'गुलमोहर'
मुक्तचंद
सोमवार, २५ मे, २०२०
"शरीर समजून घेवू या"
मंगळवार, ५ मे, २०२०
"ग्रामीण बोलीतील काही शब्दाचा परिचय"
सोमवार, ४ मे, २०२०
"साडे विषयी संक्षिप्त"
आपल्या मराठीत साडेतीन, साडेसाती, असे ‘साडे’ शब्द वापरले जातात. ते कसे ते पहा:-
१) साडेतीन शहाणे :- पेशवाईत सखारामबापू बोकील, विठ्ठल सुंदर आणि देवाजीराव चोरघडे तसेच नाना फडणीस हे चौघे सरदार 'साडेतीन शहाणे' म्हणून प्रसिद्ध होते. यापैकी पहिले तिघे हे युध्द कौशल्यात तसेच मुत्सद्दीपणात असे पूर्ण शहाणे होते. तर नाना फडणीस हे युद्ध कौशल्य अजिबात नसलेले परंतु प्रचंड मुत्सद्दी आणि कौटिल्य नीतीचा उपयोग करण्यात मशहूर असे सरदार होते, म्हणून त्यांना अर्धे शहाणे म्हणत. असे हे चौघे सरदार साडेतीन शहाणे म्हणून प्रसिद्ध होते. यांनी पेशवाइला फार चांगली साथ दिली.
२) साडेसाती :- एखाद्या माणसाच्या जन्मराशीपासून १२, १ व २ या राशीत शनी असला म्हणजे या तीन राशीतून मार्गक्रमण करण्यास शनीला लागणारा काळ त्या माणसाला कष्टाचा जातो असे म्हणतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला शनीला २.५ वर्षे लागतात हे लक्षात घेतले तर या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या या तीन राशीत शनी साडेसात वर्षे असतो. म्हणून या काळाला 'साडेसाती' असे म्हणतात.
३) साडेतीन मुहूर्त :- दसरा, दिवाळीची प्रतिपदा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाडवा) हे तीन पूर्ण मुहूर्त आणि अक्षय्य तृतीयेचा अर्धा मुहूर्त असे मिळून 'साडेतीन मुहूर्त' हे कोणतेही कार्य करायला उत्कृष्ट असे समजतात. या साडेतीन मुहूर्ताना मग ताराबल, चंद्रबळ, शुभ अशुभ वेळ, असे काही पाहावे लागत नाही.
४) साडेपंधरे :- उत्तम प्रतीचे सोने असेल तर त्याला 'साडेपंधरे' असे संबोधतात.
५) साडेभावार्थी :- मानभावी माणसाला अथवा ढोंगी साधूला 'साडेभावार्थी' म्हणतात.
६) साडेतीन पोशाख :- पूर्वी दरबारात कित्येक मोठाल्या अधिकाऱ्यांना १ पागोटे, एक शेला, पायजमा किंवा झगा याच्यासाठी महामुदी नावाच्या उंची वस्त्राचा तुकडा व पटक्यासाठी किनखापाचे अर्धे ठाण मिळून साडेतीन वस्त्रे देण्याचा रिवाज असे. त्याला' साडेतीन पोशाख' असे म्हणतात.
-अॅड्. प्रवीण बाबर
"प्रत्येक मनुष्याच्या मनातील कर्ण"
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
"चहाचे नाना प्रकार"
"चहाचे प्रकार"
हवा हवासा वाटणारा गरमागरम चहा. पण चहा पिणे हे जरी शरीरासाठी हितकारक नसले तरी बहुतेकांची सकाळची सुरुवात मात्र चहा घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही. चहा घेतल्यावर आपल्याला अगदी ताजेतवाने वाटते. कारण चहाचा गुणधर्म तसा आहे. हल्ली आपली जीवनशैली बदललत चालली आहे. बदललेल्या जीवनशैलीनुसार अनेक वेगवेगळ्या प्रकारे चहा करता येतो.
आयुर्वेदिक मसाला चहा पावडर कशी बनवावी?
चहाचा मसाला हा चहा बनवत असताना दोन कप चहा साठी पाव टीस्पून टाकायचा म्हणजे चहा कडक व चविष्ट लागतो. बहुतेक हा चहा थंडीत किंवा पावसाळ्यात बनवतात. तसेच सर्दी पडसे किंवा खोकला झाला असल्यास घ्यावा त्यमुळे घशाला शेक बसतो व बरं वाटते.
साहित्य : ३० ग्रॅम सुंठ पावडर, १ टीस्पून काळी मिरे पावडर, दालचिनी, १ टीस्पून पांढरी मिरे पावडर, दहा ग्रॅम हिरवे वेलदोडे, चिमुठभर जायफळ पावडर.
कृती : प्रथम तवा गरम करून वरील सर्व साहित्य अगदी कमी आंचेवर गरम करून घेऊन मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. मंग तयार झाला 'आयुर्वेदिक चहा मसाला'.
चहा करण्याचे काही नावीन्यपूर्ण वेगळे प्रकार देत आहोत; जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. पुदिना, लिंबू, आले, वेलची, दालचिनी, मध, हळद, पेरूची पाने, मसाले वापरून ते केले आहेत. खास बोलायच झालं तर येवले अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, साईबा चहा, हरमन चहा, इ. प्रकारचे चहा हे अमृतुल्य झालेत.
अमृततुल्य चहा
अमृततुल्य चहा हा खूप लोकप्रिय झालाय. खास करून येवले चहा. हा चहा थोडा दाट असून थोडा गोड असतो. यामध्ये दूध, दर्जेदार चहा पावडर, चहाचा मसाला, साखरसुद्धा नेहमीपेक्षा जास्त असते. अशा प्रकारचा एक कप चहा घेतला तरी छान फ्रेश वाटते.
साहित्य : एक कप पाणी, एक कप दूध, ४ टीस्पून साखर, १ टीस्पून चहा मसाला, २ टीस्पून दर्जेदार चहा पावडर.
कृती : प्रथम एका भांड्यात दूध व पाणी मिक्स करून गॅस स्टोव्हवर गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा मसाला, साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्यावे. गरमागरम अमृततुल्य चहा बिस्कीटे किवा खारी, तोष बरोबर घेतलास मजा काही औरच.
आयुर्वेदिक चहा
अशा प्रकारचा चहा बनवताना जिरे, धने, व बडीशेप वापरले आहे. 'आयुर्वेदिक चहा' हा आपण रोज सकाळी घेण्याची सवय केली, तर आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.त्यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जातील व आपले शरीर निरोगी बनेल व आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल. धने-जिरे व बडीशेप यामध्ये असे गुणधर्म आहेत, की आपल्या शरीरातील नको असलेले घटक निघून आपले पोट साफ होईल. तसेच आपल्याला वजन कमी करण्यास मदत मिळेल. अजून याचा एक फायदा म्हणजे धने-जिरे वापरून बनवलेले पाणी आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते.
साहित्य : दोन कप पाणी, पाव टीस्पून - जिरे, धने, बडीशेप
कृती : एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये धने-जिरे व बडीशेप घालून ५ मिनिटे गरम करायला ठेवावे. मग विस्तव बंद करून चहा गाळून मग सर्व्ह करावे.
गवती चहा
सर्दी–पडसे, अंगदुखी व आमवात अशा अनेक प्रकारच्या व्याधींवर गवती चहा उपयुक्त आहे.
साहित्य: २ चहाचे कप पाणी, अडीच कप दुध, ३ ते ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, १/२ टिस्पून किसलेले आले किंवा ४ पाती गवती चहा.
कृती: दुध आणि पाणी पातेल्यात एकत्र करा. साखर आणि आले, गवती चहची पाती कापून घालून मोठ्या आचेवर पातेले ठेवावे. दुध-पाणी वाफाळायला लागले, की त्यात चहा पावडर घालून आच मध्यम करावी. मिश्रण उकळल्यावर उतू जाते. म्हणून चहाकडे सतत लक्ष ठेवावे. चहा १-२ मिनिटे उकळू द्यावा. गॅस स्टोव्ह बंद करून चहा मिनिटभर झाकून ठेवावा. नंतर गाळून गरम गरमच देण्यात यावा.
लिंबू चहा
आपल्याला हा चहा घेतल्याने ताजेतवाने वाटते. ह्या चहाची चव आंबट लागते. त्यामुळे आपल्या नेहमीच्या चहापेक्षा चवीस्ट लागतो. पण हा चहा थंड असतो. त्यामुळे आपण जेव्हा गरम वाटते, तेव्हा तो बनवतात. काही जण हा चहा कधीही घेतात. यास 'डाएट चहा' पण म्हणतात.
साहित्य : चार कप पाणी, चार टीस्पून चहा पावडर, चार टीस्पून लिंबूरस, आठ टीस्पून साखर, १० बर्फाचे तुकडे, १० पुदिन्याची पाने, कापलेल्या लिंबाची पातळ चकती.
कृती : एका भांड्यात ४ कप पाणी गरम करून घ्यावे. त्यामध्ये चहा पावडर, पुदिना पाने, साखर घालून ५ मिनिटे चहा उकळून घेऊन; दुसऱ्या भांड्यात गाळून थंड करायला ठेवावे. चहा थंड झाल्यावर त्यामध्ये लिंबूचा रस टाकावा. चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये बर्फ, पुदिना पाने व लिंबाची एक चकती घालून सजवून ठेवावा.
इराणी चहा
हा चहा बनवायला पाऊन तासाचा कालावधी लागतो. इराणी चहा घट्ट केलेल्या दुधापासून तयार होतो. एका पातेल्यात दूध उकळवले जाते. हा चहा बनविण्यासाठी दोन पातेली वापरली जातात.
साहित्य: ३ चहाचे कप पाणी, आर्धा लिटर म्हशीचे दुध, ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, ४ टिस्पून चहा पावडर, ३ वेलची, २ टेबल स्पुन मलई क्रिम किंवा मावा.
कृती: एका टोपात पाणी, वेलची, साखर आणि चहा पावडर टाकून उकळवले जाते. दुसऱ्या टोपात घट्ट केलेले दूध उकळवले जाते. या दुधात मलई क्रिम किंवा मावा टाकला जातो. दोन स्वतंत्र भांड्यात दूध आणि चहाचे मिश्रण उकळवले जाते आणि चहा देण्यापूर्वी ते एकत्र करून दिले जाते. हा चहा लगेच थंड होत असल्याने तो लगेच प्यावा लागतो. इराणी चहा करताना गॅस कधीच बंद होत नाही. सतत तो उकळवला जातो त्यावर झाकण ठेवून वजन ठेवले जाते. गॅस बंद झाला तर प्रमाण चुकते आणि चहाची चव निघून जाते.
काळा चहा
हा चहा इतर चहांपेक्षा चवीला कडवट असतो. काळा (ब्लॅक) टी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो. नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते.
साहित्य: २ चहाचे कप पाणी, साखर चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, लिंबाची एक फोड.
कृती: एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा, त्यानंतर चहा टाका. साखर चवीनूसार घालून चहा चांगला उकळवा. नंतर गाळून कपात ओता. त्यात लिंबाची फोड पिळा. यात कोणत्याही प्रकारचे दूध टाकत नाहीत.
बासुंदी चहा
बासुंदी चहा अजून येवढा प्रचलित नाही. पण त्याची एक विशिष्ट टेस्ट असते. हा चहा थोडा घटट असून गोड असतो. हा एक कप चहा घेतला तरी छान ताजेतवाने वाटते.
साहित्य : एक कप पाणी, दीड कप दूध, दोन टीस्पून साखर, १ टीस्पून चहा, ४ सालीसकट वेलदोडे.
कृती : प्रथम एका पातेल्यात दूध ओतून उकळी येईपर्यंत तापवावे व पाणी मिक्स करून गॅस स्टोव्हवर गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्यावे.नंतर वेलदोडे टाकून चहास उकळी येवून द्यावी. पुन्हा थोड्यावेळाने उकळी येवू द्यावी. चहा घट्ट दिसू लागला की समजायचा बासुंदी चहा तयार झालाय.
ज्यांना साय आवडते त्यांना हा चहा खुप आवडतो.
काश्मीरी कावा चहा
काश्मीर म्हटले, की तेथील सृष्टिसौंदर्य व काश्मीरमधील थंडीसुद्धा आठवते. काश्मीरमध्ये खूप थंडी असते त्यामुळे तेथील रहिवासी थंडी कमी करायला कावा म्हणजेच आपल्या भाषेत मसाला चहा बनवतात. या मसाला चहाची चव अगदीच निराळी लागते. तसेच त्यामध्ये दालचिनी, केसर, हिरवे वेलदोडे, मीठ, खायचा सोडा व साखर वापरण्यात येतो. आम्ही काश्मीरमध्ये कावा टी पिला आम्हाला तो खूप आवडला.
साहित्य : दोन कप पाणी, दोन टीस्पून साखर, एक टीस्पून काश्मिरी चहा पावडर, ४ हिरवे वेलदोडे, अर्धा तुकडा दालचिनी तुकडा, एक चिमूट खायचा सोडा, एक चिमूट मीठ, ५-६ काड्या केशर, बदामाची पावडर.
कृती : पाणी, साखर, वेलदोडे, दालचिनी, काश्मिरी चहा, मिक्स करून पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर उकळून घ्यावे. मग त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्स करून दोन मिनीटे गरम करून गाळून घ्यावा. गरम गरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना चहाच्या वर बदाम व केशर पावडरने सजववावा.
आल्याचा चहा
आल्याचा चहा घेतल्याने, सर्दी पडसे कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपली रोग प्रतिकारशक्तीपण वाढते.
साहित्य : दोन कप पाणी, ४ टीस्पून साखर, २ टिस्पून चहा पावडर, आल्याचा तुकडा कुटून घेणे, एक कप दुध. कृती : एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये साखर व चहा पावडर टाकावी. नंतर कुटलेले आले घालून चांगली उकळी येऊ द्यावी. दुध घालून पुन्हा उकळी येवून द्यावी. नंतर सर्व्ह करावे. आपल्या घशाला शेक मिळून सर्दी पडसे कमी होण्यास मदत होते.
आले, लिंबू व मधाचा चहा
अशा प्रकारचा चहा बनवताना आले किसून, लिंबूरस, व साखरेऐवजी मध वापरला जातो. यामुळे आपले शरीर निरोगी राहते व रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपल्या त्वचेला चकाकी येते. आल्यामुळे आपल्या पोटातील गॅंस निघून आपले पोट साफ होते. सकाळी उठल्यावर अशा प्रकारचा चहा घेतला तर फायदेशीर असते.
साहित्य : दोन कप पाणी, १ टीस्पून ग्रीन टी चहा पावडर, अर्धे लिंबू (रस काढून) एक मध्यम आल्याचा तुकडा (किसून), अर्धा टेबल स्पून मध.
कृती : दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा पावडर, आले घालून १० मिनिटे गॅस स्टोव्हवर उकळून घ्यावे. नंतर गाळून थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस व मध घालून मिक्स करून देण्यात यावे.
पुदिन्याचा चहा
पुदिन्याचा चहा पिल्याने पोटदुखी थाबते. पोटातील रोग दूर होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. चेहऱ्यावरील पिंपल ठीक होतात, आपली त्वचा थंड राहते व उजळून येते. पचनशक्ती सुधारून वजन कमी होते. हा चहा खूप गुणकारी आहे,
साहित्य : दोन कप पाणी, अर्धा टी स्पून मिरे (जाडसर कुटून), अर्धा टीस्पून काळे मीठ, १०-१२ पुदिना पाने
कृती : प्रथम पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्यावी. एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये पुदिना पाने, मिरे, काळे मीठ घालून १० मिनिटे गॅसस्टोव्हवर चहाला उकळी येऊ द्यावी.
पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन पोटदुखी थांबते.
तंदुर चहा
तंदुर चहा बनवायला तसा फार अवघड नाही. आपण नेहमीचा चहा जसा बनवतो अगदी तसाच तंदुर चहा ही बनवायचा आहे. मात्र तंदुर चा फ्लेवर देण्यासाठी आपल्याला मातीचे कप आणि कोळसाचे तुकडे लागणार आहेत.
साहित्य: २ चहाचे कप पाणी, अडीच कप दुध, ३ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, २ टिस्पून चहा पावडर, ३ कोळसाचे तुकडे, २ मातीचे कप.
कृती: सर्वप्रथम पाणी, प्रमाणानुसार दुध, आवश्यकतेनुसार साखर आणि चहा पत्ती टाकून नेहमीप्रमाणे गॅसवर चहा बनवायला ठेवावा. त्यानंतर ३ कोळश्याचे टुकडे शेगडीवर गरम करुन घ्यावेत. नंतर गरम झालेल्या कोळसांवर मातीचे कप गरम करायला ठेवावेत. त्यानंतर पॅन किंवा भांडे घ्यावून ते थोडेसे गरम करावे. गरम भाड्यात मातीचे कप ठेवून त्यात तयार झालेला चहा ओतावा. मातीच्या गरम कपातील चहा पुन्हा दुस-या कपात ओतावा. बस्स. झाला गरमागरम तंदुरी चहा तयार.
जेव्हा उकळणार चहा त्या गरम कपांमध्ये ओतला जाईल त्यावेळी त्या मातीचा स्वादही त्या चहामध्ये उतरेल. चवीला अत्यंत वेगळा असणारा हा चहा सर्वांना फार आवडतो.
बदाम पिस्ता चहा
हा श्रीमंताचा चहा म्हणून प्रसिद्ध असून बदाम, पिस्ता व वेलची युक्त असतो. हा चहा लज्जतदार असून तलफ भागवतो.
साहित्य: १ कप पाणी, १ कप मलई दूध, ३ टी स्पून साखर, ४ टी स्पून चहा पावडर, केशर, बदाम आणि पिस्ता याची पुड, २ वेलची.
कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा टाका. उकळी आल्यावर केशर टाका. पुन्हा उकळी काढा. एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्या. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.
पेरू चहा
या चहाला पेरू सुगंध येतो.
साहित्य : दोन कप पाणी, ४ टीस्पून साखर, २ टिस्पून चहा पावडर, ४ पेरूच्या झाडाची बारिक पाने कापून कुटावित, एक कप दुध. कृती : एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये साखर व चहा पावडर टाकावी. नंतर कुटलेले पण पेरूची पाने टाकून चांगली उकळी येऊ द्यावी. नंतर सर्व्ह करावे. ह्या चहास पेरूचा सुगंध येतो.
-अॅड्. प्रवीण बाबर
बुधवार, १५ एप्रिल, २०२०
"लॉकडाऊनचा सदुपयोग कसा करून घ्यायचा"
कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना घरात वेळ कसा घालवायचा ही समस्या अनेकजणां समोर दिसते. आपण काही गोष्टी केल्या तर आपला वेळ चांगला तर जाईलच पण ज्ञानातही भर पडेल.
वेळे अभावी आपल्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील, तर तुम्ही त्या गोष्टींना या काळात वेळ देऊ शकता.
लॉकडाऊनच्या कालावधीत आपण वेळेचा सदुपयोग करू शकतो. घरबसल्या ऐतिहासिक, पौराणिक, शास्त्रीय, विनोदी, धाडसी शौर्यकथा, चालूघडामोडी अशा साहित्याचे वाचन करा. जमल्यास लेखन करण्यास हरकत नाही. आळसात वेळ घालवण्यापेक्षा घरामध्ये असलेली बरीच पुस्तके वाचावीत.
विविध प्रकारचे पाकक्रिया बनवण्यास शिका, लहान मुलांना चहा, नाष्टा इ. बनवण्यास शिकवावे. अंगी असलेले छंद जोपासावेत. नवीन भाषा शिकता आली तर शिकावी. घरातील साफसफाई करावी, कपडे इस्त्री करून ठेवावीत. जुनी विजीर्ण कपडे बाजूला काढून टाकावीत. आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
टीव्हीवर चांगले कार्यक्रम असतात त्यात एक मनोरंजन खेळ, गाणे ऐकावीत. बुद्धीबळ, ल्यूडो, चल्लस, पत्ते, कॅरम, इ. सारखे विविध प्रकारचे खेळ खेळावेत. गाणी ऐकावीत, त्यातील बोल जाणुन घ्यावेत, गाणी गावीत, गाण्याच्या भेंड्या खेळाव्यात. डिस्कवरी, अॅनिमल प्लानेट, हिस्टरी चॅनेल पहावेत. तसेच युट्यूबवर सुद्धा हवा तो प्रोग्रॅम आपण लावून आपल्या ज्ञानात भर पाडू शकता.
तसेच, ज्या व्यक्तिंना रुची आहे ते कार्यक्रमही आपण युट्युबवर हवे तेव्हा लावू शकता. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मोटिवेशन व्हिडिओ पाहावेत जेणेकरून आपणास सकारात्मक प्रेरणा मिळेल.
लॉकडाऊनमुळे आपण घरात बंदिस्त झालात. जेवणे, झोपणे याव्यतिरिक्त आपण शारीरिक फिटनेस याकडे दुर्लक्ष करता कामा नये. घराल्या घरात जेवढे जमेल तसे सुर्यनमस्कार, योगा, दोरी उड्या, झुम्बा फिटनेस, चालणे, इ. करू शकता. यामुळे आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ रहाते.
लॉकडाऊनच्या कालावधीत रोज नियमित व्यायाम करत रहावे. देशातील करोनाशी संबंधित माहिती घेत जा. अफवा पासून दूर राहा. वास्तव जाणून घ्या.
मिळालेल्या क्षणांचा सदुपयोग करावा..
एकदा का वेळ निघून जर गेली..
मग लागतं वाट बघत बसावं..
आणि येवू शकते पदरी नैराश्य…
गर्दी टाळा, प्रशासनाला योग्य ते सहकार्य करा आणि कोरोना होणार नाही याची खबरदारी घ्या.
- अॅड्. प्रवीण बाबर
मंगळवार, १४ एप्रिल, २०२०
"आवाज"
समुद्राची गाज, ढगांचा गडगडाट,वीजेचा कडकडाट, रेल्वेच्या रूळांचा खडखड आवाज, नदीचं खळंखळणं, पानांची सळसळ, खिडक्यांच्य़ा तावदानावरची वाऱ्याची आत येऊ का विचारणारी साद, पहिल्या पावसाची मृद्गंधापूर्वी येणारी टपटप अशी चाहूल, मंदीरातला घंटानाद, लताचा पवित्र स्वर, जगजीतचा धीरगंभीर आवाज, बाळाचे पहिले बोल, ओळखीच्या व्यक्तींचा आवाज, पावलांचा आवाज, सणावाराला होणारे त्या त्या सणांची ओळख सांगणारे आवाज असे अनेकोनेक श्राव्य आवाज ते अगदी वाळवंटातला ’अनाहत’ नाद… एक नं अनेक किती आवाज. एक एक करत मनात उतरतात आणि रूजून बसतात.
'मेरी आवाज ही पेहेचान है’ म्हणता यावं असा प्रत्येक माणसाचा आवाज वेगळा तशीच प्रत्येक गावांची, जागांची अशी ओळख ठरणारे आवाज असतातच, नाही का?
आवाजाची लय ठरते एखाद्या ठिकाणी रहायला लागल्यानंतर. नवी जागा ओळखीची होण्याच्या टप्प्यात आणि त्या जागेत रुळण्यात या आवाजांची एक साथ असते. काही ठळक अगदी जवळचे तर काही पुसटसे विरळ होत जाणारे आवाज. अस्तित्त्व मात्र दोघांचेही महत्त्वाचे. रेल्वेरुळांशेजारी रहाणाऱ्यांचे वेळापत्रक जसे जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेच्या वेळांशी बांधले जाते तसे मंदीराशेजाऱ्यांचे आरतीच्या वेळांशी बांधले जाते . नकळत घडणारी प्रतिक्षिप्त क्रिया खरं तर ही एक.
दिवसाच्या प्रत्येक प्रहराचे आगमन असे त्या त्या प्रहराचे विशिष्ट आवाज सांगतात. पहाट होता होता अलगद सरकवल्या जाणाऱ्या पडद्यांच्या आवाजाने उजेडालाच नव्हे तर बाहेरच्या जगातल्या निरनिराळ्या आवाजांनाही कवाडं उघडली जातात. एखाद्या ठिकाणी रहाताना हळूहळू त्यांचा क्रमही नकळत मन नोंद घेत जाते. घरातला शांततेचा ’नाद’ मागे सरत जातो आणि चढणाऱ्या दिवसासोबतच आवाजांचे चक्र फिरायला लागते. घरोघरच्या कपबशांच्या आवाजाने घरात सकाळ होते, मग क्रमाने होत जाणारा स्वैपाकाचा आवाज. मिक्सरमधल्या मसाल्यांचे दळणाचे आवाज, कामाला येणाऱ्या बायकांच्या लगबगीचे आवाज, दुधवाले, पेपरवाले, भाजीवाले इ. आवाज आणि फक्त आवाज… माणसांना झाली सवड तर ऐकतील आणि नसतील ऐकणार तर नसुदेत असे पक्ष्यांच्या सकाळच्या किलबिलाटाचे आवाज.
निरनिराळ्या गाड्यांचे हॉर्न्स सकाळी अगदी जोमात असतात, त्यांच्या मालकासारखीच त्यांनाही ऑफिसेसला पोहोचण्याची लगबग असल्यासारखे. मुलांच्या शाळांच्या बसेस, त्यांच्या गाड्यांच्या ड्रायव्हर काकांशी होणाऱ्या संवादांचे आवाज.
गावं बदलली, जागा बदलल्या तरी रहायला लागल्यानंतर सर्वसाधारण याच आवाजांनी ठरत जाते एखाद्या ठिकाणची ओळख. त्या त्या भागाचं व्यक्तिमत्त्व ठरवत जातात नकळत हे आवाज. सकाळचे आवाज हे धावपळीचे, साऱ्या दिवसाला आपल्या गर्भातून जन्माला घालणारी सकाळ अशी भारलेली, गतिमान. मिळालेल्या क्षणांवर दिवस कोरणाऱ्या घाईची सकाळ.
शहरी जीवनाला सरावलेली सकाळ तर नक्कीच ही अशी…
धकाधकीच्या सकाळीतून शांत, प्रगल्भ काहीश्या रूक्ष दुपारीकडे दिवसाची वाटचाल होते आणि आकाशभर विखूरलेले आवाजाचे पक्षी काहीसे मंदावतात. अगदी संगीताच्या भाषेत सांगायचे तर सकाळच्या सुरांतून दुपारच्या सुरांवर दिवस उतरत जातॊ आणि या बदलत्या लयीची एक मींड साधली जाते. सकाळी उजेडासाठी सरकवलेले पडदे पुन्हा जागी नेऊन येणाऱ्या उन्हालाच नव्हे तर बाहेरच्या जगालाही, आवाजालाही थोपवणारी दुपार. वर्दळ थांबलेली नसते पण काहीशी पॉज मोडला मात्र नक्कीच जाते. सकाळइतके निश्चितच नाहीत पण संध्याकाळचे आवाज नक्कीच वाढलेले. संध्याकाळ परतीच्या पावलांची… थकल्या भागल्या तरीही घराच्या ओढीने वेगावलेल्या पावलांची. दिवसाचं देणं देता देता आवाज खोल गेलेली संध्याकाळ.
काही हवेहवेसे आवाज, काही अपरिहार्य तर काही इतके सवयीचे की जाणवूही नयेत असे आवाज….
डोळे मिटले तरी न थांबणाऱ्या आवाजांच्या प्रलयाने वेढलेलो असतो आपण. शहरीकरणाचे आवाज, यांत्रिकतेचे, कोलाहलाचे, गोंगाटांनी भरलेले आवाज.
टिव्हीवर विविध वाहिन्यांवर तारस्वरात होणाऱ्या चर्चा हे ही झगमगाटी आवाज. अर्थात हे तसं जरा जुनं चित्र म्हणावं लागेल. आजकाल या आवाजात भर पडलीये ती स्मार्टफोन्सवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सच्या आवाजांची. हा कोलाहल नवा असला तरी रुळलाय किंवा अगदी अविभाज्य झालाय अगदी झपाट्य़ाने. आपल्या प्रत्येकाचं हल्ली सोशल मिडियावर एक आभासी घर आहे, आणि मग तिथल्या आपल्या वावराने तसेच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या मंडळींच्या अस्तित्त्वानी त्या घराची ओळख ठरतं जाते. हे आवाज प्रत्यक्ष ऐकू आले नाहीत तरी जाणवतात मात्र नक्की. कधी कधी तर हे आवाज इतके वाढतात की त्यांचा गोंगाट असह्य होत जातो.
आवाजाच्या या कल्लोळात आवाज खूप आणि ऐकणारे कमी अशी परिस्थिती होत जाते. जगरहाटी चालताना आयुष्याच्या चाकांचा हा अपरिहार्य खडखडाट खरंतर… संवादाची, संपर्काची असंख्य साधनं तरीही माणसांचे माणसांशी होणाऱ्या संवादांचे आवाज हरवलेली अवस्था… या अवस्थेनी एक निराकार शुन्यत्त्व येत चाललय सगळ्यालाच. डोक्यात आवाजांचा महापुर आणि मन कोरे सुन्न असं काहीसं होत जातं.
इतने शोर में दिल से बातें करना है नामुमकीन,
जाने क्या बातें करते है आपस में हमसाये…
या सगळ्या आवाजातून बाहेर पडावेसे वाटते मग. ऐकावी वाटते शांतता. किंवा अगदी शांततेचाही आवाज नको…. साधावं असं काहीतरी की येईल स्वत:चाच आवाज स्वत:लाच. स्वरांच्या श्रॄती ऐकू याव्यात एखाद्या गाणाऱ्याला, तश्या स्वत:च्याच जगण्यातले हरवत चाललेले सूक्ष्म कण ऐकू यावेत स्वत:लाच.
आवाज नकोनकोसे होत असतानाच कुठूनतरी कोकिळेचा स्वर कानी पडतो… एखादं गाणं ऐकू येतं. शाळेतून घरी पोहोचलेल्या मुलांनी मारलेली हाक आपल्यापर्यंत पोहोचते आणि ’आवाज’ पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचू लागतात. अश्यातच मजरूहचा एक शेर आठवतो…
रोक सकता हमें ’जिंदान ए बला’ क्या मजरूह,
हम तों ’आवाज़ ’ है, दीवार सें छन जाते है !
’जिंदान ए बला’ म्हणजे तुरुंग, चारही बाजुंनी संकटांनी घेरलेला माणूस… संकटांनो तुम्ही चारही बाजुंनी आम्हाला घेरलत तरी आम्ही आवाज आहोत आणि या भिंती पार करून जोमाने पुढे जाऊ असं सांगणारा हा शेर. 'आवाज’ म्हणजे कोलाहल असे वाटू लागलेल्या आजकालच्या युगात जरा थबकावं वाटतं आणि आधीच असलेल्या जाणीवेला पुन्हा जागा मिळते की आवाज ही खरं तर किती भन्नाट देणगी आहे. आवाजाचं नातं पुन्हा गोडवा, माधुर्य, ताकद यांच्याशी जोडलं जातं. वाटतं आपलाच आवाज शोधावा पुन्हा आणि घ्यावी एक सुरेल तान स्वत:साठी. आवाजाच्या विचारांचा एक प्रवास करत ’आवाजाला’ पुन्हा एक परिमाण मिळते.
कोलाहलातून शोधावा खरा “आवाज “. गोंगाटातून शांततेच्या आवाजाकडे परतण्याची “मींड” साधावी.
दैनिक पुण्य नगरी, 14.11.2016