मंगळवार, ३१ मार्च, २०२०

व्हायरस विरूद्ध माणुस

माणूस आणि व्हायरस यांची लढाई कायमच चालू राहणार आहे. माणूस आपल्या बुद्धिमत्तेने या सूक्ष्म जंतुंशी सातत्याने समर्थपणे लढा देत आला आहे. आताही करोना व्हायरसशी त्याची लढाई सुरुच आहे. त्यानिमित्ताने व्हायरस म्हणजे काय आणि त्याचं कार्य कसं चालतं, त्याची जाणून घेतलेली माहिती...
maharashtra-times
- प्रदीप कुलकर्णी

फार पुरातन काळापासून माणूस 'बॅक्टेरिया' आणि 'व्हायरस' या सूक्ष्म जंतुंशी लढा देत आला आहे. समोर दिसणाऱ्या शत्रूबरोबर लढणं एक वेळ सोपं, पण डोळ्याला न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म आकाराच्या बॅक्टेरिया आणि व्हायरसबरोबर लढणं महाकर्मकठीण! पण गेल्या काही शतकांत विज्ञानाच्या मदतीने माणसाला धोका असलेल्या अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरसचा शोध घेऊन त्यांना मारण्यासाठी शास्त्रज्ञांनी औषधं शोधून काढली आहेत. एवढंच नव्हे तर हे आजार कधीच होऊ नयेत म्हणून विशिष्ट सूक्ष्म जंतुंविरुद्ध माणसाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संशोधकांनी वेगवेगळ्या लसीदेखील शोधून काढल्या आहेत. सूक्ष्म जंतुंचा संसंर्ग होण्यापूर्वी त्या त्या आजारासाठी लस टोचून घेतली, तर तो आजार सहसा होत नाही. अर्थात, एक आहे की सर्वच सूक्ष्म जंतू काही घातक नसतात.

गेल्या काही दिवसांत 'कोरोना'च्या संदर्भात आणि यापूर्वी येऊन गेलेल्या 'बर्ड फ्लू', 'स्वाईन फ्लू' यांसारखे वेगवेगळे आजार उद्भवले त्या वेळीही व्हायरसविषयी बरीच चर्चा झाली. पण मुळात 'व्हायरस म्हणजे काय' हे समजून घेतलं पाहिजे. व्हायरस इतका सूक्ष्म असतो की, तो फक्त शक्तिशाली 'इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप'खाली दिसू शकतो. तो बॅक्टेरियापेक्षाही आकाराने खूप लहान असतो. तो सजीवही नसतो आणि निर्जीवही नसतो. तो त्यांच्या सीमारेषांवर असतो, असं म्हटलं तरी चालेल. व्हायरसची ढोबळ व्याख्या करायची झाली तर असं म्हणता येईल की, व्हायरस म्हणजे प्रोटीनच्या आवरणाच्या आत काही 'जीन्स' असलेला एक अतिसूक्ष्म जंतू! माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर नक्की काय करायचं, याविषयीची माहिती या जीन्समध्ये असते. व्हायरसवरचं प्रोटीनचं आवरण वेगवेगळ्या आकाराचं असल्यामुळे व्हायरसदेखील विविध आकारांचे असतात. ते जसे मानवी शरीरात शिरून अपाय घडवतात, तसंच विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि वनस्पतींमध्येदेखील शिरून त्यांना उपद्रव देतात.

कुठलीही बाहेरची वस्तू किंवा सूक्ष्म जंतू शरीरात शिरले की ते शरीराचा भाग नाहीत, हे ओळखून माणसाच्या शरीरातील श्वेतपेशी (व्हाईट ब्लड सेल्स) म्हणजेच त्याची प्रतिकारशक्ती त्या सूक्ष्म जंतुंबरोबर लढून त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करते. या काळात सूक्ष्म जंतुंबरोबर लढा देण्यासाठी शरीरातील श्वेतपेशींची संख्या खूप वाढते. एखाद्या सैन्याच्या फौजेने शत्रूवर हल्ला करावा, तशी या श्वेतपेशींची फौज सूक्ष्म जंतूंवर हल्ला करते. त्यासाठी श्वेतपेशी आपल्या शरीरात मोठ्या संख्येने 'अँटिबॉडिज्' तयार करून शरीरात शिरलेल्या सूक्ष्म जंतुंना मारण्यासाठी त्याचा हत्यार म्हणून उपयोग करतात. वेगवेगळ्या व्हायरससाठी श्वेतपेशी वेगवेगळ्या अँटिबॉडिज् तयार करतात. या लढाईमध्ये माणसाची प्रतिकारशक्ती वरचढ ठरली, तर सूक्ष्म जंतू नष्ट होतो; पण सूक्ष्म जंतू बलाढ्य ठरला तर तो माणसाला आजारी पाडतो.

व्हायरस हा एखाद्या बांडगुळासारखा असतो. तो स्वत:च्या 'आवृत्त्या' स्वत:च्या क्षमतेने काढू शकत नाही. त्यासाठी त्याला तशी यंत्रणा उपलब्ध व्हावी लागते. त्यामुळेच तो यजमानाच्या (होस्ट) शरीरात शिरला की, त्याच्या पेशींची स्वत:च्या 'आवृत्त्या' काढण्याची क्षमता वापरून स्वत:च्या लाखो आवृत्त्या काढतो. त्या दृष्टीने व्हायरसला 'हायजॅकर' म्हटलं पाहिजे. एकदा का इतक्या मोठ्या संख्येने व्हायरस शरीरात जमा झाले की ते माणसाच्या शरीरात धुमाकूळ घालू लागतात आणि त्याला आजारी पाडू शकतात. माणसाची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ते व्हायरस माणसाला मारूही शकतात.

व्हायरस अनेक प्रकारचे असतात. सुमारे पाच हजार किंवा त्याहूनही अधिक जातीचे व्हायरस अस्तित्वात आहेत, असं म्हणतात. विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे विशिष्ट प्रकारचे आजार होतात. सर्दी, फ्लू, एडस्, देवी, कांजिण्या, पोलिओ, चिकुनगुनिया, डेंग्यू यांसारखे आजार व्हायरसमुळेच होतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येक व्हायरसमुळे माणूस काही मरत नाही. उदाहरणार्थ, सर्दीचा व्हायरस शरीरात असेपर्यंत माणसाला बेजार करतो हे खरं, पण सर्दीने माणूस मरत नाही. एकदा का व्हायरस त्याचं 'कार्य' उरकून शरीरातून निघून गेला की माणूस पुन्हा ठणठणीत बरा होतो. इतकी शतकं उलटून गेली तरीही सर्दी बरी करण्यासाठी अजूनही कुठलंही 'अँटिव्हायरल' औषध उपलब्ध नाही.

असे अनेक व्हायरस होते आणि आहेत की त्यांचा नायनाट कसा करायचा हे, जोपर्यंत माणसाला ठाऊक नव्हतं तोपर्यंत त्यांच्या संसर्गाने माणसं मृत्युमुखी पडायची. एके काळी व्हायरसमुळे होणाऱ्या 'एन्फ्लुएन्झा'सारख्या आजाराने लाखो माणसं मेली. आता मात्र 'फ्लू' आणि 'पोलिओ' यांसारख्या काही आजारांच्या विरोधात लस निर्माण झाली आहे. या रोगाचे सूक्ष्म जंतू मानवी शरीरात शिरण्यापूर्वी लस टोचून घेतली किंवा पोलिओचे ड्रॉप्स घेतले तर हे आजार होत नाहीत. याचं कारण, लसीमुळे माणसाची विशिष्ट सूक्ष्म जंतुंबरोबर लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती निर्माण होते.

बॅक्टेरियामुळे होणारे बरेचसे आजार बरे करण्यासाठी प्रतिजैविकं (अँटिबायॉटिक्स) आता उपलब्ध आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगातलं पहिलं अँन्टिबायोटिक इंग्लंडमधील डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने तुलनेने अगदी अलीकडे, म्हणजे १९२८ साली शोधून काढलं. त्याच्या वापरामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक सैनिक वाचले. बॅक्टेरिया मारण्यासाठी जशी अँन्टिबायोटिक्स उपयुक्त ठरतात, तशी काही व्हायरस मारण्यासाठी 'अँटिव्हायरल' औषधं उपलब्ध असली तरी ती संख्येने कमी आहेत. उदाहरणार्थ, 'हेपेटायटिस-सी' या आजारासाठी अँटिव्हायरल औषध उपलब्ध आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्हायरसला मारण्यासाठी अँटिबायोटिक्सचा उपयोग होत नाही.

माणसाला व्हायरसचा उपसर्ग होऊ नये म्हणून इतक्या वर्षांच्या अनुभवातून माणसाने काही व्हायरसेससाठी लस निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. उदाहरणार्थ, फ्लू, देवी, कांजिण्या, पोलिओ, गालगुंड, हेपेटायटिस-ए आणि बी, रोटाव्हायरस, रेबीज्, 'सर्व्हायकल कॅन्सर' अशा काही आजारांसाठी लस उपलब्ध आहे.

मानवी शरीर पेशींनी (सेल्स) बनलेलं आहे. मेंदू, अस्थी, हृदय, त्वचा असे तुम्ही म्हणाल ते शरीरातील अनेक अवयव पेशींनीच बनलेले असतात. पेशींच्या भोवती एक आवरण असतं आणि त्यात एक द्रवपदार्थ भरलेला असतो. त्याच्या आत 'न्युक्लिअस' असतो आणि त्याच्या आत जीन्स असतात. 'जीन्स'च्या सूचनेनुसार शरीराच्या विविध भागांची कामं चालतात. आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या ग्रंथींमधून निर्माण होणाऱ्या स्रावांचा उपयोग करून आपलं शरीर निरोगी राखायला मदत करणं, हे पेशींचं पहिलं महत्त्वाचं कार्य! त्यात काही बिघाड झाला तर माणसाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात.

वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींचं ठरावीक आयुष्य असतं. उदाहरणार्थ, रक्तवर्ण (रेड ब्लड सेल्स) पेशींचं आयुष्य १०० ते १२० दिवस असतं, तर 'प्लेटलेट्स'चं आयुष्य ५ ते ९ दिवस असतं. त्यामुळे या पेशींचं आयुष्य संपण्यापूर्वी त्यांच्या आवृत्त्या काढणं हे त्या पेशींचं दुसरं काम! मानवी शरीरात सजीव पेशींचं सतत विभाजन चालू असतं. एका पेशीपासून दोन पेशी, दोनाच्या चार या पद्धतीने त्यांची संख्या वाढत असते.

कोणालाही असं वाटेल की व्हायरस सजीव नसल्यामुळे त्याच्यात प्रजनन क्षमता नसते. मग एका व्हायरसपासून अनेक व्हायरस कसे निर्माण होतात? हे कळण्यासाठी काही मूलभूत गोष्टी समजून घेऊ. मानवी शरीरातील पेशींवर एक 'रिसेप्टर' असतो, जशी आपल्या टेलिव्हिजनला अँटेना असते ना तसंच काहीतरी! व्हायरस शरीरात शिरला की रिसेप्टरला चिकटतो आणि त्यातून पेशींमध्ये प्रवेश मिळवून पेशींचा ताबा घेतो. त्यानंतर पेशींची स्वत:चं विभाजन करण्याची यंत्रणा वापरून व्हायरस स्वत:च्या आवृत्त्या काढतो. या आवृत्त्या कशा काढायच्या याबद्दलच्या सूचना व्हायरसमधील जीन्समध्ये असतात. व्हायरस त्याच्या आवृत्त्या काढत असताना पेशींमधील द्रवपदार्थ वापरून टाकतो. त्यामुळे माणसाच्या शरीरातील असंख्य सजीव पेशी मरतात.

व्हायरसने स्वत:ची केलेली नवी प्रत म्हणजे त्याच्याच जातीचा जन्माला आलेला आणखी एक नवीन व्हायरस! या पद्धतीने व्हायरसची एक फौज तयार होते. एखाद्या शत्रुने दुसऱ्या राष्ट्राचं सरकार ताब्यात घेऊन आपल्या सूचनेनुसार ते चालवावं आणि त्या देशाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करावा, तशाच प्रकारचं काम या व्हायरसची फौज करते.

माणसाच्या शरीरात निर्माण झालेले असे लाखो व्हायरस शरीरातील अवयव खिळखिळे करून माणसाला आजारी पाडतात. त्यातून काही वेळा मृत्यूही ओढवतो. विशिष्ट प्रकारचा व्हायरस माणसाच्या शरीरातील विशिष्ट अवयवावरच हल्ला करतो. उदाहरणार्थ, जो व्हायरस फुप्फुसावर हल्ला करण्यासाठी निर्माण झाला आहे तो फक्त फुप्फुसावरच हल्ला करतो. शरीरातील पोट, आतडी, जठर, मेंदू, हृदय, मूत्रमार्ग अशा इतर अवयवांना त्याच्यापासून धोका उद्भवत नाही.

व्हायरस सजीव नसेल तर त्याला मारणार कसं, असं तुम्हाला वाटलं असेल ना? त्याचं उत्तर हे आहे की, व्हायरस मारण्यासाठी प्रथम त्याच्या शरीरावर असलेलं प्रोटीनचं आवरण नष्ट करावं लागतं. असं औषध सापडलं तर त्याचा उपयोग 'अँटिव्हायरल ड्रग'मध्ये केला जातो. एकदा का प्रोटीनचं आवरण नष्ट झालं, की तो व्हायरस मानवी शरीरातील कुठल्याही पेशीला चिकटू शकत नसल्यामुळे त्याला पेशींमध्ये शिरकाव मिळू शकत नाही आणि म्हणूनच तो माणसाला अपाय करू शकत नाही. एखाद्या व्हायरसला 'होस्ट' मिळालाच नाही, तर तो काही काळाने स्वत:हून नष्ट होतो. 'कोरोना' व्हायरस विरुद्ध सध्या औषध उपलब्ध नसल्यामुळे त्याचा संसर्गच होऊ न देणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे! त्यामुळेच सर्वांनी घरातच बसा, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, सतत साबणाने हात धुवा असं सांगितलं जात आहे. साबणाने हात धुतले तर हातावरील व्हायरस मरतात.

माणसाची प्रतिकारशक्ती आणि व्हायरस यांच्यात सतत युद्ध चालू असतं. वृद्धत्व, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या व्याधींमुळे माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरात व्हायरसने प्रवेश केला की, ते लवकर आजारी पडतात आणि क्वचित त्यांचा मृत्यूही ओढवतो.

व्हायरसच्या बाबतीत सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, व्हायरसमध्ये असलेल्या जीन्समध्ये कालांतराने बदल होऊन (म्युटेशन) नवीन प्रकारचा व्हायरस जन्माला येतो. अशा वेळी त्याला कसं मारायचं याचा शोध शास्त्रज्ञ पुन्हा घेऊ लागतात. असं औषध सापडायला अर्थातच काही कालावधी लागतो. या काळात तो व्हायरस घातक असेल तर अनेक जणांचा जीव घेऊ शकतो. यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे माणूस आणि व्हायरस यांची लढाई कायमच चालू राहाणार आहे. पण माणूस आपल्या बुद्धिमत्तेने या सूक्ष्म जंतुंशी सातत्याने समर्थपणे लढा देत आला आहे आणि त्यामुळेच पूर्वीच्या तुलनेत आजकाल माणसाचं आयुर्मान वाढलं आहे!

सदरचा लेख पब्लिश.. 
व्हायरस विरुद्ध माणूस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 
29 Mar 2020

सोमवार, ३० मार्च, २०२०

८४ रत्ने कोणती?


पृथ्वीवर मिळणा-या चौ-याऐंशी रत्नांची थोडक्यात माहिती

**************************************************


१. हिरा – अतिशय मौल्यवान रत्न, पांढ-या रंगाचे असते. तसेच पिवळ्या, काळ्या लाल, गुलाबी रंगामध्येही सापडते.

२. मोती – मोती हे 'जलजन्य रत्न' आहे. पाण्यातील प्राण्यापासून तयार होते. म्हणून प्राणीजन्य पांढरे पिवळे, लाल, काळ्या रंगाचे मोती सापडतात.

३. प्रवाळ – याला 'पोवळे' असेही म्हणतात. हेही जलजन्य रत्न आहे. प्रवाळ लाल, शेंदरी सफेद इत्यादी रंगात सापडतो.

४. पाचू – पाचू या रत्नांचा रंग हिरवा असतो. हे खनिजजन्य आहे. इतर रत्नांपेक्षा हे ठिसूळ आहे.

५. पुष्कराज – अतिशय लोकप्रिय खनिजरत्न आङे. याला पुष्कराज असेही म्हणतात.

६.  माणिक – या रत्नास 'माणिक्य' असेही म्हंटले जाते. काही माणिक हे लाल रंगाचे तर काही माणिक गुलाबी रंगाचे, आकाशी, शामल रंगाचे असतात.

७. नीलम – याला 'नीलमणी' असही म्हणतात. निळ्या रंगाचे किंवा मोराच्या मानेच्या निळ्या रंगासारखे दिसते.

८. गोमेद – या रत्नाला गोमेदक असेही म्हणतात. याचा रंग गायीच्या गोमुत्रासारखा किंवा मधासारखा असतो.

९. वैडूर्य – याला 'सुत्रमणी' , 'लसण्या' असे म्हणतात. मांजरीच्या डोळ्यासारखे हे रत्न दिसते. त्याच्या पृष्टभागावर १ ते ३ सफेद रेषा असतात. त्यांना तेजाचे पट्टे असे म्हणतात.

१०. लालडी – हे माणिक परीवारातील रत्न असून याचा रंग गुलाबाच्या रंगासारखा असतो. हे माणिकाचे उपरत्न होय. याला' स्पायनल' असे म्हणतात.

११. फिरोजा – हे रत्न आकाशी रंगाचे असून अपारदर्शक असते. हे अल्पमोली रत्न आहे.

१२. तुरमली – हे रत्न सर्व रंगामध्ये सापडते. याचा स्पर्श मुलायम असून हे ठिसूळ रत्न आहे.

१३. ओपल – याला 'उपल' असेही म्हणतात. सर्वात सुंदर व देखणे असे हे रत्न आहे. या रत्नावर इंद्रधनुष्याचे रंग बघावयास मिळतात. मराठी सागरराज

१४. पेरीडॉट – भारतीय लोक जबरजद्द, घृतमणी या नावाने ओळखतात. स्फटिकाप्रमाणे हे रत्न पारदर्शक असून अल्पमोली रत्न आहे.

१५. गौंदता – हे रत्न गाईच्या दातासारखे असून सफेद रंगात पिवळसर झाक असते. या रत्नावर उभ्या आडव्या रेषाही असतात.

१६. सितारा – हे रत्न भगव्या रंगाचे असून त्यावर सोनेरी रंगांचे ठिपके असतात.

१७. रौमनी – हे गडद लाल रंगाचे रत्न असून थोडा काळसर रंग दृष्यमान होत असतो.

१८. नरम – रौमनीप्रमाणेच लाल रंगाचे असून काळ्या रंगाची झाक दिसून येते. रोमनी हे रत्न जड असून नरम हे रत्न वजनाला हलके असते. परंतु रौमनीपेक्षा चांगले दिसते

१९. सुलेमानी – शामल रंगाचे, काही रत्ने काळ्या रंगाची असून त्यांच्यावर उभ्या पांढ-या रेषा दिसतात.

२०. जजेमानी – हे सुलेमानी रत्नांच्या जातीतले असून याचा रंग धुसर पांढरा असतो. यावर गडद सफेद रंगाच्या रेषा असतात.

२१. आबरी – हे काळ्या रंगाचे खनिज असून अल्पपारदर्शक आहे.

२२. हजरते उद – हे काळ्या रंगाचे रत्न असून यापासून नेत्रविकारावर औषध तयार करतात.

२३. पनधन – हे काळ्या रंगाचे रत्न असून यात किंचित हिरवा रंग असतो.

२४. डूर/कूर – हे कथिलाच्या रंगाचे रत्न असून यापासून वनऔषधी व भस्म कुटण्याकरीता लागणारा खलबत्ता तयार करतात.

२५. पाराजहर – हे पांढ-या रंगाचे रत्न असून हे रत्न जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते.

२६. चित्ती / चित्रि – हे रत्न काळ्या रंगाचे असते व त्यावर सोनेरी रंगांची रेषा असते.

२७. हालन/हालत – हे गुलाबी रंगाचे रत्न आहे. हे रत्न हालविल्यात त्यातील रंग हालताना दिसतो.

२८. खात – या रत्नातील काही प्रकार लाल तर काही प्रकार निळया रंगाचे असतात. उष्णतेच्या विकारावर औषधी म्हणून उपोयोगी आहे.

२९. सोहन मक्खी/मकवी – याचा रंग पाढं-या रेतीसारखा असून हे रत्न अपारदर्शक आहे याचा उपयोग मुत्रविकारावर औषधी म्हणून केला जातो.

३०. पारसमणी – लोखंड्याचे सोन्यात रुपांतर करणारे हे रत्न. अतिदुर्लभ याला परीस असेही म्हटले जाते.

३१. जहरमोहरा – पांढ-या रंगात हिरवी किंवा हिरव्या रंगात पांढरी झाक या रत्नात असते. या रत्नांच्या पेल्यात विष जरी टाकले तरी विषारीपणा नाहीसा होतो.

३२. मकनातीस – सफेद किंवा किंचित काळ्या रंगाचे हे रत्न असून गारगोटीसारखे दिसते. अग्नी प्रदीप्त करण्यास उपयुक्त.

३३. मरगज – हे रत्न हिरव्या रंगांचे असते. परंतु चमक दिसत नाही.

३४. दर्वेनज्फ/दुवैनजफ – हे रत्न तांदळाच्या रंगाचे असून पोटविकारावर उपयुक्त आहे.

३५. तुरसावा – हे रत्न गुलाबी हिरव्या रंगाचे असून नाजुक व ठिसूळ असते.

३६. सुरमा – हे काळ्या रंगाचे खनिजरत्न आहे. यापासून डोळ्यात घालण्यासाठी सुरमा बनवितात.

३७. लिलियर – हा काळ्या रंगाचा रत्न दगड असून यापासून शोभेच्या वस्तू बनवितात.

३८. खारा – या रत्नाच्या काळ्या रंगात हिरवी झाक दिसून येते. हे रत्न पिण्याच्या पाण्यात टाकल्यास अपचनाचे विकार दर होतात.

३९. हकिक-कल-बहार – केशरी, पांढरा, हिरवा लाल. पारदर्शी पांढरा, पिवळा, काळसर, इ. रंगात हकिक सापडतात. हे दगडरत्न नदीकाठी सापडतात. मुसलमान फकिर या रत्नाच्या माळा वापरतात.

४०. मुबेनज्फ – पांढ-या रंगाचे हे रत्न असून यात केसासारख्या बारीक रेषा आढळतात.

४१. कहरूवा – हे लाल रंगाचे रत्न असून मुलसमान व फकिर हे रत्न फक्त जपमाळेसाठी वापरतात.

४२. संगबसरी/संगबदरी – हे काळ्या रंगाचे असून यापासून सुरमा तयार केला जातो.

४३. गौरी – हे रत्न सर्व संगामध्ये आढळत असून यात पांढ-या रंगाच्या रेषा दिसतात. यापासून खेळणी तयार करतात.

४४. सीमाक – हे रत्न लाल पिवळ्या रंगाचे असून त्यावर गुलाबी रंगाचे ठिपके असतात. यापासून वनौषधी व रत्नभस्म कुटण्यकरीता लागणारा खलबत्ता बनवितात.

४५. सीरखडी – हे रत्न काळ्या रंगाचे असून यापासून खेळणी बनवितात.

४६. अमलिया/अमोलिया – काळ्या रंगाचे हे रत्न असून हे मुर्ती बनविण्यसाठी वापरतात.

४७. मूसा – काळ्या रंगाचे असून खेळणी, खलबत्ता प्याले तयार करण्यासाठी वापरतात. हे गंगा नदीच्या उपनद्याच्या पात्रात सापडते.

४८. कुदरत – काळ्या रंगाचे असून पांढ-या रंगाचे डाग असतात. हे रत्न वापरल्यास भाग्योदय लवकर होतो.

४९. संगसन – याचा आकार ल रंग द्राक्षासारखा असतो. काही रत्ने पांढ-या रंगाची असतात. औषधी म्हणून याचा वापर होतो.

५०. दाना फिरंग – या रत्नाचा आकार व रंग पिस्त्याप्रमाणे असतो.

५१. कसोटी – हे रत्न काळ्या रंगाचे असून याचा उपयोग सोन्याची परीक्षा करण्याकरीता होतो.

५२. सिजरी – हे पांढ-या रंगाचे रत्न असून यात काळसर रंगाची झाडाची प्रतिमा दिसते.

५३. मकडा – या रत्नात कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे चित्र दिसते. याचा रंग काळा असतो.

५४. हरीद – काळ्या रंगाचे हे आकारमानापेक्षा जड असते. याची जपमाळ बनवितात.

५५. हवास / हास – हे रत्न सोनेरी किंवा हिरव्या रंगाचे असून औषधात याचा उपयोग करतात.

५६. माखर – लाल किंवा पांढ-या रंगाचे गंडमाळेच्या विकारावर औषध म्हणून याचा उपयोग करतात.

५७. सुनेहल्ला – पिवळसर सोनेरी रंगाचे हे रत्न त्याच्या आकारमानापेक्षा बरेच हलके असते.

५८. निलि – हे रत्न निलमच्या जातीतील असून निळ्या रंगाचे पण ठिसूळ असते.

५९. बेरूंज – पाचूच्या जातीतील हे रत्न असून हिरवा रंग फिकट असतो.

६०. आलेमानी – सुलेमानी रत्नाचाच हे एक रत्न मानले जातात. भुरकट रंगाचे असून त्यावर सफेद रेषा असतात.

६१. सावोर – फिकट हिरव्या रंगाचे असून त्यावर भुरकट रंगाच्या रेषा दिसतात.

६२. अहवा – गुलाबी रंगाचे रत्न असून पांढ-या रंगाचे रत्न ठिपके असतात.

६३. लारू / लाख – माखर जातीतील रत्न

६४. सिंया – सर्व रंगात सापडत असून यापासून मुर्ती बनवितात.

६५. सिंगली – हे रत्न माणिकाच्या जातीतील अशून याचा रंग लालसर काळा असतो.

६६. ढेडी – हे रत्न काळ्या रंगाचे असून यापासून शोभेच्या वस्तू, खेळणी प्याले, खलबत्ते तयार करतात. लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून याचा उपयोग ताईतात करतात.

६७. सिफरी – आकाशी रंगाचे रत्न असून याचा उपयोग औषधासाठी केला जातो.

६८. संगिया – हे रत्न शंखाच्या रंगाचे असून शोभेच्या वस्तू व लॉकेटसाठी याचा वापर करतात.

६९. गुदडी – हे रत्न सर्व रंगात सापडते. याचा उपयोग मुसलमान लोक जपमाळेसाठी करतात.

७०. कामला – हे हिरव्या रंगाचे असून मुसलमान लोक वापरतात.

७१. दातला – हे रत्न हस्तीदंतासारखे असते.

७२. बसरी – हे रत्न काळसर रंगाचे असून यापासून सुरमा तयार करतात.

७३. झना – हे मंळकट रंगाचे असून यावर पाण्याचा थेंब टाकला तर तो स्थिर रहात नाही.

७४. दारचना – हे पिवळ्या रंगाचे असून याचा आकार हरभरा डाळीसारखा असून याचा उपयोग औषधात केला जातो.

७५. लाजवर्त – हे निलमचे एक प्राचीन उपरत्न आहे. निळ्या रंगाचे ठिसूळ रत्न आहे. याला सफायर असेही म्हणतात.

७६. वासी – फिकट हिरव्या रंगाचे रत्न.

७७. पित्तोनिया – याचा मुळ रंग हिरवा असून त्यात लाल रंगाच्या छटा दिसतात. याला ब्लड स्टोन असे म्हणतात.

७८. धुनेला – भुरकट रंगाचे असून त्यावर सोनेरी ठिपके असतात.

७९. सिंदुरिया – भुरकट गुलाबी रंगाचे रत्न असून औषधी म्हणून उपयोग केला जातो.

८०. लुधया – लाल रंगाचे अल्पमोली रत्न.

८१. कटेला – याचा रंग आकाशी किंवा निळसर असून उपरत्नांमध्ये सर्वात सुंदर रत्न.

८२.  तामडा – मुळ काळ्या रंगात लालसर रंगाची झाक असते. याला गार्नेट असेही म्हणतात.

८३. मरियम – पांढ-या रंगाचे रत्न असून पैलू पाडल्यावर सुंदर दिसते.

८४. फिकट – बिल्लोरी रत्नातील एक जात पांढ-या व पिवळ्या रंगाचे हे अपारदर्शक व अल्पमोली असते.



रागावर नियंत्रण ठेवावे


आपल्याला राग का येतो? आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसर्याच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसर्याचा राग का येतो? तर अहंकार दुखावला जाणे, घाई असणे, अपेक्षाभंग होणे आणि नकारात्मक विचारात तल्लीन असणे ह्यामुळे राग येतो. थोडक्यात हे चार प्रकार आहेत राग येण्याचे. म्हणजे तुमचा आमचा राग, ह्या चार प्रकारात मोडतो.

अहंकार:
त्याने मला असे कसे म्हटले? मी एवढी त्याच्याहून मोठी आहे हे तो विसरला का? किंवा मी काय शिकलेला आणि तो काय शिकलेला? स्वत:ला माझा साहेब समजतो की काय? असे विचार आपल्या मनात येतात. म्हणजे कुठेतरी आपला अहंकार दुखावला गेलेला असतो. म्हणून आपल्याला त्या व्यक्तीच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो.

घाई:
एकाच वेळेला आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात. मग त्या ठराविक वेळात आवरल्या जात नाहीत. किंवा ते करताना कोणी विचलित केले तरी आपल्याला राग येतो. समजा आपल्याला कुठेतरी जायचे आहे. इतर काही कामामुळे उशीर झाला आणि रस्त्यात जाताना सगळे वाहतूक दिवे लाल लागले की आपली चिडचिड होते. कार्यालयामध्ये काम करताना त्या दिवशीच्या कामाची यादी चाललेली असते आणि त्यात आठवण होते, आपल्याला कोणाला तरी दूरध्वनी करायची. अशा वेळी फोन लागत नसला किंवा व्यस्त लागला की आपली परत चिडचिड. मग तो दूरध्वनी आपटला जातो किंवा हवी असलेली व्यक्ती भेटली नाही तरी राग येतो. फोनचा आणि त्या व्यक्तीचा. शिवाय बरेच काम अजून व्हायचे असते म्हणून त्या कामाचा.

अपेक्षा:
आपण दुसर्याकडून अपेक्षा करतो आणि मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. साधे म्हणजे आपण आपल्या मुलांकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून, मित्रांकडून काही अपेक्षा करतो आणि ते जर आपल्या अपेक्षेनुसार वागले नाहीत की आपल्याला लगेच राग येतो. आपण विचारही करत नाही की आपल्या अपेक्षा योग्य होत्या की नाही? त्यांच्या दृष्टिकोनातून विचार न करताच आपण रागवतो.

नकारात्मक विचार:
छे असे होणारच नाही. आपणच नेहेमी भोगणार. आपण कितीही झटा, पण आपल्याला ते मिळणारच नाही. मी सांगतो, आमचे नशीबच वाईट. आम्हाला लगेच अशी नोकरी मिळणारच नाही. आमच्या नशिबात नुसते कष्टच आणि परत ह्या कष्टाचे फळ मिळणार नाही, ते नाहीच. आम्ही मुलांसाठी एवढे कष्ट केले पण तुम्हाला वाटते का की, ती मोठेपणी आम्हाला विचारतील? मी दिसायला इतका चांगला, इतकी चांगली नोकरी, आणि एवढे चांगले शिक्षण, पण आम्हाला कुठली आली त्या क्ष सारखी बायको मिळायला?
विचार करून पहा. आता आजूबाजूचे जग बदलणे सोपे, का आपण स्वत: आपले विचार बदलणे सोपे आणि शक्य आहे? आपला राग आपण नियंत्रित करणे सोपे आहे, का आपण इतरांचे वागणे बदलू शकणे सोपे आहे? आपला राग नियंत्रित करणे जास्त शक्य आहे, कारण ते आपल्या हातात आहे.

आपल्याला येणारा राग हा सक्रिय प्रकारात मोडतो का निष्क्रिय प्रकारात मोडतो हेही आधी जाणून घेतल पाहिजे. आता सक्रिय राग म्हणजे काय? काहीतरी होते आणि आपल्याला राग येतो. म्हणजे आपली चांगली फुलदाणी कोणाच्या तरी हाताने फुटते मग आपल्याला त्याचा राग येतो. पण आपण जेंव्हा विचार करतो की, त्या माणसाने ती काही मुद्दाम फोडलेली नाही, तेंव्हा थोडया वेळाने तो राग शांत होतो. म्हणजे व्हायला हरकत नसते आणि अशावेळी जर सल राहिला नाही, तर तो सक्रिय राग झाला. माणूस चिडले आणि थोडया वेळाने शांत झाले.
दुसरा असतो निष्क्रिय राग. असा माणूस बाहेरून थंड असतो, पण आत मध्ये अगदी धुमसत असतो. अगदी सगळ्या बाबतीत त्याला लोकांचा द्वेष, राग, तिरस्कार सगळेच असते, पण बाहेरून अगदी शांत असतो. त्याच्या मनात सूडाची भावनापण असते. तर असा राग फारच महाभयंकर असतो. आधी बघा तुमचा राग कशा प्रकारात बसतो ते. निष्क्रिय राग नियंत्रित करणे कठीण असते.

खालील गोष्टी करून काही फायदा होतो का ते बघा.
१. अंतर-तपास: दिवसभराचा आढावा घ्या आणि बघा आपला राग सक्रिय होता का निष्क्रिय? आपण तो नियंत्रित केला की नाही? कशामुळे आपल्याला राग आला होता? तो योग्य होता का? आणि मग आपण आपली कृती सुधारण्याचा प्रयत्न करा.

२. सखोल श्वसन: राग आल्यावर हे जरूर करून बघा. राग कमी तरी होईल. आतताईपणाने निर्णय घेतला जाणार नाही. ताबडतोब तोंडाला आले ते बोलून टाकले जाणार नाही.

३. नकारात्मक स्थितीचा अस्वीकार: नकारात्मक स्थितीचा स्वीकार करू नका, किंवा तिच्याकडे दुर्लक्षही करू नका. दुसरा रागावला असला आणि तो राग तुम्ही स्वीकारलाच नाही, तर तो राग त्याच्याजवळच राहील. म्हणजे कोणी रागावले असले आणि आपण त्यामुळे रागावलो नाही, शांतच राहिलो, तर आपल्याला त्या रागाचा त्रास होणार नाही. म्हणजे कोणी म्हटले की ह्या साध्या गोष्टी तुला करता येत नाहीत, तुला काही समजतच नाही. आता ह्या नकारात्मक गोष्टी आपण स्वीकारच केल्या नाहीत की राग येणारच नाही. ओरडणे, रागावणे त्या दुसर्याजवळच राहतील.

४. जागा सोडा: जागेचा त्याग करा. एखादा खूप रागावला आहे. खूप आरडाओरडा चालला आहे. तुम्ही तिथून निघून जाऊ शकता. त्याला तुम्ही बदलू शकत नाही, पण स्वत:ला परिस्थितीप्रमाणे जुळवून घेणे तुमच्या हातात आहे.

५. सौम्यपणे आणि सावकाश बोला: जे लोक सगळ्या गोष्टी घाईघाईने करतात किंवा जोरजोरात बोलतात, असे लोक लवकर रागवतात. लवकर संतापतात. आणि तसे पाहिले तर, आजूबाजूच्या लोकांना पण संतापवतात. आपण जर आपला निषेध किंवा आपला विरोध, आरडाओरडा न करता दाखवला, तर समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद पण मिळू शकतो किंवा आपण दुसर्याला पण पटवून देऊ शकतो. बघा पुढच्या खेपेला तुम्हाला कोणाचा राग आला आणि तुम्ही आरडाओरडा न करता तुमचा मुद्दा सांगितलात की समोरच्याला पटतो की नाही ते.

६. खाली बसा किंवा चक्क आडवे व्हा: रागावले असताना जर खाली बसले तर रागाचा आवेश कमी होतो. माणूस जेंव्हा उभा असतो तेंव्हा रागावून जास्त तावातावाने बोलत असतो असे लक्षात येईल. जरा खाली बसला, की रागाचा आवेश उतरतो.

७. जरा थंड पाणी पिऊन बघा. राग आलेला असताना जर दोन घास पोटात गेले तर राग नाटयमयरीत्या कमी होतो असा अनुभव आहे.

८. दुसर्या बाजुनी विचार करून बघा: कोणावर रागवण्याआधी त्याच्या दृष्टीकोनातून विचार करून बघा. दुसरी व्यक्ती का रागावली असेल किंवा त्या व्यक्तीचे असे वागण्याचे कारण काय असेल?

ह्यातील काही गोष्टी पटतील, काही पटणार नाहीत. सगळेच उपाय प्रत्येक वेळेला लागू होतीलच असे नाही. राग संपूर्णपणे निघून जाईलच असेही नाही. पण निदान नियंत्रणात राहील किंवा थोडासा कमी होणे पण शक्य आहे. काही गोष्टी अंमलात आणणे शक्य आहे आणि काही फरक पडतो का ते बघता येण्यासारखे आहे.

संतापाचा ताबडतोब निचरा करावा. ओरडा आरडा करून वगैरे. म्हणजे मन स्वच्छ राहतं, याउलट तो साठत राहिला तर त्याचं रूपांतर विद्वेषात होतं. हे सगळं रागवल्यावर आठवायला पण पाहिजे. यातला गमतीचा भाग सोडून दिला तरी, एक गोष्ट खरी की, रागाचा सामना करण्यासाठी आपल्या मनाला तयार करावं लागतं.

सखोल श्वसन केल्यानंतर मन स्थिर झाल्याचा जो एक क्षण आपल्याला मिळतो, त्या एका क्षणात सगळा राग पचवून टाकण्याचं सामर्थ्य असते. ह्यानंतर बाकीचे उपाय करताना आपल्या जीवाचा तळतळाटपण होत नाही. विपश्यना, कोणत्याही प्रकारचं ध्यान, प्राणायाम अशा गोष्टींनी तयार केलेलं मन कुठल्याही रागाचा सामना करू शकतं आणि एखाद्या कमलपत्राप्रमाणे त्या वैफल्याच्या भावना त्याच्यावर न साठता निघून जातात आणि त्याची परिणती विद्वेषात होत नाही.

राग आला की १ ते १०० अंक मोजा. त्याचे २ फायदे आहेत. राग हळूहळू नाहीसा होतो व आपल्याला १ ते १०० अंक नीट मोजता येतात याचा आनंद वाटतो.

नियमांचं पालन न करणारे लोक पाहून खूप राग येतो. बसमधे, सरकारी कार्यालयांमधे, बँकेत, अगदी कुठेही असे लोक आणि त्यांना निमूटपणे सहन करणारे लोक बघून खूप राग येतो. नियमांचा अंमल ज्यांचे हातात असतो त्यांनी तो रुजू केल्यास बेशिस्त लगेच नियंत्रणात येते.
एकदा एक रेल्वेचा तिकिट कारकून, घोळक्यानी समोर येणार्या लोकांना पाहून बराच रागावलेला होता. त्यानी काम थांबविले आणि जाहीर केले की रांगेत उभे राहाल तरच तिकिटे देईन. लगेच लोक रांगेत उभे राहिले. तो प्रयोग जादूच्या कांडी सारखाच वाटला.

स्वयंसुधारणेबद्दलच्या निरनिराळ्या व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरांना उपस्थिती लावल्यावर असा अनुभव येतो की असल्या मानसशास्त्रीय विश्लेषणांत काही राहून गेले आहे असे सहसा नसतेच. जर आपल्याला ते दिसले नाही तर आपणच नीट पाहावे म्हणजे दिसते. आणि राग वैफल्य वगैरे दोषही आपलेच असतात आणि त्यांवर उपायही आपणच, आपल्यावरच करायचा असतो. अपेक्षाभंगाचे दु:ख दारूण असते. तशीच अतृप्तीची बोचही. कुठल्याही प्रकारच्या अतृप्तीमुळे राग चटकन येतो.

रागावर सगळ्यात चांगला उपाय `मौनं सर्वार्थ साधनं'. दुसर्याचे दोष दाखवताना मुठीची तीन बोटे आपल्याकडे वळत असतात. रामदासांचे `मनाचे श्लोक' सुद्धा, जर कोणी अर्थ समजून त्याप्रमाणे वागेल, तर तोही एक चांगला उपाय ठरावा. मानसोपचाराचे बरेच उपाय त्यात दिसतात.

श्रेयनिर्देशः खूप पूर्वी मायबोलीवरच रंगलेल्या चर्चेचा हा सारांश आहे. त्यामुळे काही वाक्ये, काही जणांना आपली वाटली तर त्यात काहीच वावगे असणार नाही.