काही ठिकाणी छताचा भार सावरल्याचा भाव दाखवणारे यक्ष, छताच्या मध्यभागी उमलती कमळे, असे बरेच काही. कधी काळी हा सारा महाल रंगवलेला होता. त्याचे अवशेष आजही दिसतात.

महालाच्या या खांबांना रेखीव दगडी कमानींची गवाक्षे आहेत. या गवाक्षातून बाहेर डोकावण्यासाठी दोन्ही बाजूस सज्जे ठेवलेले आहेत. या सज्जातून विहिरीत डोकवावे तो मुख्य विहिरीचे रेखीव बांधकाम पुढय़ात येते. या बांधकामावर पुन्हा जागोजागी शरभ, व्याल अशी शिल्पं विसावलेली. तीन माशांचे एकत्रित असेही एक शिल्प आहे. विहिरीच्या प्रत्येक कोनावर पुन्हा एकेक नागशिल्प. ही विहीर आहे, की एखादे जलमंदिर! हे सारे पाहता-पाहताच विहिरीतील ते स्वच्छ-नितळ पाणी आपले लक्ष वेधून घेते. एवढा वेळ पाहात असलेल्या या स्थापत्याविष्कारातील हा द्रव्यसाठा. जणू एखाद्या श्रीमंत कुपीतील मौल्यवान दागिनाच. मग या साऱ्या सौंदर्याची त्या अवकाशालादेखील मोहिनी न झाली तरच नवल! त्याने आपला स्वच्छ निळाभोर चेहरा या पाण्यात डोकावला आणि त्याच्या निळाईने या साऱ्या स्थापत्यालाच नवी झळाळी आली.

तब्बल ११० फूट खोल आणि पन्नास फूट व्यासाची ही विहीर! तिचा त्या अष्टकोनी आणि त्यापुढील चौकोनी भागातून तब्बल पंधरा ठिकाणी पाणी वर उपसण्यायाठी मोटेची सोय केलेली. या मोटांच्या दगडी तोटय़ा आजही शाबूत. हे सारे बांधकाम ज्यातून केले त्या चुन्याच्या घाणीची दगडी चाकेही इथेच रुतून बसलेली आहेत. अगदी सगळी वास्तू जागच्या जागी.. काळ तेवढा पुढे सरकलेला!

जणू वाटत होते की, आता या साऱ्या मोटा पुन्हा सुरू होतील. खळखळ आवाज करत पाणी वाहू लागेल. बैलजोडय़ांच्या गळ्यातील त्या घुंगूरमाळा नाद करत वाजू लागतील. त्यांच्या मागे धावणारा मोटकरी एखादे लोकगीत गुणगुणू लागेल! केवळ एका वास्तूने केलेले हे स्वप्नरंजन! 

हे भारतीय वाटणारे पदार्थ चक्क परदेशी आहेत.

खवय्यांनो! भारतातील तुमच्या आवडीचे ‘हे’ पदार्थ चक्क आहेत परदेशी.. 

देश आणि वेष कोणताही असो खादाडांची संख्या काही कमी होत नाही. त्यातही भारतासारख्या देशात तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. आणि या पदार्थांना प्रसिद्ध करणारे खवय्ये देखील आहेत. आता पदार्थांचं विषय निघालाच आहे तर भारतात असे काही पदार्थ आहेत ज्याचा चाहता वर्ग हा मोठ्या संख्येत आहेत. जसं गुलाबजाम, समोसा, बिर्याणी वैगरे. पंरतु आम्ही तुम्हाला सांगितलं कि हे पदार्थ भारतीय नाहीत तर? आश्चर्य वाटलं ना. अहो वाटणारच वर्षानुवर्षे देशात प्रसिद्ध असलेले हे पदार्थ भारतीय नाही म्हटल्यावर कोनाचाही विश्वास बसणार नाही. यासाठी आपण आज भारतात प्रसिद्ध असलेल्या पण मूळच्या भारतीय नसलेल्या काही पदार्थांची माहिती घेणार आहोत.

समोसा 

संध्याकाळच्या चहासोबत हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे समोसा. भारतातील ९५ टक्के लोकं समोसा खाणं पसंत करतात. पंरतु समोसा हा पदार्थ मूळचा भारतीय नसून त्याचं मूळ हे मिडल ईस्ट आणि मध्य आशिया आहे.

गुलाबजामुन

सणासुदीला आणि लग्नसोहळ्यात स्वीट डिश म्हणून असणारा गुलाबजामुन हा पदार्थ न आवडणारे क्वचितच सापडतील. परंतु खवय्यांनो तुमच्या आवडीचा हा गुलाबजामुन देखील भारतातील नाही. गुलाबजामुन हा पर्शियाचा आहे. तिथे पहिल्यांदा तो बनवण्यात आला. तसंच असाही दावा केला जातो कि, मुघल सम्राट शाहजाहांच्या वैयक्तिक शेफने गुलाबजामुन हा पदार्थ चुकून तयार केला होता.

बिर्याणी 

चमचमीत बिर्याणी म्हटलं तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. पण बिर्याणी ही भारतीय नसून मूळची तुर्की येथून आली आहे. तुर्की येथून पुलाव हा पदार्थ भारतात आला नंतर मुघल साम्राज्यात या पुलावाने बिर्याणीचं रूप घेतलं.

चहा 

लहानांपासून ते प्रौढांपर्यंत चहाचा चाहतावर्ग आढळतो. चहाच्या चुस्की शिवाय काहींना आपला दिवसच अपूर्ण वाटतो. एक स्ट्रेस बस्टर म्हणून चहाचं सेवन केलं जातं. त्यामुळे चहाप्रेमींनो तुम्हाला हे पटणार नाही पण हा चहा देखील आपला नाही. उपलब्ध माहितीनुसार, सर्व चहा चीनमध्ये उत्पादित केलं जातो. पंरतु १६०० च्या शेवटी काही कारणास्तव भारतातही चहाची शेती केली जाऊ लागली.

डाळभात 

डाळभात हा प्रत्येक भारतीयाच्या घरात बनवला जाणारा पदार्थ आहे. पंरतु डाळभातचा शोध हा नेपाळमध्ये लागला. हा पदार्थ भारतीय नसला तरीही आज डाळभाताला वेगळं असं महत्त्व आहे.

राजमा

गरम गरम भातासोबत खाल्ला जाणारा राजमा हा भारतीय नसून मेक्सिकोतील आहे. असं म्हणतात कि, राजमा मेक्सिकोहून पोर्तुगाल आणि शेवटी युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत भारतात आला. नेपाळ आणि उत्तर भारतात राजमा सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

-नवाकाळ, March 13, 2020

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

किल्ल्यांबद्दल सविस्तर माहिती

सह्याद्री हा महाराष्ट्रभूमीचा अनमोल दागिना. याच अनमोल, अफाट, बेलाग आणि राकट सह्याद्रीच, सह्याद्रीतील गिरिशिखरांच आणि गिरिशिखरांवर असलेल्या पावन-पवित्र गडकोंटाच, इथल्या जाज्वल्य इतिहासाशी अतूट अस नात आहे. याच सह्याद्रीतील गडकोट किल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उंच, प्रचंड, दुर्गम डोंगर, वेड्यावाकड्या ऊंचच उंच डोंगररांगा, आणि अफाट, बेलाग सह्याद्री. याच सह्याद्रीच्या द-याखो-यात, अंगाखांद्यावर, कड्या- कपा-यांत असंख्य गड आजही ताठ मानेने, घट्ट पाय रोवून, आपल्या पुर्वजांच्या स्मृती आळवत, मुक्याने, जर्जर अवस्थेत परंतु तेवढ्याच अभिमानाने, स्वाभिमानाने, इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

खरंतर सह्याद्रीतील द-याखो-यांची, गडकिल्यांची दुर्गमता हिच त्या गडांची खरी ओळख, परंतु डोंगर नुसते दुर्गम असले, उंच असले तरी या दुर्गांची बांधणी करताना इतरही ब-याचशा गोष्टी लक्षात घेतलेल्या दिसून येतात. जसे की आसपासची भौगोलिक रचना, स्थान – निश्चिती संरक्षणात्मक बाजू, गडाची बांधणी, संरक्षण, मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू विचारात घेऊनच दुर्गबांधनी केली जात असे. महाराष्ट्रातील इतिहासाबरोबरच इथल्या दुर्गांची दुर्गबांधणी हा एक अभ्यासाचाच वेगळा विषय आहे. वेगवेगळ्या कालखंडात इथे अनेक राजवटी नांदल्या, आणि या वेगवेगळ्या कालखंडात इथे भरपूर गडकिल्यांची उभारणी केली गेली. किल्ले उभारताना वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, कल्पकतेने निरनिराळे प्रयोग राबवून या दुर्गांची उभारणी केल्याचे आपल्याला दिसून येते.

आज महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा विचार केला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड, शिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर /गड आपले लक्ष वेधून घेतो, इथे उंच डोगरमाथ्यावरील गिरिदुर्ग आहेत, इथे घनदाट अरण्यातील वनदुर्ग आहेत, इथे भक्कम तटबंदीने वेढलेले कणखर भुदुर्ग आहेत आणि इथेच सागराच्या लाटांचे तडाखे झेलत त्याच्याशीच गुजगोष्टी करणारे जलदुर्गही आहेत. इतकी वैविध्यपूर्ण, वैभवशाली दुर्गसंपत्ती असलेला हा महाराष्ट्र गडकिल्यांबरोबरच इथे भक्कम तटाबुरूजांचे वैभवशाली वाडे-राजवाडे, गढ्या, विहिरी, बारवा, समाध्या, गावांच्या वेशी, पुरातन मंदिरे, आदी भरभरून ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रचनेच्या आणि बांधकाम शास्त्राच्या दृष्टीने अभ्यासनीय आणि अनमोल असाच आहे.

तर अशा या विविध गडकोटांचे उपयोग काय? वापर काय? फायदा काय? इतके वेगवेगळे गड बांधले कसे? गडावर अवशेष काय? असे अनेक प्रश्न आपल्याला गडकिल्यांसंबंधी पडतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याकाळी या किल्यांना असणारे महत्व याची उत्तरे शिवछ्त्रपतींच्या आज्ञापत्रात मिळतात ….

” संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग….ग

डकोट म्हणजे राज्याचे मूळ…

गडकोट म्हणजे खजिना….

गडकोट म्हणजे सैन्याचे बळ…

गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी…..

गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे.

गडकोट म्हणजे सुखनिद्रागार…

किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण. …..”

किती सार्थ, सर्मपक वर्णन आहे हे, आज्ञापत्रील गडकिल्यांविषयी असणा-या या ओळीच आपल्याला शिवकाळातील गडकोटांचे महत्त्व सांगून जातात, राज्याच्या संरक्षणासाठी, आक्रमण काळात ,राज्यसंरंक्षणाच्या दृष्टीने, या किल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे. म्हणूनच एकप्रकारे गडकोट राज्याचा खजिना होते,राजलक्ष्मी होते. प्राणापलिकडेही जपलेले आणि बांधलेले हे गडकिल्ले पवित्र होते, वंदनीय होते. या अशा गडकिल्यांचा अभ्यास करताना, काहीशी अचंबित करणारी, आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे दुर्गबांधनी. बेलाग उंच कड्यांवर बांधलेले हे किल्ले त्याकाळच्या दुर्गस्थापत्यशास्त्राचा आदर्शवत नमुनाच ठरतात. कधी बेलाग कड्यांशी गुजगोष्टी करत उभी असलेली तटबंदी दिसते, तर कधी उत्कृष्ट, बेलाग बांधकामे डोळ्यांचे पारणे फेडतात. परंतु या अशा एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष गडबांधणी करणे म्हणजे काय करणे? एखादा डोंगर बघून भरभक्कम तटबंदी रचने म्हणजे दुर्ग बांधनी करणे कि रहायला एखादे वाडे-हुडे बांधणे म्हणजे दुर्गबांधनी? असे आहे का? तर निश्चितच नाही, तर याबद्दलही काही दृष्टीकोन अवलंबलेले दिसतात. नैसर्गिक, मानवनिर्मित, भौगोलिक, बाबींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. याबाबतही शिवछ्त्रपतींचे बोल आपल्याला खूप काही सांगून जातात. रायरीच्या पाहणीवेळेस महाराज म्हणतात. 

“…..राजा खासा जाऊन पाहाता, गड बहुत चखोट….कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच… पर्जन्यकाळी कडि-यावर गवतही उगवत नाही…पाखरू बसू म्हणेल तर जागा नाही…तक्तास जागा हाच गड करावा….”

म्हणजे हा डोंगर नैसर्गिक दृष्टीनेच किती दुर्गम, संरक्षीत आहे. गडाचे कडे नैसर्गिकच चखोट आहेत, बेलाग हेत. किल्ले बांधनी करताना डोंगर फक्त उंच असून चालत नाही तर त्याची भौगोलिक नैसर्गिक दुर्गमता ही तितकिच महत्वाची हे आपल्याला दिसून येते. एखादा किल्ला बांधण्यापुर्वी केलेली तिथल्या ठिकाणची पाहणी आणि गड बांधन्यास भौगोलिक दृष्ट्या तिथली योग्य असणारी जागा, आणि सध्या रायगडकडे पाहिल्यास या प्रसंगातून महाराजांचा दुरदृष्टीपणा आपल्या ध्यानी येतो. आता एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष दुर्गबांधनी करणे म्हणजे तटबंदी , इतर गरजेची निरनिराळी बांधकामे, या गोष्टी आल्याच. तसेच काही मानवी गरजा बाकीच्या गोष्टी आल्याच, त्यातली त्यात प्राथमिक आणि अतिशय महत्वाची गोष्ट आणि गरज म्हणजे पाणी हे आवश्यकच. याबाबतीत आज्ञापत्र काय सांगते…

“…..गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळपर्य॔त संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावर झराही आहे, जसे तसे पाणी पुरते, म्हणून तितकीयावरीच निश्चिंती न मानवी. कि निमित्य की, झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते याकरीता

जखिरीयाचे पाणी म्हणून दोन चार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च न होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे….”

कोणत्याही डोंगरावर गड उभारणी करताना पहिली प्राथमिक गरज, पाहणी आणि शोध म्हणजे तेथे पाण्याची तपासणी करून, योग्य सोय करून पाणीसाठा पाहूनच पुढील कामास सुरवात व्हावी. हे या मागचे मुख्य धोरण. प्रथमता पाणी ही मुख्य प्राथमिकता.पाणी उपलब्ध झाले की पुढील गोष्टींना कोणतीही अडचण येत नसावी.

तर या झाल्या गडबांधणी मधील सुरवातीच्या काही महत्वाच्या बाबी..गडाची भौगोलिक रचना, गडाची नैसर्गिक, स्वनिर्मित संरक्षीत बाजू आणि पाणी….

यानंतर प्रत्यक्ष गडबांधणी मधील काही महत्वाच्या बाबी जसे की तटबंदी, बुरूज, माची, दरवाजे, वाडे, घरे, कोठारे, मंदिरे इ. अनेक गोष्टी. ज्या गडाला एक गडाचे परिपूर्ण स्वरूप देतील. याही प्रत्येक गोष्टीतून दुर्गबांधनीतील कल्पकता आणि विविध प्रयोग वेगवेगळ्या गडांवर आपल्याला आढळून येतात.

आज महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणारे गडकिल्ले प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. सद्यस्थितित हे गडकिल्ले पडझड झालेल्या अवस्थेत असले, तरी पुर्वी अगदी ते वैभवसंपन्न होते. किल्ला पाहता -पाहता जर अभ्यासला तर त्याचे मर्म मनाचा ठाव घेते, आणि हे गडकिल्ले पाहताना अभ्यासाचा विषय म्हणजे या गडांची दुर्गबांधनीच. गिरिदुर्ग असो, भुदुर्ग किंवा जलदुर्ग अशा अनेक गडावर असंख्य वेगवेगळ्या कल्पना गडबांधनी करताना अंमल केल्या गेल्या, तट, बुरूज, माची, फांजी, खंदक, जंग्या, चर्या इ. ब-याच दुर्गबांधनीतील गोष्टी गडकिल्ले भटकंती करताना अज्ञभिन्न असल्याने पाहण्याचे राहून जातात.काही समजतात काही समजत नाहीत. अशाच गडबांधनी मधील काही ज्ञात-अज्ञात महत्त्वाच्या ठराविक संज्ञांचा थोडक्यात आढावा घेऊ या.

प्रकार – गडाचे प्रामुख्याने गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भूदुर्ग, असे प्रकार पडतात.

1) भुदुर्ग – नावाप्रमाणेच ,सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात मोडतो. उदा : चाकण, परांडा, नळदुर्ग इ.

2) गिरीदुर्ग – उंच डोगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरीदुर्ग होय. उदा: रायगड, तोरणा, राजगड इ.

3) जलदुर्ग – पुर्णपणे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला म्हणजे जलदुर्ग होय. उदा : सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा इ.

4) वनदुर्ग – घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात. उदा: वासोटा.

5) जोडकिल्ले – एकाच डोंगरावर, वेगवेगळ्या शिखरावर, जवळपास असलेले गड जोडकिल्ले म्हणून ओळखतात. उदाः पुरंदर -वज्रगड, चंदन-वंदन. यासंदर्भात आज्ञापत्रात उल्लेख सापडतो.

“एका गडासमीप दुसरा पर्वत,किल्ला असू नये, असल्यास तो सुरूंग लावून गडाचे आहारी आणावा, जर शक्य नसेल तर बांधून ती जागा मजबूत करावी.“

6) गडाची तटबंदी – कोणत्याही गडाची तटबंदी म्हणजे एकप्रकारे गडाचे चिलखतच …., प्रामुख्याने गडाची तटबंदी ही त्याच्या भौगोलिक रचनेवर अवलंबून असते परंतु जास्त करून तटबंदी एकसलग गडमाथ्यावर आपल्याला दिसते परंतु इथे शिवनिर्मित गडाचे एक वैशिष्ट्य सांगावे वाटते शिव -निर्मित गडावर प्रामुख्याने तटबंदी ही पायथ्यापासून अर्ध्या टप्प्यांवर दिसते. तटबंदी प्रामुख्याने विटा, माती, दगड इ. वस्तूंचा वापर करून उभारली जात असे.

गडावरील टाक्या खोदताना निघणारा दगड प्रामुख्याने या कामी येत असे. तटाची मजबुती ही गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट. तोफांचा, नैसर्गिक गोष्टींचा आघात सहन होईल इतपत ती अभेद्य करण्याचा प्रयत्न होई. तटाची उंची, जाडी, रूंदी ही प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार उभारली जाई. बांधकाम करताना मजबुतीकरता प्रामुख्याने चुन्याचा वापर होई. तटबंदीचा वापर जास्त करून डोंगराच्या कमकुवत बाजूकडे प्रामुख्याने होतो, जिथे नैसर्गिक दुर्गमता आहे तिथे तटबंदीची गरज भासत नसे. उदा. रायगडची तटबंदी ..

फार वर्षांपूर्वी तटबंदी ही लाकडी फळ्या किंवा मातीची असत. जसजशी प्रगती होत गेली तसतसा पुढे यासाठी दगड व विटांचा वापर सुरु झाला. काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीतीनुसार आपल्याला त्याठिकाणच्या तटातील वेगळेपणही दिसून येते, जसे की तटासाठी वापरलेल्या दगडातील फरक, तटाची उंची, बांधणी, रचना इ. गरजेनुसार काही तटांची तात्पुरती तर काही ठिकाणी कायमची मजबूत बांधणीही केलेली दिसून येते.

7) बुरुज – बुरुज म्हणजे मारा-गिरीकरण्याची एक मुख्य जागा टेहळणीसाठी संरक्षणाच्या दृष्टीने गडाची महत्त्वाची बाजू तोफा डागण्यासाठी गडाच्या आसमंतात टेहळणीसाठी बुरुज अतिशय महत्त्वाची जागा. तटबंदीमध्येच बाहेरच्या अंगाला याची वेगवेगळ्या आकारात मजबूत बांधनी केलेली असत. बुरूजाच्या बांधनीतही अनेक वेगवेगळे प्रकार कल्पकतेने राबवल्याचे दिसून येतात,यामध्ये गोलाकार, कोनांचा, पाकळ्यांच्या, दुमजली, चिलखती असे विविध प्रकारही आढळून येतात.बुरूज हे गडाचे प्रामुख्याने महत्त्वाचे अंग. बुरूज पडल्यावर अनेक किल्ले शत्रूच्या ताब्यात सहजतेने गेल्याचे अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात आढळून येतात.

काही गडावर बुरूजांची संख्या जास्त असल्यास स्थान, ओळख निश्चितीसाठी त्यांना नावे दिलेली आढळतात जसे कि देवावरून, बुरूज ांच्या रचनेवरून, गावावरून उदा: हत्ती बुरुज, फत्ते बुरुज, झुंझार बुरुज, शिरवले बुरुज, वाघजाई बुरुज इ. अशी नावे आज रोहीडा, पुरंदर, तोरणा आदी किल्ल्यावरील बुरूजांची उपलब्ध आहेत.

8) चिलखती बुरुज – हल्ल्याच्या दृष्टिने नाजूक ठिकाणी असे बुरूज असतात. गडाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे याच्या नावातच समजते. संरक्षणाच्या दृष्टीने गडाला घातलेले हे चिलखतच, आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजगडची संजिवनी माची, अद्भूत, अविश्वासनीय, अकल्पनिय असे हे बांधकाम. नेहमीच्या बुरूजाला बाहेरून अजून एका बुरूजाचे संरक्षण म्हणजे चिलखती बुरूज… रायगडावरही असा चिलखती बुरुज आपल्याला पहायला मिळतो. शत्रूच्या हल्ल्यात चिलखती बुरुज तटबंदी ढासळलीच तर आतला बुरुज पूर्ण शाबूत रहावा अशी ही योजना. अतिशय संरक्षणात्मक आणि अप्रतिम अशी ही बांधणी.

9) फांजी – तटबंदीवर भिंतीवरील आतील बाजूस सपाटी करण्यात येत असे त्याला फांजी असे म्हणतात. पहारेक-यांना गस्त घालण्यासाठी याचा उपयोग होत असे. फांजीवर पोचण्यासाठी ठिक-ठिकाणी तटबंदीवर सोपान बनवलेले असतात. गस्त घालण्यासाठी, पहा-यावेळी सैनिकांना तटबंदी वर पहारा देण्यासाठी, फिरण्यासाठी याचा वापर होत असे. वेगवेगळ्या गडावर याच्या बांधणी, लांबी, रूंदयाच्या बांधणी, लांबी, रूंदी आदी गोष्टीतही विविधता आढळून येते.

10) जंग्या/झरोके – किल्ल्याच्या तटाला आतील बाजूकडून बंदुकीचा, बाणांचा मारा शत्रूवर करण्यासाठी छिद्र, भोके असतात त्यांना जंग्या असे म्हणतात, याची दिशा प्रामुख्याने खालच्या बाजूस तिरपी असते, किल्ल्याच्या आतून शत्रूला बंदूक, बाणाने सहज टिपता येईल अशी याची रचना असते. तटाच्या आतूनच शत्रूला न दिसता शत्रूवर मारा करण्यास याचा अगदी योग्य वापर होई. गडावर प्रत्येक ठिकाणी ही रचना आपल्याला आढळून येते. तटबंदी आणि बुरूजांतील विविध प्रकार आजही आपण अनेक किल्ल्यांच्या, वाड्यांच्या तटा-बुरूजावर पाहू शकतो.

11) चर्या – तटबंदीवर, द्वारावर, बुरूजांवर पाकळ्यासारखे, त्रिकोणी, पंचकोणी आकाराचे दगड बसवलेले असतात त्यांना चर्या असे म्हणतात. याच्या आड लपून शत्रूवर माराही करता येतो तसेच या मुळे किल्ल्याच्या सौंदर्यातही भर पडते. अशी वेगवेगळ्या आकारातील रचना किल्ल्यावर आढळून येते. उदा: राजगड – राजमार्ग

12) माची – माची म्हणजे गडाची पहिली सपाटीची जागा, बालेकिल्ल्या खालील लांब पसरलेले पठार, मुख्य गडापासून कमी उंचीची ही बाजू, आणि म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची. माचीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हटले तर संजिवनी, सुवेळा, झुंजार अशी काही ठळक उदाहरणे घेता येतील. माचीच्या भौगोलिक रचनेवरून त्याचा वापर केला जात होता.जसे की राजगडची पद्मावती माची. या माचीच्या प्रचंड विस्तारामुळे, सपाटीमुळे माचीवरच वाडे, सदर, कोठारे, तलाव व इतर इमारतींची बांधकामे पहायला मिळतात. राजगड हा किल्ला माचीच्या दृष्टीने परिपूर्ण असाच आहे या गडाला असणा-या तीनही माच्या दुर्ग-बांधनीतील अद्भूत नमुनाच आहेत..

संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची असणारी संजीवनी माची, सुवेळा माची संजीवनीचे दुहेरी तिहेरी तटबंदीचे बांधकाम, बुरुज, चिलखती बुरुज ह्या तीनही माच्या म्हणजे एक स्वतंत्र किल्लाच असे हे दुर्गबांधनीतील अद्भूत अचंबित करणारे बांधकाम आपल्याला पहायला भेटते. प्रत्येक गडाला माची असतेच असे नाही.

13) बालेकिल्ला – बालेकिल्ला म्हणजे सोप्या भाषेत म्हटले तर किल्ल्यावर किल्ला, किल्ल्याची सर्वोच्च जागा. सर्वोत्कृष्ट उदाहरण राजगड चा अभेद्य बालेकिल्ला. इतर गडांपेक्षा सर्वात उंच असा राजगडचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर प्रामुख्याने महत्वाच्या सदर, वाडे, राजवाडा, इ अशा इमारती असत. बालेकिल्ल्यावरून आक्रमणाच्या वेळी थोड्या शिबंदीसह ही शत्रूला तोंड देता येई. प्रत्येक किल्ल्याला उंच बालेकिल्ला असेलच असे नाही.

14) महादरवाजा – गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधनी, संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची, म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधनीतील एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो, तो म्हणजे महादरवाजाची गोमुखी बांधनी. उदा-रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी. दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी. भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पाय-या ही काही खास वैशिष्ट्ये. शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये लपवलेली अशी ही गोमुखी बांधनी. दरवाजावर सतत पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके अशी केलेली आढळते पहारेक-यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते.गडाला महादरवाजा खेरीज एक, दोन असे वेगवेगळे दरवाजे असत.गडाचे महत्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा.

15) दिंडी दरवाजा – मुख्य लाकडी दरवाजालाच असलेला एक लहान दरवाजा. जाण्या ऐण्यास, वापरण्यासाठी. रोजच्या वापरासाठी.

16) अडसर – गडाचा लाकडी दरवाजा बंद केल्यानंतर, आतील बाजूने आडवे लाकूड लावून बाहेरून दरवाजा उघडता येऊ नये यासाठी केलेली सोय. याच्या खोबण्या आज किल्ल्यावरील दरवाजाच्या आत आपण पाहू शकतो.

17) खिळे – गडाच्या लाकडी व्दारावर बाहेरील बाजूने अणकुचीदार विविध आकाराचे खिळे बसविले जात. शत्रूने, हत्तीने द्वाराला धडका दिल्यावर याद्वारे दरवाजांचे संरक्षण होई.

18) नाळ – तटबंदीच्या दोन तटांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून, बोळीसारख्या जागेची केलेली रचना म्हणजे नाळ होय. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी व शत्रूला गांगरुन सोडण्यासाठी ही रचना विशेष उपयुक्त अशी. यासंदर्भात शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या राजगडच्या संजीवनी माचीची नाळयुक्त तटबंदीची रचना विशेष पाहाण्यासारखी आहे. दोन तटबंदीमध्ये विशिष्ट अंतर सोडून याची वैशिष्ट्यपूर्णअशी रचना आहे.

19) देवडी – मुख्य दरवाजामध्येच दरवा-ज्याच्या बाजूला असलेली, दरवाजावर तैनात असलेल्या सैनीकांच्या,पहारेक-यां-च्या बसण्याची, विश्रांतीची, पहारा देण्याची जागा, चौकी. तसेच सैन्याला रात्रीच्या विश्रांतीसाठी केलेली सोय.

20) चौकी – गडावर येणा-या वाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने पहा-याच्या चौक्या असत. येणा-या लोकांवर नजर ठेवणे, पाहणी करणे इ कामे चौकीवर नेमलेले चौकीदार, सैनिक करत.

21) गस्त – गडावर सैनिकांनी रात्री दिवसा दिलेला सशस्त्र पहारा म्हणजे गस्त होय. ही गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट. विशिष्ट हत्यारबंद सैनिंकासह ठराविक वेळी पहारा, गस्त दिली जाई. वेगवेगळ्या वेळी ठराविक वेळी यासाठी पहारेकरी नेमले जात.

22) नगारखाना – नगारखाना म्हणजे गडावरील विशिष्ट, कार्यक्रमाच्या, सुचनेच्या प्नसंगी, सुचना देण्यासाठी, इशा-याच्या वेळी नगारा, शिंग, तुतारी व इतर वाद्य वाजवण्याची सर्वोच्च जागा.

23) सोपान मार्ग – तटबंदीवर, गडावर ठिकठिकाणी,ये जा करण्यासाठी असलेला दादर, जिना, पायरी मार्ग म्हणजे सोपान मार्ग. गडावर उंच ठिकाणी किंवा दरवाजा, बुरुज, तटबंदीवर ये जा करण्यासाठी याचा वापर होई.

24) दरबार – राज्याच्या वाटचाली संदर्भात, विशेष सण ,समारंभ, कार्यक्रम गडावरील महत्वाच्या निर्णय प्रसंगी एकत्र सभा, चर्चा करण्याची जागा. राजधानी रायगडावर असा दरबार आपणास पहावयास भेटतो. या दरबारातील सर्वोच्च क्षण म्हणजे राज्याभिषेक सोहळा होय.

25) मेट – गडावर चढून जाताना वाटेत घरे असलेली, वस्ती असलेली जागा म्हणजे मेट. गडावर जाणा-या वाटा, लोक यांवर लक्ष ठेवणे हे या मेटकरांचे काम. या मेटांना विशिष्ट अशी नावे असत, जसे रायगडावर आंब्याचे मेट, सावंतांचे मेट इ. मेटांची नावे आढळतात. यावरून यांची स्थाननिश्चिती होत असे. गडाच्या सुरक्षेच्या, संरक्षणाच्या दृष्टीने ही मेटे अतिशय उपयोगी.

26) पहारा – गडाच्या मुख्य जागा सोडून अवघड, अनघट खळग्याच्या जागा असत अशा ठिकाणी खबरदारी म्हणून पहारे नेमले जात. अशा खळग्यांना विशिष्ट नावे व पहारेकरी असत. पहारेकरी संख्या त्या त्या भागानुसार असत. रात्रीची गस्त घालणे हे यांचे मुख्य काम. उदा: रायगड – महाद्वाराचा खळगा, निवडुंगीचा खळगा, हिरकणीचा खळगा, इ.

27) घेरा – एका विशिष्ट गडाचा घेरा म्हणजे त्या गडाच्या पायथ्याशी,आसपास असलेली सर्व गावे, सर्व मुलुख, बाजूला परिसर म्हणजे त्या गडाचा घेरा होय.

28) गुहा – अनेक गडावर आपल्याला गुहा आढळून येतात काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित… संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा याचा वापर गडासाठी होत असे. काही ठिकाणी काही विशिष्ट साधनसामुग्री साठविण्यासाठी ही याचा वापर होई.

29) भुयारे – गडावरून आपत्कालीन वेळी शिताफीने, गुप्तरितीने निसटण्यासाठी बाहेर पडण्यासाठी जमिनितून खोदून, बांधकाम करून केलेले मार्ग. आज गडावर सहसा अशी जागा आढळून येत नाहीत. तर काही ठिकाणी नैसर्गिक स्थितिमुळे बुजलेल्या अवस्थेत आढळतात.

30) नेढे– नेढे म्हणजे गडाला, कड्याला एखाद्या ठिकाणी नैसर्गिकपणे आरपार पडलेले विशिष्ट आकाराचे छिंद्र, भगदाड. उदा : राजगड, रतनगड इ.

31) चोरदिंडी – “….किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिता गड पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या, त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या….” शिवछ्त्रपतींच्या आज्ञापत्रातानुसार किल्ल्यास मुख्य दरवाजा खेरीस दुसरे दरवाजे, चोरदिंड्या असाव्यात. यानुसार आपल्याला किल्ल्यावर असे दरवाजे तटबंदीमध्ये, गडाच्या अपरिचित बाजूला, दुर्गम ठिकाणी याची बांधनी आढळून येते. एखाद्या संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी निसटून जाण्यास याचा उपयोग होई.

32) चुन्याचा घाणा – गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असे. यासाठी चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई, घाण्याच्या सहाय्याने चुना गडावरच बनवला जाई. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी इ. पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलांमार्फत फिरवले जात असे. असे घाणे आज आपल्या-ला रोहिडा, तिकोणा, विसापूर, विजयदुर्ग अशा गडांवर पहायला भेटतात.

33) तोफा – किल्ल्यातील संरक्षणासाठी लढाऊ दृष्टीने अविभाज्य घटक. तोफा या साधारण ओतिव, घडीव आणि बांगडी प्रकाराच्या पहायला मिळतात. ओतिव म्हणजे धातू वितळवून साच्यात ओतून तयार केलेली तसेच घडीव म्हणजे नावाप्रमाणे घडवलेली. गडा-वर गडाच्या आवाक्यानुसार तोफा असत याच्या आकार व्यासावर मा-याचा टप्पा ठरतो. तोफा या प्रामुख्याने मिश्र धातूच्या बनवल्या जात जसे की लोखंडी, पंचधातू, पितळी इ. प्रत्येक तोफेची मारा करण्याची क्षमता वेगवेगळी असते.

34) शिबंदीची घरटी – गडावर आवश्यकतेनुसार शिबंदीची व्यवस्था असत. यामध्ये सर्व अधिकारी, सेनापती, व इतर सैन्य सर्वांच्या राहण्याची व्यव-स्था केलेली असत. रायगडावर सर्व शिबंदी ही जगदीश्वराच्या पुढील भागात असे. आज आपण त्या घरांचे चौधरे तेथे पाहू शकतो. प्रत्येक गडावर त्याच्या आवाक्यानुसार शिबंदी/सैन्य संखेनुसार ठेवले जाई.

35) टाके/तलाव – गड बांधताना सुरवातीला पाणी पाहूनच काम चालू होई. तलाव खोद-ताना निघालेला सर्व दगड तटबंदी व इतर बांधकामासाठी वापरला जाई प्र-त्येक गडावर आपल्याला अनेक टाकी तलाव विशिष्ट नावाने पहायला मिळतात. कोणत्याही किल्ल्यावर पाणी ही महत्त्वाची गरज आहेच, तो कायमस्वरूपी असावा तसेच गडावर सर्व शिबंदीला लागेल एवढे पाणी हवेच त्यासाठी काही ठिकाणी खोदून तर काही ठिकाणी बांधीव तलाव टाकी, विहिरी गडावर निर्मिले जात. गडाच्या महत्वाच्या गरजांच्या दृष्टीने पाणी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

36) बंधारा – गडावरील पाणलोटाच्या ठिकाणी बांध घालून पावसाळ्यातील पाण्याचा साठा केला जाई. गडावर अतिरिक्त पाणी साठा यामुळे उपलब्ध होई. गडावरील विविध कामांसाठी, पिण्यासाठी, वापरासाठी या पाण्याचा वापर केला जाई.

37) सदर – सदर ही गडाची अतिशय महत्त्वाची जागा , यावरूनच कामकाजाचे, न्यायाचे अतिशय महत्वाचे निर्णय, बैठका, न्यायनिवाडे केले जात. मह्त्वाचे कार्यक्रम सदरेवर भरवले जात. सदर ही गडानुसार बालेकिल्ल्यावर, माचीवर अशा वेगवेगळ्या प्रकारे आढळून येते. यामध्ये राजसदर, किल्लेदाराची सदर, तटसरनौबताची सदर इ. प्रकारही आढळून येतात.

38) राजवाडा – गडावर राजाच्या, राजकुटुंबाच्या राहण्याची केलेली विशेष सोय. शिवरायांच्या राजवाड्यांचे अवशेष आज आपण रायगड, राजगड अशा गडावर पाहू शकतो. आपल्या सर्वांसाठी पवित्र, वंदनीय अशी जागा.

39) ध्वजस्तंभ – किल्ल्यावर राज्य करणा-या, नांदणा-या, राजवट करणा-या साम्राज्याचे, स्वराज्याचे निशाण लावण्याची जागा. प्रामुख्याने उंच ठिकाणी बुरूजावर असे.

40) धान्यकोठारे – गडावरील धान्य साठविण्याची जागा. गडावरील कुवतीनुसार धान्य साठवण्यास विविध कोठारे असत. गडावरील लोकांच्या उपजिविकेसाठी धान्य साठा अतिशय महत्त्वाची गोष्ट. उंदीर, किडा-मुंगी, वाळवी, पाऊस यांचा उपद्रव होणार नाही अशा पद्धतीने कोठारे बांधली जात. उन, वारा पाऊस इ गोष्टींपासुन वाचण्यासाठी भक्कम अशी रचना केली जाई.

41) दारूकोठारे – हा गडावरील अतिशय महत्त्वाचा साठा, गड लढविण्यास तोफांसाठी दारूसाठा ही अतिशय महत्वाची गोष्ट. दारूकोठारे प्रामुख्याने मुख्य वस्तीपासून दूर असत.याची विशिष्ट प्रकारची भक्कम अशी बांधणी केली जाई. किल्ला फार काळ झुंजत ठेवण्यासाठी, पाणी आणि धान्यसाठ्याबरोबरच, दारूसाठाही विशेष काळजीने जपला जाई. वरील तीन गोष्टी गडावर जेवढ्या मुबलक प्रमाणात तेवढाच जास्त काळ गडावरून शत्रूशी तोंड देता येई. याबाबत ही आज्ञापत्रात उल्लेख आढळतात जसे की…..

“दारूखाना घराजवळ घराचे वारियाखालें नसावा. सदरेपासून सुमारांत जागा पाहून भोंवतें निर्गुडी आदिकरून झाडाचें दाट कुसूं घालून बांधावा.तळघर करावें तळघरात गच्च करावा. त्यांत माच घालून त्या घरीं दारूचे बस्ते, मडकी ठेवावी.बाण होके आदिकरून मध्यघरात ठेवावे.सरदी पावों न द्यावी. आठ पंधरा दिवसी हवालदारानें येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मुद्रा करून ठेवीत जावें.दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्याणी रात्रंदिवस पाहरियाप्रमाणें जागत जावें.परवानगीविरहित आसपास मनुष्य येऊं न द्यावे….”

42) खलबतखाना – गुप्त वाटा-घाटी चर्चा करण्याची संरक्षीत जागा. महत्वाच्या मोहीमेचा, नियोजनांचा आढावा घेण्यासाठी, खासगी चर्चेसाठी असलेली जागा. गुप्त हेरांकडून, जासूसांकडून आलेल्या माहीतीची गुप्त रितीने चर्चा करण्याची संरक्षित खाजगी जागा.

43) शस्त्रागार – गडावरील सर्व शस्त्रसामग्री ,लढाईसाठी लागणारे सर्व शस्त्रे साठा ज्यामध्ये, ढाल तलवारी, बंदूका, चिलखत, भाले, पट्टे, इ सर्व महत्त्वाची, गरजेची शस्त्र शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा.

44) वस्त्रागार – गडावर आवश्यक असणारी, विविध  कारणांसाठी लागणारी, सर्व प्रकारची शाही वस्त्रे ठेवण्याची जागा शेले, कमरपट्टे, गादी, तक्के, लोड, पडदे सर्व कापड, वस्त्र इ .

45) मंदिरे – दैनंदिन पुजेसाठी आवश्यक असणारी , विविध देवदेवतांची, नानाविध प्रकारची सुरेख बांधणीतील मंदीरे प्रत्येक गडावर आपल्याला नक्कीच आढळतात, वेगवेगळ्या देवदेवतांची मंदीरे गडावर असत. याखेरीज गडावर विशिष्ट ठिकाणी कोरलेली देवदेवतांची शिल्पे, शिलालेख, अशा भरपूर गोष्टी अजूनही गडांवर आढळतात.

46) जवाहिरखाना/कोषागार – जड-जवाहिर, हिरे, मानके, दागिने अशी मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा. स्वराज्यातील सर्व मौल्यवान ऐवजी, कर रूपाने, लुटीच्या रूपाने मिळालेला सर्व ऐवज, सुरक्षित ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी केलेली सोय.

47) दफ्तरखाना – सर्व प्रकारचे चालणारे कामकाज, परस्परांमधील पत्रव्यवहार, खाजगी दस्ताऐवज, गडावरील सर्व ऐतिहासिक कागदपत्रे, पत्रे, नोंदी, दस्ताऐवज, ठेवण्याची सुरक्षित जागा.

48) टांकसाळ – वेगवेगळ्या साम्राज्याची, स्वतःची दैनंदिन व्यवहारातील नाणी, शिक्के इ चलने तयार करण्याचा कारखाना. शिवकालीन शिवराई, होन अशी स्वराज्याची मौल्यवान नाणी पाडण्याचा कारखाना, टांकसाळ रायगडावर होती.

49) शौचकुप – साडेतीनशे वर्षांपूर्वी गडावर निर्मिलेला वैज्ञानिक प्रयोग. प्रत्येकाने अभ्यासावा असा प्रयोग. अनेक शिवकालीन गडावर शौचकूपांची रचना केलेली आढळते, वाड्यांमध्ये, घरांमध्ये, पहारेक-यांसाठी तटबंदी मध्ये असे शौचकुप आढळून येतात. पहारेक-यासांठी खास तटबंदी मध्येच अशी रचना केलेली पहायला भेटते. उदा: रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड इ.

50) अंधारकोठड्या – गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना, फितूरांना, आरोपींना, शिक्षा म्हणून कैंद्यांना कैदेत ठेवण्याच्या, डांबून ठेवण्याच्या संरक्षीत कोठड्या.

51) पागा – गडावर येणारे घोडे, प्राणी यांच्या राहण्यासाठी, त्यांना बांधण्यासाठी केलेली निवा-याची सोय.

52) उष्ट्रखाना – उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा, उंट या प्राण्यांची बांधण्यासाठी केलेली सोय.

53) पिलखाना /हत्तीशाळा – गडावर असलेल्या, सैन्य दलात असलेल्या हत्तींना राहण्याची, निवा-याची केलेली सोय, जागा.

54) तालीमखाना – तालीमखाना म्हणजे मल्लशाळा .पैलवान मल्लांचा आखाडा तालीम.

55) अंबरखाना – गडावर धान्य साठविण्यासाठी बांधलेली इमारत.

56) कडेलोट कडा – कैद्यांना, फितुरांना, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी गडावरील एक राखीव जागा कडा. शिक्षा सुनाविल्यानंतर कैद्यांचा अशा ठिकाणाहून कडेलोट केला जाई. उदा: रायगडचा टकमक कडा , शिवनेरी कडेलोट कडा.

57) शिल्पे – प्रत्येक किल्ल्यावर प्रवेशद्वारावर, तटावर, मंदिरावर आपल्याला विविध प्रकारची शिल्पे आढळून येतात. जसे कि हत्ती, शरभ, सिंह, गंडभेरूड असे प्राणी तसेच दरवाजावर ,तटावर देव-देवता गणेश, मारूती इ. देवतांची पाना फुलांची विविध शिल्पे आढळतात. वेगवेगळ्या उद्देशाने, वेगवेगळ्या साम्राज्याची ओळख, ताकद दर्शविण्यासाठी कोरलेले विशिष्ट आकाराचे, चित्रांचे दगड.

58) शिलालेख– अनेक गडावर वेगवेगळ्या भाषेचे शिलालेख कोरलेले असतात. शिलालेख हे प्रामुख्याने उठावाचे किंवा खोदिव अक्षराचे असतात, शिलालेखातून किल्ल्यांचा, बांधकामाचा विविध राजवटींचा ऐतिहासिक उल्लेख, दस्तावेज आपल्याला मिळतो. किल्ल्यांची बांधणी, पुनर्बांधणी, डागडुजी काही ऐतिहासिक व्यक्तींचे उल्लेख, गडाबद्दलचा इतिहास, तेथील राजवटीची ओळख अशा महत्वपूर्ण गोष्टींची माहीती शिलालेखांच्या माध्यमातून कळते.

59) जोते/चौथरा – गडावरील वास्तूंचा, घरांचा पाया. घडीव मजबूत दगडांनी बांधून यावर वरील बांधकाम केले जाई.

60) समाधी –  गडावर, गडाच्या पायथ्याशी, गावांमध्ये, शुरविरांच्या ,राजघराण्यातील व्यक्तींच्या स्मरणार्थ उभारलेली छत्री.

61) सतीशिळा – सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ केलेले शिल्प. पतिच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेमध्ये सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ एका दगडी शिळेवर विशिष्ट आकाराचे शिल्प कोरले जात ज्याला सतीशिळा असे म्हणतात. साधारण सतीशिळा गडावर तसेच अनेक गावांमध्ये, परिसरात आढळून येतात. यामध्ये त्या प्रसंगाचे प्रतिकात्मक चित्र कोरले जाई.

62) वीरगळ – वीरगळ म्हणजे वीरपुरूषांच्या स्मरणार्थ उभारलेला स्तंभ, युद्धात, संग्रामात, युद्धभुमीत वीरमरण आलेल्या, धारातिर्थी पडलेल्या सैनिकाच्या, वीराच्या स्मरणार्थ दगडी शिळेवर विशिष्ट शिल्पांच्या आधारे कोरलेला दगड वीरगळ म्हणून ओळखला जातो. यामध्ये वीराच्या पराक्रमावरून, लढाईच्या वर्णनावरून वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळी माहिती सांगणारे वीरगळ कोरले जात. असे बरेचसे दुर्लक्षित विरगळ आज अस्ताव्यस्त अवस्थेत किल्ले, गावे इ ब-याच ठिकाणी दुर्लक्षित स्थितीत पडून आहेत.

63) खंदक – शत्रूला किल्ल्याभोवती भिडता येऊ नये यासाठी किल्ल्याभोवती विशिष्ट खोलीचा, वेगवेगळ्या दृष्टीने, खोदलेला संरक्षीत चर म्हणजे खंदक होय. खंदक हा प्रामुख्याने भुईकोट किल्ल्याभोवती खोदला जातो. भुईकोट किल्याभोवती खंदक खोदून एकप्रकारे किल्ल्याला संरक्षीत केले जाते. शत्रूला सहजपणे किल्ल्याला भिडता येऊ नये या साठी केलेली ही खास योजना, खंदकामध्ये पाणी, मगरी, साप असे प्राणी सोडले जात, जेणेकरुन एक-प्रकारे भुईकोट किल्ल्याभोवती हे सुरक्षाकवच होते. खंदकावरून जाण्यायेण्यासाठी काढता घालता येणारा पूल बसविला जाई. उदा. किल्ले चाकण , यशवंतगड इ.

64) तळखडे – गडावरील लोकांच्या राहण्याच्या दृष्टीने गडावर घरांचे, वाड्यांचे बांधकाम केले जाई. यासाठी प्रामुख्याने दगड, लाकूड आणि विटा यांचा वापर केला जात असे. घराच्या, वाड्याच्या दगडी चौथ-यावर उभे लाकडी खांब व त्यावर इतर बांधकाम अशी रचना असे. आज गडावरील या अवशेष रूपी घरांच्या चौथ-यावर आपल्याला विशिष्ट प्रकारचे दगड किंवा खुणा दिसतात, यांना तळखडे असे म्हणतात. वाडा बांधताना या विशिष्ट आकाराच्या कोरलेल्या नक्षीदार दगडावर, तळखड्यांवर वाड्याचे लाकडी खांब रोवले जात, उभे केले जात. यामुळे या लाकडी खाबांना एकप्रकारे ओल, किड इ. गोष्टींपासून संरक्षण मिळे.

गडावर असणा-या या सर्व महत्त्वाच्या बाबी, गडाचे हे दुर्गावशेष, गडाला एक गडाचे परिपूर्ण रूप देतात…….

शिवदुर्गबांधनीतील अनेक प्रयोग आजही आपल्याला अचंबित करतात.गडकोट पाहता पाहता हे दुर्गावशेष अभ्यासले तर या गडांची परिपूर्ण भटकंती नक्कीच होईल.

-आंतरजालावरुन साभार